रशिया-युक्रेन युद्धाला आता सहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. या युद्धामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे विपरीत परिणाम झाला असून परिणामता अनेक देशांना महागाई आणि बेरोजगारी सारखा समस्या भेडसावत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या युद्धाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या भविष्यावर होत असल्याचा अहवाल नुकताच युनिसेफकडून (UNICEF) प्रसिद्ध करण्यात आला आहे. युनिसेफच्या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे? या युद्धाचा लहान मुलांवर कसा परिणाम होतो आहे? जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण : मुस्लीम समाजात मुलगी १५ वर्षांची असताना लग्न करता येतं? सर्वोच्च न्यायालयातील नेमकं प्रकरण काय?

युनिसेफच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर २२ देशातील परिस्थितींचा अभ्यास केल्यानंतर युनिसेफकडून एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात रशिया-युक्रेन युद्धाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या भविष्यावर होत असल्याचे म्हटले आहे. तसेच या युद्धामुळे पूर्व युरोप आणि मध्य आशियातील ४ दशलक्ष लहान मुलांवर गरिबी ओढवली असून २०२१च्या तुलनेत हे प्रमाण १९ टक्क्यांनी वाढलं आहे. याचा सर्वाधिक फटका रशिया आणि युक्रेनमधील मुलांना बसला असल्याचेही या अहवालातून सांगण्यात आले आहे.

हेह वाचा – विश्लेषण : ओलिसाला अपहरणकर्त्याच्याच प्रेमात पाडणारा ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ नेमका आहे तरी काय? जाणून घ्या यामागील रंजक कथा!

रशिया-युक्रेन युद्धाचा लहान मुलांवर कसा परिणाम?

या युद्धामुळे युरोप आणि मध्य आशियात अनेक परिवारांवर गरिबी ओढवली आहे. या परिवारांच्या उत्पन्नाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग इंधन आणि रोजच्या गरजांवर खर्च होतो आहे. त्यामुळे लहान मुलांचे शिक्षण आणि आरोग्याकडे दुर्लेक्ष होण्याची शक्यता आहे. तसेच लहान मुलांचे शोषण आणि हिंसाचार वाढण्याच्या घटनेत वाढ होण्याचा धोका आहे. एकंदरितच लहान मुलांचे भविष्य धोक्यात येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आता या लहान मुलांना आणि त्यांच्या परिवारांना पाठिंबा देण्याची गरज असल्याचे प्रतिक्रिया युनिसेफचे प्रादेशिक संचालक अफसान खान यांनी दिली आहे.