भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने असा निष्कर्ष काढला आहे की, वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर “विद्यमान संरचनेच्या बांधकामापूर्वी एक मोठे हिंदू मंदिर अस्तित्वात होते.” भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे की, हे “वैज्ञानिक अभ्यास आणि निरीक्षणांवर” अवलंबून आहे. या निष्कर्षाला समर्थन देणारे अनेक मजकूर पुराव्याच्या स्वरूपात उपलब्ध आहेत.
१६६९ चा फरमान
विद्यमान काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेले एक मंदिर मुघल सम्राट औरंगजेबच्या आदेशानुसार पाडण्यात आले आणि त्याच्या अवशेषांवर ज्ञानवापी मशीद उभारण्यात आली असे मानले जाते. यासाठी उद्धृत केलेला सर्वात लोकप्रिय प्राथमिक स्त्रोत म्हणजे, साकी मुस्तैद खान यांचे ‘मासिर-इ-आलमगिरी’ हे १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पर्शियन भाषेत इतिहासावर लिहिले गेलेले पुस्तक आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या या अहवालात इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी १९४७ मध्ये या पुस्तकातील परिच्छेदाचे केलेले भाषांतर आहे.
“बादशाह (औरंगजेब) इस्लामची स्थापना करण्यास उत्सुक होते. त्यांनी सर्व प्रांतांच्या राज्यपालांना काफिरांच्या शाळा आणि मंदिरे पाडण्याचे आदेश दिले. अत्यंत तत्परतेने या अविश्वासूंच्या धर्माची शिकवण आणि धर्माचे सार्वजनिक आचरण बंद केले, असे मासिर-इ-आलमगिरीमध्ये लिहिण्यात आले. औरंगजेबाच्या बाराव्या राजवटीत ९ एप्रिल १६६९ रोजी देण्यात आलेल्या या शाही फरमानामुळे काशीतील विश्वनाथ मंदिर आणि मथुरेतील केशवदेव मंदिर दोन्ही नष्ट झाले. हा औरंगजेबाने हिंदू धर्मावर केलेला सर्वात मोठा हल्ला असल्याचे सरकार मानतात.
इतिहासकार एस.ए.ए रिझवी यांनी लिहिले आहे की, “औरंगजेबाची कारकिर्द अकबराच्या सहअस्तित्वाच्या धोरणातून बाहेर येऊ लागली.” १६६५ मध्ये त्याने हिंदू व्यापाऱ्यांच्या आयातीवर मुस्लिमांकडून देय असलेल्या दुप्पट दराने सीमा शुल्क निश्चित केले आणि दोन वर्षांनंतर मुस्लिमांसाठी सीमा शुल्क पूर्णपणे रद्द केले. “जानेवारी १६६९ मध्ये प्रिन्स आझम (औरंगजेबचा तिसरा मुलगा) याच्या लग्नाने… बादशहाला अनेक धर्मनिष्ठेचे अध्यादेश जारी करून आपला सनातनीपणा दाखवण्याची संधी दिली,” रिझवी यांनी ‘द वंडर दॅट वॉज इंडिया व्हॉल दोन (१२०००-१७००) (१९८७) मध्ये लिहिले.
“मंदिरे आणि हिंदू शैक्षणिक केंद्रे पाडण्याचा आदेश सर्वत्र जारी करण्यात आला. बनारसचे प्रसिद्ध विश्वनाथ मंदिर आणि मथुरेचे केशव राय मंदिर, जे दारा शुकोहने दगडी रेलिंगने बांधले होते, त्याचे अवशेषामध्ये रूपांतर झाले होते. हे धोरण अगदी दुर्गम पूर्व बंगाल, पलामाऊ, राजस्थान आणि नंतर दख्खनमध्ये लागू करण्यात आले”, असे रिझवी यांनी लिहिले.
राजकीय हेतू
इतिहासकार रिचर्ड ईटन यांनी असा युक्तिवाद केला की, १६६९ चा फरमान हा “सर्व मंदिरे तत्काळ नष्ट करण्याचा आदेश सर्वसाधारण नव्हता; तर यात “ज्या संस्था विशिष्ट प्रकारचे शिक्षणाचे धडे देतात, त्यांनाच लक्ष्य केले गेले होते.” (‘टेंपल डिसीक्रेशन अँड इंडो-मुस्लिम स्टेट्स’ : जर्नल ऑफ इस्लामिक स्टडीज, २०००) ईटनने ‘मासीर-इ-आलमगिरी’च्या एका ओळीला उद्देशून म्हटले आहे की, औरंगजेबाला विशेषत: बनारसमध्ये ब्राह्मणातील काही अविश्वासू लोकांवर अविश्वास होता. लोक शाळांमध्ये खोट्या पुस्तकांचा आधार घेऊन हे लोक शिकवत होते. तेव्हा हिंदू आणि मुस्लीम विद्यार्थी लांबून या अविश्वासू माणसांकडे यायचे, जे त्यांना भटकवायचे काम करत…असे औरंगजेबाला वाटत असत.”
इतिहासकार सतीश चंद्र यांनी लिहिले आहे, “औरंगजेब मंदिरांकडे विध्वंसक विचारांच्या प्रसाराचे केंद्र म्हणून पाहू लागला. म्हणजेच रूढी-परंपरांना मान्य नसलेल्या कल्पना.” असाही एक सिद्धांत आहे की, आग्रा येथील मुघलांच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पलायनाने अपमानित औरंगजेबाने सूड म्हणून काशी मंदिर नष्ट करण्याचा आदेश दिला.
“१६६९ मध्ये बनारसमधील जमीनदारांमध्ये बंडखोरी झाली, ज्यापैकी काहींनी औरंगजेबाचा कट्टर शत्रू असलेल्या शिवाजीला शाही नजरबंदीतून सुटण्यास मदत केल्याचा संशय होता,”असे ईटनने लिहिले. इतिहासकार ऑड्रे ट्रुशके यांनी लिहिले, “औरंगजेबाने १६६९ मध्ये बनारसच्या विश्वनाथ मंदिराचा बराचसा भाग पाडला. हे मंदिर अकबराच्या कारकिर्दीत राजा मानसिंग यांनी बांधले होते, ज्याचा नातू जयसिंग याने अनेकांच्या मते शिवाजीला १६६६ मध्ये मुघल दरबारातून पळून जाण्यास मदत केली होती.” (औरंगजेब : लाइफ अँड लेगसी ऑफ इंडियाज मोस्ट कॅन्टराव्हरशीयल किंग (२०१७)) सतीश चंद्र यांनीही मान्य केले की, “स्थानिक घटकांशी संघर्ष झाल्यामुळे त्याने (औरंगजेब) शिक्षा आणि चेतावणी म्हणून प्रदीर्घ हिंदू मंदिरे नष्ट करणे कायदेशीर मानले..”
ज्ञानवापी मशीद उभारली
नष्ट झालेल्या मंदिराच्या ठिकाणी असलेली मशीद १६७० किंवा ८० च्या दशकात उभारण्यात आल्याची शक्यता आहे.
ट्रुशके यांनी लिहिले, ” उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या भिंतीचा एक भाग इमारतीमध्ये होता.” “हे पुनर्वापर मुघल सत्तेला विरोध केल्यामुळे करण्यात आला असेल.” उद्ध्वस्त मथुरा मंदिरावर बांधलेल्या शाही ईदगाहच्या व्यतिरिक्त ज्ञानवापी मशिदीचा संदर्भ अद्यापही आढळलेला नाही. मुघल दरबारातील कागदपत्रांमध्येही याचा उल्लेख आढळत नाही.
हेही वाचा : दक्षिण कोरियातील पुरुषांना लग्नासाठी मुलीच मिळेनात; भारतातही रखडले विवाह, कारण काय?
सध्याचे काशी विश्वनाथ मंदिर हे मशिदीच्या पुढे १८ व्या शतकात राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते.