शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था जुनी व जीर्ण झाली असल्यामुळे वारंवार जलवाहिन्या फुटणे, गळती यांसारख्या घटना घडतात. त्यामुळे मुंबई महानगरपालिकच्या पाणी पुरवठा प्रकल्प विभागाने गेल्या काही वर्षांपासून बोगदे बांंधण्याचे काम हाती घेतले आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरानंतर १०० किलोमीटर जलबोगदे असणारे मुंबई महानगर जगातील दुसरे शहर ठरले आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पालिकेने नुकतेच वडाळा ते परळ दरम्यानच्या ५.२५ किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जलबोगद्याचे खणनही पूर्ण केले आहे. त्या निमित्ताने जलबोगद्यांच्या उपयुक्ततेविषयी….

मुंबईतील पाणीपुरवठ्याची यंत्रणा कशी आहे?

मुंबई शहराला तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा, भातसा या मुख्य धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. हे जलस्रोत मुंबईपासून १०० किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर असतात. या सर्व जलस्रोतांमधून पाणी भूमिगत जलबोगद्यांद्वारे किंवा जलवाहिन्यांद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाते. जलशुद्धीकरण केंद्रापासून पाणी शहराच्या विविध भागांत जलवाहिन्यांद्वारे पोहोचवले जाते. धरणातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचवणारी व्यवस्था ही प्राथमिक स्तर व्यवस्था म्हणून ओळखली जाते. तर जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी शहरात ठिकठिकाणी असलेल्या २७ सेवा जलाशयापर्यंत पोहोचवले जाते. या जलवितरण जाळ्यास द्वितीय स्तर वहन व्यवस्था म्हणतात. तर सेवा जलाशयातील पाणी जलवाहिन्यांद्वारे सुमारे साडेतीन लाख जलजोडण्यांद्वारे घरोघरी पोहोचवले जाते. या प्रणालीला तृतीय स्तर प्रणाली म्हणतात.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates in Marathi
Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Updates : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!

जलबोगद्यांची गरज काय?

मुंबईसारख्या अवाढव्य शहरात पाणी पुरवठ्याची यंत्रणा अनेक वर्षे जुनी आणि गुंतागुंतीची आहे. पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून शहरात पाणी पुरवठ्यासाठी सध्या भल्यामोठ्या जलवाहिन्या आहेत. या जलवाहिन्या काही ठिकाणी जमिनीवर आहेत. तर काही जलवाहिन्या जमिनीखाली पण जमिनीलगत आहेत. त्यामुळे त्या सुरक्षित नाहीत. अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडतात. कधी जलवाहिनी फुटल्याचे लक्षात येते तर अनेकदा जलवाहिनीची गळती कळतही नाही. काही ठिकाणी जलवाहिन्या फोडून त्यातून पाणीचोरीच्या घटनाही घडतात. त्यामुळे एकूण पाणी पुरवठ्यापैकी तब्बल २७ टक्के पाणी वाया जाते. त्याचबरोबर पाणी गळती सुरू झाली की दूषित पाण्याचीही समस्या वाढते. त्यामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता बळावते. पाणी पुरवठ्याची ही यंत्रणा अधिक सुरक्षित व सक्षम करण्यासाठी जलबोगदे तयार करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी घेतला. टप्प्याटप्प्याने हे जलबोगदे बांधले जात असून आतापर्यंत १०० किमीचे जलबोगदे तयार करण्यात आले आहेत .

हेही वाचा >>>विश्लेषण: एक रुपयात पीक विमा योजनेची अंमलबजावणी कशी होणार?

जलबोगदे बांधताना आव्हाने कोणती?

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात जमिनीखालीदेखील जागा शिल्लक नाही. असे असतानाही शंभर मीटर खोलीवर हे बोगदे तयार करण्यात आले आहेत. मात्र या जलबोगद्यांसाठी खणन करताना अनेक अडचणींचा सामना यंत्रणेला करावा लागतो. भूगर्भात प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे येतात. काही ठिकाणी माती भुसभुशीत असते तर काही ठिकाणी खडक असतात. कधी अचानक जमिनीखालील झरे आड येतात. वारंवार बदलणारे भूगर्भीय स्तर तसेच बोगद्यात खडक ढासळणे अशा प्रकारच्या अनेक आव्हानांना बोगद्याचे खणन करताना तोंड द्यावे लागते. पवई ते घाटकोपर दरम्यान जलबोगदा खणण्याचे काम अशाच आव्हानांमुळे सुमारे दहा वर्षे रखडले होते. त्या दरम्यान जमीन खचून खड्डा तयार झाला होता. त्यामुळे बोगदा खणणारे यंत्र बंद पडले होते. हे यंत्र बाहेर काढणेही कठीण झाले होते. त्यामुळे हे काम बंद करून नव्याने कंत्राटदार नेमावा लागला. तसेच आधीच्या कंत्राटदाराला नुकसान भरपाईही द्यावी लागली होती.

आतापर्यंत कोणकोणते बोगदे तयार केले?

पालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्प विभागाने मरोशी – माटुंगा बोगद्याचे काम २०१५ मध्ये पूर्ण केले. मरोशीपासून रुपारेल महाविद्यालयापर्यंत वाकोला आणि माहीममार्गे पूर्ण झालेल्या १२.२५ किमी लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण होऊन कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे वरळी, प्रभादेवी, दादर, शिवाजी पार्कपासून थेट बांद्रा पाली हीलपर्यंतच्या जुन्या इमारतींच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा झाली आहे. गुंदवली- कापूरबावडी आणि कापूरबावडी ते भांडूप संकुल हे १५.१ किमी लांबीचे बोगदे पूर्ण करण्यात आले. भविष्यात गारगाई पिंजाळ प्रकल्पातून मिळणारे पाणी वाहून नेण्याची क्षमता या बोगद्यांमध्ये आहे.पवई ते वेरावली आणि पवई ते घाटकोपर या ६.६ किमी. लांबीच्या बोगद्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. चेंबूर ते परळ या ९.७ किमी लांबीच्या जलबोगद्याचे कामही नुकतेच पूर्ण झाले आहे.

हेही वाचा >>>पाळीव प्राणी विसरत चाललेत स्वत:चं नैसर्गिक वागणं; काय आहेत त्यामागची कारणं?

पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार का?

पाणी पुरवठ्याची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबई अनेक ठिकाणी जलबोगदे तयार केले जात आहेत. पाणी चोरी आणि पाणी गळती थांबल्यामुळे पाण्याचा दाब वाढून पाणी पुरवठ्यात सुधारणा होईल, असा विश्वास पालिकेच्या यंत्रणेला आहे. पालिकेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय प्रणालीमध्ये जलवाहिन्या आणि जलबोगदे यांचा समावेश आहे.