हमासच्या भीषण हल्ल्यानंतर इस्रायलला प्रत्युत्तर देता यावे म्हणून आवश्यक ती मदत देण्यासाठी अवघ्या काही तासांत अमेरिकेने आपल्या युद्धनौका व लढाऊ विमाने या प्रदेशात पाठविण्यास सुरुवात केली. पाठोपाठ इस्रायलला मोठ्या प्रमाणात लष्करी सामग्रीचा ओघ सुरू झाला. अर्थात हे प्रथमच घडले नाही. या राष्ट्राच्या स्थापनेपासून अमेरिका इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. उभयतांचे ऐतिहासिक संबंध लष्करी मैत्रीतून अधिक दृढ झाले. इस्रायल-हमासच्या संघर्षात त्याची प्रचिती मिळते. इस्रायलला सर्वार्थाने बळ, संरक्षण कवच देताना लढाईत अन्य देशाचा शिरकाव व हस्तक्षेप रोखण्याचे नियोजन अमेरिकेने केले आहे.
हमासच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने काय केले?
हमास-इस्रायलमध्ये युद्धाला तोंड फुटल्यानंतर अमेरिकेने सर्वप्रथम यूएसएस जेराल्ड आर फोर्ड या विमानवाहू नौकेला दस्त्यासह तत्काळ पूर्वेकडील भूमध्य समुद्रात हलवले. अमेरिकेची ही सर्वात प्रगत विमानवाहू नौका आहे. जगातील विशाल आकाराची नौका म्हणून ती ओळखली जाते. तिच्या दस्त्यात मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचा मारा करणाऱ्या क्रुझर आणि चार विनाशिकांचा समावेश आहे. यूएसएस ड्वाइट डी. आयसेनहॉवर विमानवाहू नौकेच्या दस्त्यालाही (आयकेईसीजीएस) भूमध्य समुद्रात मार्गस्थ होण्याचे आदेश देण्यात आले. एकात्मिक लढाऊ शस्त्रास्त्र प्रणाली सामावणाऱ्या या नौकेत पाच हजार खलाशी आहेत. याशिवाय, या क्षेत्रात एफ – १५, एफ – १६ आणि ए – १० या लढाऊ विमानांच्या तुकड्यांसह जगातील सर्वात प्रगत मानल्या जाणाऱ्या एफ – ३५ विमानांमध्ये वाढ करण्यात आली. पाणी-जमिनीवर कारवाईसाठी सुसज्ज यूएसएस बटानमधील तीन जहाजे हजारो नौसैनिकांना घेऊन आखाती प्रदेशातून तिकडे मार्गस्थ झाली. या क्षेत्रात आधीपासून कार्यरत जहाजांची तैनाती सहा महिन्यांनी वाढविण्यात आली. युद्ध कार्यवाहीत जलद प्रतिसाद देण्यासाठी दोन हजार सैनिकांना सतर्क करण्यात आले.
हेही वाचा – विश्लेषण : महामुंबई परिसरात एमएमआरडीए प्रकल्पांच्या खर्चात फुगवटा का होतोय?
अल्पावधीत शस्त्रपुरवठा कसा?
इस्रायलच्या परिसरात फौजफाटा वाढविताना दुसरीकडे अमेरिकेने मित्राला युद्धसामग्री आणि लष्करी उपकरणे वितरणाचे काम समांतरपणे हाती घेतले. अमेरिकेची सी – १७ विमाने ही सामग्री घेऊन इस्रायलच्या हवाई तळांवर उतरत आहेत. नेमकी कोणती युद्धसामग्री पुरविली त्याची कुणी स्पष्टता केली नाही. यात लहान बॉम्ब, रॉकेट्स हवेत भेदू शकणारे क्षेपणास्त्र (इंटरसेप्टर) आणि अचूक मारा करू शकणाऱ्या मार्गदर्शित शस्त्रांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविली जाते. अमेरिकेने आयर्न डोम प्रणाली इस्रायलला आधीच दिली आहे. तिच्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची जलदपणे पूर्तता केली जात आहे. इस्रायलला दिलेल्या सामग्रीत जेडीएएम संचांचाही अंतर्भाव आहे. विमानातून डागल्या जाणाऱ्या सर्वसाधारण बॉम्बला हा संच स्मार्ट बॉम्बमध्ये परिवर्तित करतो. जीपीएस प्रणाली व मार्गक्रमणाच्या व्यवस्थेने हे बॉम्ब अचूक लक्ष्यभेद करतात. मध्यंतरी रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनला हे संच देण्यात आले होते.
लष्करी कारवाईत अप्रत्यक्ष पाठबळ कसे?
हमास विरोधातील लढाईत अमेरिकेची विशेष कार्यवाही पथके इस्रायलच्या सैन्यासोबत नियोजन करीत आहे. यासाठी अमेरिकन पथकांचा विशेष कक्षही स्थापन करण्यात आला आहे. अमेरिकन सैन्यातील एकही जवान प्रत्यक्ष जमिनीवर युद्धात सहभागी झालेला नाही. तसे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. मात्र गुप्त माहिती मिळवणे, पाळत ठेवणे आदी माध्यमातून जमिनीवरील मोहिमेत अमेरिका मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. आघाडीवर इस्रायली सैन्य असले तरी लष्करी कारवाई अमेरिकेच्या मार्गदर्शनावर पुढे जात आहे.
हेही वाचा – विश्लेषण : मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही अधिक प्रदूषित का बनतेय?
प्रचंड फौजफाटा तैनातीचा उद्देश काय?
इस्रायलच्या शत्रूंना परिस्थितीचा फायदा घेण्याची कुठलीही संधी मिळू नये, असा अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्याकरिता प्रचंड फौजफाटा पश्चिम आशियात हलवण्यात आला. इस्रायल-हमासमधील युद्धाचे रुपांतर व्यापक प्रादेशिक संघर्षात होऊ शकते, याची अमेरिकेला चिंता आहे. त्याचे प्रतिबिंब तैनातीतून उमटते. दृश्य स्वरुपातील तैनातीने या क्षेत्रात मानसिक जरब निर्माण होईल. जेणेकरून हेजबोला, इराण व इतरांना युद्धापासून दूर ठेवता येईल, असा त्यांचा कयास आहे. जमीन-पाण्यावर चालणाऱ्या नौकांद्वारे (अँफिबियन्स) प्रतिकूल प्रदेशात अमेरिकी सैन्य शिरकाव करू शकते. युद्धनौका, लढाऊ विमाने आणि पाळत ठेवणारी विमाने इराण व पश्चिम आशियातील इतर अतिरेकी कारवायांवर प्रभावीपणे नियंत्रण राखत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याच आधारावर अमेरिकेने यावेळी ती रणनीती ठेवली आहे.
लष्करी मैत्री किती व्यापक?
इस्रायलने १९४८ मध्ये स्वतंत्र राष्ट्राची घोषणा केली, तेव्हा इस्रायलचा राष्ट्राचा दर्जा मान्य करणारा अमेरिका हा जगातील पहिलाच देश होता. स्थापनेपासून इस्रायलशी त्याचे अतिशय घनिष्ठ संबंध असून लष्करी मैत्रीत त्याचे प्रतिबिंब उमटते. इस्रायलच्या सुरक्षेसाठी अमेरिका दरवर्षी ३.३ अब्ज डॉलरचा वित्त पुरवठा, लष्करी सामग्री उपलब्ध करते. क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रमास वेगळा निधी दिला जातो. यात रॉकेट्स हवेतच निष्प्रभ करण्याची क्षमता असणारे आयर्न डोम, लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी बाण, तर मध्यम पल्ल्याची रॉकेट्स यांचा समावेश आहे. मागील काही वर्षांत उभयतांमधील लष्करी करार-मदार डोळे दीपवणारे आहेत. संयुक्त लष्करी संशोधन व शस्त्रास्त्र विकासात त्यांची भागिदारी आहे. हमासने २०२१ मध्ये इस्रायलवर काहीसा असाच हल्ला केला होता. तेव्हा अमेरिकेने शस्त्रास्त्रांचे भांडार इस्रायलसाठी खुले केले होते. यावेळी त्याची पुनरावृत्ती होत असून त्यास फौजफाट्याची जोड मिळाली आहे.