अमोल परांजपे

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या युद्धाचा शेवट दृष्टिपथात येत नसतानाच ‘नाटो’ सदस्य राष्ट्रे बेलारूसबाबत सावध झाली आहेत. पोलंडने बेलारूसच्या सीमेवरील आपली कुमक दुप्पट करण्याची घोषणा केली आहे, तर लिथुआनियाने बेलारूस सीमेवरील दोन चौक्या बंद केल्या आहेत.

पोलंड सीमेवर किती सैन्य ठेवणार?

येत्या दोन आठवड्यांत बेलारूसच्या संपूर्ण सीमेवर १० हजार सैनिक तैनात करण्याची घोषणा पोलंडची राजधानी वॉर्सा येथे संरक्षणमंत्री मारिऊझ ब्लास्कझाक यांनी नुकतीच केली. बेलारूसमधून पोलंडमध्ये होत असलेले अवैध स्थलांतर (घुसखोरी) रोखण्यासाठी सीमेवरील कुमक वाढविण्यात येत असल्याचे पोलंडने म्हटले आहे. बेलारूस आणि पोलंडदरम्यानच्या सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी सीमा सुरक्षा दले आणि पोलिसांवर असली, तरी त्यांच्या मदतीला (खरे म्हणजे त्यांच्याऐवजी) हे अतिरिक्त जवान पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे बेलारूस सीमेवर आता थेट लष्कराची गस्त राहणार असून तेथील जवानांची संख्या जवळजवळ दुप्पट होणार आहे. बेलारूसने अद्याप यावर काही प्रतिक्रिया दिली नसली, तरी त्यांच्याकडून असेच एखादे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.

लिथुआनियाच्या निर्णयामागे कारण काय?

लिथुआनिया या बाल्टिक देशाच्या बेलारूस सीमेवर सहा चौक्या आहेत. यापैकी ग्रामीण भागात असलेल्या दोन चौक्या बंद करण्याची घोषणा लिथुआनियाने केली आहे. ‘बदलत्या भूराजकीय स्थिती’मुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगण्यात आले आहे. याबरोबरच लिथुआनियाने आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. “बेलारूसमध्ये जाऊ नका. गेलात तर तिथून परत येण्याचा तुमचा मार्ग खडतर होऊ शकतो,” असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. बेलारूसने याचा निषेध केला असून आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षांसाठी लिथुआनियाच्या राज्यकर्त्यांनी हे पाऊल उचलल्याचा त्यांचा आरोप आहे.

मणिपूरची चर्चा पंतप्रधान मोदींनी मिझोरामवर का नेली? १९६६ साली हवाई दलाने मिझोरामवर बॉम्ब का टाकले? 

वॅग्नर गटाची पोलंड, लिथुआनियाला धास्ती?

रशियामधील बंड फसल्यानंतर खासगी लष्कर ‘वॅग्नर ग्रुप’च्या सैनिकांची रवानगी बेलारूसमध्ये करण्यात आली आहे. आता हे सैनिक पोलंडमार्गे युरोपमध्ये घुसखोरी करून तेथे कारवाया सुरू करतील, अशी धास्ती युरोपला सतावत आहे. लुकाशेन्को आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातील एका संभाषणाने याला बळकटी मिळाली आहे. “त्यांना पश्चिमेकडे जाण्यास सांगितले आहे. वॉर्साला पर्यटनासाठी जाण्यास सांगण्यात आले आहे… पण अर्थात, आपले ठरल्याप्रमाणे मी त्यांना मध्य बेलारूसमध्येच ठेवणार आहे,” असे लुकाशेन्को ‘विनोदाने’ म्हणत आहेत. याचा अर्थ, आज ना उद्या वॅग्नरचे भाडोत्री सैनिक पोलंडमध्ये घुसविण्याची योजना असू शकेल, असेही मानले जात आहे.

बेलारूसमधून पोलंडमध्ये घुसखोरी का होते?

पोलंड हा युरोपीय महासंघ, युरोझोन आणि नाटो या युरोपातील तिन्ही महत्त्वाच्या राजकीय, आर्थिक आणि लष्करी संघटनांचा सदस्य आहे. पश्चिम आशियातील देशांमधून विविध मार्गांनी युरोपमध्ये अवैध स्थलांतर केले जाते. यापैकी एक मार्ग रशियाचा अत्यंत जवळचा मित्र असलेल्या बेलारूसमधून असल्याचा दावा पोलंडने केला आहे. २०२१ पासून बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी धोरणात्मकरीत्या घुसखोरीला खतपाणी घातल्याचा वॉर्साचा आरोप आहे. पोलंडने दिलेल्या आकडेवारीनुसार गतवर्षी १६ हजार आणि यंदा १९ हजार जणांना घुसखोरी करण्यापासून रोखण्यात आले आहे. त्यामुळे बेलारूस सीमेवर अधिक पहारा ठेवणे आवश्यक झाल्याचे पोलंडने म्हटले आहे.

बेलारूसकडून हवाई हद्दीचा भंग?

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला बेलारूसच्या दोन हेलिकॉप्टर्सनी पोलंडच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्याचा आरोपही झाला आहे. सीमाभागात बेलारूसचा युद्धसराव सुरू असताना एमआय-८ आणि एमआय-२४ जातीची ही हेलिकॉप्टर्स पोलंडच्या बीलोविएझा शहरावर दिल्याचा दावा करण्यात आला असून काही नागरिकांनी त्यांची छायाचित्रेही समाजमाध्यमांवर जारी केली आहेत. या छायाचित्रांची पडताळणी केल्यानंतर ही हेलिकॉप्टर्स बेलारूसचीच असल्याचा दावा काही युरोपीय माध्यमांनी केला आहे. अर्थात, बेलारूसच्या लष्कराने हा आरोप फेटाळला असून आपल्याकडूून कोणत्याही प्रकारे हवाई हद्दीचे उल्लंघन झाले नसल्याचे म्हटले आहे. मात्र पुनित यांच्या तालावर नाचणाऱ्या लुकाशेन्कोंवर लक्ष ठेवणे भाग असल्यामुळे पोलंडला सीमेवर सुरक्षा वाढविणे भाग पडले आहे.

ट्रम्प यांच्यावर ‘माफियाविरोधी’ कायद्याखाली कारवाई का? अडचणी वाढणार की कमी होणार?

‘सुल्वाकी गॅप’चे महत्त्व काय?

पोलंड आणि लिथुआनिया या देशांच्या सीमेवर ९५ किलोमीटरचा एक पट्टा ‘सुल्वाकी गॅप’ या नावाने ओळखला जातो. सामरिकदृष्ट्या या परिसराला अत्यंत महत्त्व आहे. रशिया आणि नाटो देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला, तर याच भागात सर्वात आधी चकमकी झडतील, असा अंदाज आहे. रशिया आणि बेलारूस सुल्वाकी गॅपवर अधिकाधिक नियंत्रण मिळवू शकले, तर लिथुआनियासह लाटविया आणि एस्टोनिया या बाल्टिक देशांना त्यांच्या युरोपीय मित्रांपासून तोडणे शक्य होणार आहे. युक्रेननंतर रशियाचे मुख्य लक्ष्य हीच बाल्टिक राष्ट्रे असतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. अर्थातच, आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी या बाल्टिक देशांचे स्वातंत्र्य अबाधित राखणे पोलंडसाठी महत्त्वाचे आहे. पोलंडने सीमांवर सैन्यदल वाढविण्याचे हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे.

amol.paranjpe@expressindia.com