Are you impatient? Blame it on evolution: कोणाचीही वाट पाहणं किंवा कशाचीही वाट बघणं नशिबी आलं की, पुसटशी का होईना कपाळावर आठी आल्याशिवाय राहात नाही. म्हणूनच आपल्याला वाट पाहायला आवडत नाही आणि आपण वाट पाहायचा प्रसंग टाळण्यासाठी पैसे द्यायलाही तयार असतो. म्हणूनच जलद शिपिंग, फास्ट फूड सर्व्हिसेस आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग सारखी उद्योग क्षेत्रं नफ्यात आहेत. ही क्षेत्रं वाट पाहाण्याचा कालावधी कमी करतात. याच सर्व पार्श्वभूमीवर खरंच माणूस वाट पाहाण्याचा प्रसंग टाळतो का हे तपासून पाहण्यासाठी अभ्यासकांनी एक प्रयोग केला होता. या प्रयोगात एका गटातील लोकांना लगेचच £100 (रु. ११,०९६) देऊ केले तर त्यांना हेच पैसे एका वर्षाने घेतल्यास £110 (रु. १२,२००) इतके मिळतील असे सांगण्यात आले. वर्षभराने अधिक पैसे मिळणार असूनही बहुसंख्य लोकांनी £100 लगेच घेण्याचा पर्याय निवडला. त्यामुळेच लोकं वाट पाहण्याचा पर्याय निवडत नाहीत, हे स्पष्ट होते. परंतु हे त्यांच्या फायद्याचं आहे का? बहुतांश वेळा अधिरता ही अविवेकी किंवा संकुचित दृष्टिकोन म्हणून समजली जाते. असं असलं तरी मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र ही क्षेत्रे अधिरतेला वास्तव जगातील परिस्थितीला तर्कसंगत प्रतिसाद मानतात. म्हणूनच याच अधिरतेचा शोध अभ्यासकांनी सजीव उत्क्रांतीत घेण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्क्रांतीच्या मुळाचा शोध

मानवी स्वभावात आढळणारी अधिरता नक्की कशी विकसित होत गेली, या प्रश्नाचं उत्तर संशोधक अनेक कालखंडापासून शोधत आहेत. हा स्वभाव किंवा हा प्रतिसाद मानवाच्या उत्क्रांतीबरोबरच विकसित झाला. अलीकडच्या संशोधनात सजीव उत्क्रांतीच्या इतिहासाने आपल्या अधिरतेवर परिणाम केल्याचे सिद्ध झाले आहे. हे सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी गणिती मॉडेल्सचा वापर केला. यासाठी संशोधकांनी एक उदाहरण दिले आहे. यात एक मुख्य कल्पना अशी आहे की, एका मोठ्या लोकसंख्येच्या प्रदेशात एकसारखे लोक आहेत. त्यांना दोन पर्याय दिले. पहिल्या पर्यायात लगेच परंतु लहान बक्षीस मिळणार होते, तर दुसऱ्या पर्यायात मोठे परंतु उशिरा मिळणार होते. यात दोन शिकारी क्षेत्रे होती. एक जवळचे होते तर एक दूरचे. यापैकी एक पर्याय निवडायचा होता. दूरच्या पर्यायासाठी वाट पाहाणं होतं. किंबहुना इच्छित फलप्राप्ती मिळण्यापूर्वीच मृत्यू येण्याचीही शक्यता होती. जिवंत राहिले तरीही फळं नष्ट होण्याची किंवा प्रतिस्पर्ध्याने चोरण्याची शक्यता होती. म्हणूनच जवळचा पर्याय निवडण्यातच शहाणपण मानले जाते. हाच भाग प्राण्यांचाही बाबतीत आढळून आला. काही अंतरावर असलेली मोठी शिकार आणि हातात आलेला लहानसा पक्षी यापैकी लहानसा पक्षी हाच पर्याय निवडण्यात आला किंवा तोच फायद्याचा आहे, असे मानले गेले. ही उदाहरणं किंवा अभ्यासकांनी केलेले प्रयोग वास्तविक जगाची सोपी रूप असली तरी आजच्या जगातील मानवी अधिरतेचे स्पष्टीकरण देण्यासाठी पुरेशी नाहीत. ही प्रवृत्ती मानव किंवा इतर प्राण्यांमध्ये कशी विकसित झाली हे शोधण्यासाठी उत्क्रांतीचा अभ्यास उपयुक्त ठरतो.

अनिश्चितता आणि अधीरता

बहुतेक संशोधनात एखाद्या प्रसंगी निर्णय घेताना लोक मोठ्या प्रमाणात अधीरता दर्शवतात. जिथे कोणताही धोका नसतो आणि संयम राखणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरते अशा परिस्थितीत लोकं मोठ्या प्रमाणात अधीरता दर्शवतात. याच वर्तनाचे स्पष्टीकरण देताना उक्रांतीचा दाखला दिला जातो. भविष्यातील मूल्य ठरवण्याची उत्क्रांत झालेली प्रवृत्ती यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. जग अनिश्चित आणि धोकादायक आहे या भावनेतूत ही प्रवृत्ती विकसित झालेली आहे. उत्क्रांतीच्या प्रारंभिक कालखंडात शिकारी मानवाच्या आयुष्यातील अनिश्चितता यातून प्रकट होते. कदाचित आज अनेक प्रसंगात ही अनिश्चितता अस्तित्त्वात नसेलही परंतु उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर ती सजीव स्वभावात रुजत गेल्याचा तर्क अभ्यासक मांडतात.

संयम बाळगणाऱ्यांना चांगल्या गोष्टी मिळतात

किंबहुना वरील प्रयोगाचे स्पष्टीकरण देताना अभ्यासक सांगतात £110 हे £100 पेक्षा का चांगले, हे समजून घेण्यासाठी आपण अडखळतो. आता मिळणारा फायदा आणि कालांतराने मिळणार नफा यात नेमका काय फरक आहे हेच लोकांना अनेकदा समजत नाही. यासाठी २०१२ साली मानसशास्त्रज्ञ मार्क शोल्टेन आणि शेन फ्रेडरिक यांनी केलेल्या प्रयोगाचे उदाहरण महत्त्वाचे ठरू शकते. या प्रयोगात सहभागी झालेल्या लोकांना दोन पर्याय दिले गेले. पहिल्या पर्यायात लोकांना लगेचच £700 (रु. ७७,६००) मिळणार होते तर दुसऱ्या पर्यायात एका वर्षाने £700 (रु. ७७,६००) अधिक £42 (₹४,६००) इतके मिळणार आहेत. ज्यावेळेस निवड फक्त पैशाच्या रकमेच्या स्वरूपात दिली गेली, तेव्हा लोक अधीर होते. परंतु, £42 हे अजून सहा टक्के व्याज आहे असे सांगितले गेले, तेंव्हा मात्र लोकांनी संयमी प्रतिसाद दिला. लोकांना माहीत आहे की दरवर्षी सहा टक्के व्याज मिळणे ही उत्तम गुंतवणूक आहे. परंतु, बहुतांश लोक हे गणित करत नाहीत आणि त्यांना £42 ही रक्कम £700 च्या तुलनेत खूपच कमी वाटते. उत्क्रांतीच्या या सिद्धांताशी विसंगत ठरणारा आणखी एक मुद्दा म्हणजे नुकसानाच्या बाबतीत लोकांची येणारी प्रतिक्रिया. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीसमोर £100 चे बिल आत्ताच भरायचे की नंतर भरायचे? हा पर्याय असेल तर अनेक लोक, अगदी बहुसंख्य, आत्ताच पैसे भरायला प्राधान्य देतात. इतकेच नव्हे तर काही लोक £100 ऐवजी £110 आत्ताच भरणे पसंत करतात, पण नंतर £100 भरण्यास तयार नसतात. तरीही, भविष्यात हे बिल भरावे लागणार नाही किंवा तुम्ही ते भरायला जाण्यापूर्वीच ते रद्द होण्याची शक्यता तुम्हाला शक्य तितका उशीर करण्यास प्रवृत्त करायला हवी. पण प्रत्यक्षात बहुतेक लोक असे करत नाहीत. याचे एक स्पष्टीकरण म्हणजे कर्जाविषयी मूलभूत अस्वस्थता हे आहे. या अस्वस्थला स्पष्ट उत्क्रांतीजन्य आधार नाही. पण त्याचा धार्मिकतेशी आणि सांस्कृतिक मूल्यांशी संबंध आढळतो. या गुंतागुंतीच्या प्रवृत्ती (उदाहरणार्थ, नकारात्मक परिणामांसाठी संयम ठेवणे) नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेद्वारे स्पष्ट करता येतील का, की त्या माणसाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासानंतर आल्या, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.

उत्क्रांतीचा सिद्धांत हा मानवी निर्णय प्रक्रिया समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. मात्र आधुनिक जग हे त्या वातावरणापेक्षा खूप भिन्न आहे, असे अभ्यासक नमूद करतात. अधीरता ही मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग आहे आणि तिची मुळे उत्क्रांतीत खोलवर रुजलेली आहेत. तत्काळ लाभ निवडण्याची प्रवृत्ती पूर्वजांच्या अस्तित्वाशी निगडित होती, कारण भविष्यातील अनिश्चिततेमुळे विलंबित लाभाचा भरोसा नव्हता. आजही, हीच मानसिकता आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक निर्णयांवर प्रभाव टाकते. तथापि, आधुनिक जगात आर्थिक नियोजन, गुंतवणूक आणि धैर्याने घेतलेल्या निर्णयांचे फायदे मोठे असतात. म्हणूनच, संयम बाळगणाऱ्या व्यक्तींना अधिक चांगल्या संधी आणि फायदे मिळतात. त्यामुळे, अधीरता आणि संयम यांच्यातील संतुलन साधणे हे यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहे.