रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धात अद्याप कोणत्याही देशाने माघार घेतली नाही. पण आता युक्रेनमध्ये वेगळीच भीती व्यक्त केली जात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनमध्ये आण्विक दुर्घटनेची शक्यता वर्तवली आहे. यानंतर आता यूरोपीय संघ सतर्क झाला असून आण्विक दुर्घटनेला तोंड देण्यासाठी त्यांनी युक्रेनला किरणोत्सर्गविरोधी औषध पाठवायला सुरुवात केली आहे.

युक्रेनचा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प सध्या रशियन सैन्याच्या ताब्यात आहे. येथील कोणत्याही प्रकारची दुर्घटना युक्रेनसाठी विनाशकारी ठरू शकते, यापासून बचाव करण्यासाठी यूरोपीय संघाकडून युक्रेनला किरणोत्सर्गविरोधी औषध पाठवलं जात आहे. खरं तर, युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात रशियन सैन्याने युरोपातील सर्वात मोठा ‘झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प’ (Zaporizhzhia) आपल्या ताब्यात घेतला होता. हा प्रकल्प रशियन सैन्याच्या ताब्यात असल्यामुळे येथे अणु अपघात किंवा किरणोत्सर्ग गळती होण्याचा धोका वाढला आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी अलीकडेच सांगितलं की, रशियन सैन्याने झापोरिझ्झिया येथील अणुऊर्जा प्रकल्प ताब्यात घेणे, हे अत्यंत धोकादायक आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं (IAEA) लवकरात लवकर या प्रकल्पाला भेट द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. रशियन सैन्याच्या कोणत्याही कारवाईमुळे रिअॅक्टर डिसकनेक्ट झाले तर, येथे मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे.

यूरोपीय संघ युक्रेनला पाठवणार ५५ लाख किरणोत्सर्गविरोधी गोळ्या
याच कारणामुळे यूरोपीय संघाकडून युक्रेनला किरणोत्सर्गविरोधी औषधाच्या ५५ लाख गोळ्या पाठवल्या जात आहेत. यूरोपीय संघाने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी करत म्हटलं की, झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पात दुर्घटनेची भीती लक्षात घेऊन युक्रेनला ५५ लाख ‘पोटॅशियम आयोडाइड’च्या गोळ्या पाठवल्या जात आहेत. यातील ५० लाख गोळ्या किंवा डोस यूरोपीय संघाकडून पाठवण्यात येत आहेत, तर उर्वरित ५ लाख गोळ्या ऑस्ट्रियाकडून पाठवल्या जाणार आहेत. या ५५ लाख ‘पोटॅशियम आयोडाइड’च्या गोळ्यांची एकूण किंमत ५ लाख युरो (४ कोटी रुपये) इतकी आहे.

हे औषध नेमकं काय आहे?
एखादी अणु दुर्घटना घडली किंवा अणुहल्ला झाला तर त्यातून प्राणघातक किरणोत्सर्गाची गळती होते. अणुहल्ला झाल्यास तर त्यातून जीव वाचवणे, जवळपास अशक्य असते. पण अणु दुर्घटना घडली आणि त्यातून किरणोत्सर्गाची गळती झाली तर त्यापासून जीव वाचवणं शक्य आहे. ‘पोटॅशियम आयोडाइड’ या औषधाद्वारे जीव वाचवला जाऊ शकतो. हे औषध रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन शरीरात जाण्यापासून रोखते. या औषधामुळे शरीरातील थायरॉईड गंथी ब्लॉक होतात, परिणामी रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन शरीरात प्रवेश करू शकत नाही.

हे औषध कसे काम करते?
आयोडीन हा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. हे आयोडीन थायरॉईड ग्रंथीमध्ये साठवले जाते. पण जेव्हा किरणोत्सर्गाची गळती होते, तेव्हा त्यातून रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन बाहेर पडते. थायरॉईड ग्रंथी अत्यंत संवेदनशील असल्याने, त्या नॉन-रेडिओअॅक्टिव्ह आयोडीन आणि रेडिओअॅक्टिव्ह आयोडीन यातील फरक ओळखू शकत नाही.

हेही वाचा- युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनीच रशियाचा रॉकेट हल्ला, २२ जणांचा मृत्यू

जेव्हा किरणोत्सर्गाची गळती होते, तेव्हा रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन श्वासाद्वारे किंवा अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करतात. असे झाल्यास किरणोत्सर्ग शरीरभर पसरतो. ‘पोटॅशियम आयोडाइड’ हे औषध थायरॉईड ग्रंथी ब्लॉक करण्याचे काम करते, ज्यामुळे रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन थायरॉईड गंथीत जमा होत नाही. परिणामी किरणोत्सर्ग टाळता येतो.

या औषधाची मात्रा कधी घ्यावी?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, पोटॅशियम आयोडाइड हे औषध किरणोत्सर्ग गळती होण्यापूर्वी किंवा नंतर घेतले जाऊ शकते. या औषधामुळे थायरॉईड ग्रंथीमध्ये आयोडीन जमा होते. अशा स्थितीत रेडिओअॅक्टीव्ह आयोडीनची गळती झाली तरी ते थायरॉईड ग्रंथीमध्ये जमा होऊ शकत नाही.

किरणोत्सर्गाचा शरीराशी संपर्क कसा होतो?
जेव्हा किरणोत्सर्गाची गळती होते, तेव्हा ते दोन प्रकारे शरीराच्या संपर्कात येऊ शकते. पहिला बाह्य संपर्क आणि दुसरा अंतर्गत संपर्क. किरणोत्सर्गाशी बाह्य संपर्क आल्यास ते रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन त्वचेवर जमा होते, जे साबण किंवा कोमट पाण्याने काढले जाऊ शकते. परंतु अंतर्गत संपर्क झाल्यास, ते थायरॉईड ग्रंथीमध्ये जमा होते, ज्यामुळे थायरॉईड कर्करोगाचा धोका संभवतो. लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असतो.

हेही वाचा- विश्लेषण : युक्रेन आणि तैवान संघर्षामधील साम्य अन् फरक

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, युक्रेनमधील चेर्नोबेल अणुऊर्जा प्रकल्पामध्ये १९८६ साली एक अपघात झाला होता. यावेळी किरणोत्सर्गाची गळती झाल्यानंतर रेडिओअॅक्टीव्ह आयोडीन दूध आणि अन्नातून अनेक मुलांच्या शरीरात गेले. परिणामी ४ ते ५ वयोगटातील मुलांमध्ये थायरॉईड कर्करोगाची प्रकरणेही आढळून आली होती.

झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प काय आहे?
झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प १९८४ ते १९९५ च्या दरम्यान उभारण्यात आला. हा युरोपमधील सर्वात मोठा आणि जगातील ९ व्या क्रमांकाचा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. याठिकाणी एकूण सहा रिअॅक्टर आहेत. प्रत्येक रिअॅक्टरमधून ९५० मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. या प्रकल्पातून एकत्रितपणे ५ हजार ७०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. ही युक्रेनच्या एकूण वीजनिर्मितीच्या २५ टक्के इतकी आहे. हा अणुऊर्जा प्रकल्प युक्रेनच्या नाइपर नदीजवळ वसलेल्या इनेरहोदर (Enerhodar) शहरात आहे. हा प्रकल्प डोनबास प्रांतापासून २०० किमी आणि युक्रेनची राजधानी कीव्हपासून ५५० किमी अंतरावर आहे.