तब्बल १२० मीटर म्हणजेच ४०० फूट उंच आणि एकूण इंधनासह वजन पाच हजार टन एवढं भरेल असं अवाढव्य आकाराचं Starship नावाचे रॉकेट हे अमेरिकतल्या टेक्सास इथे पहिल्या उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. एका दमात अवकाशात म्हणजेच पृथ्वीच्या कक्षेबाहेर १०० किलोमीटर उंचीवर तब्बल १०० टनापेक्षा जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता या रॉकेटमध्ये आहे, म्हणजेच एकाच वेळी १०० अंतराळवीर हे अवकाशात नेण्याची क्षमता या रॉकेटमध्ये आहे. जगात संरक्षण क्षेत्र असो किंवा अकाश तंत्रज्ञान क्षेत्र असो यामधील आत्तापर्यंतचे सर्वात मोठे आणि शक्तीशाली रॉकेट म्हणून आता Starship कडे बघितले जात आहे.
एलॉन मस्क यांचे स्वप्न
काही वर्षांपूर्वी अब्जाधीश एलॉन मस्क यांनी SpaceX – स्पेस एक्स कंपनीची स्थापना केली. तीन वर्षांपूर्वी अवकाशात अंतराळवीरांना पाठवणारी पहिली खाजगी अवकाश कंपनी म्हणून या SpaceX ने कमागिरी फत्ते केली होती. आता नियमित समानवी अवकाश मोहीमा आणि उपग्रह प्रक्षेपण मोहीमा या कंपनीच्या सुरु आहेत. एवढे यश मिळाले असतांना एलॉन मस्क यांनी फक्त चंद्र नाही तर थेट मंगळ ग्रहापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं काही वर्षांपूर्वी जाहीर केलं होतं. तेव्हा या संकल्पनेतील पहिला टप्पा हा अतिभव्य रॉकेट निर्मितीचा होता, या रॉकेटमधून अंतराळवीर आणि विविध आवश्यक उपकरणे ही चंद्र आणि थेट मंगळ ग्रहापर्यंत नेली जाणार आहेत. तेव्हा हे सर्व प्रत्यक्षात आणणाऱ्या रॉकेटची – Starship ची निर्मिती विविध चाचण्यातून पुर्ण झाली असून लवकरच ते पहिले उड्डाण करणार आहे.
Starship रॉकेट नेमकं कसं आहे?
Starship रॉकेटचे दोन टप्पे आहेत. पहिला टप्पा हा Super Heavy booster या नावाने ओळखला जातो. एकुण ६९ मीटर उंचीच्या या पहिल्या टप्प्यात एकुण ३३ छोटी इंजिन आहेत. तब्बल ३४०० टन वजनाचे इंधनाचे ज्वलन करत या इंजिनमुळे रॉकेटला अवकाशत झेप घेण्यासाठी मोठी गती मिळणार आहे. तर दुसऱ्या टप्पा हा Starship या नावाने ओळखला जातो, जो एक वाहक म्हणून मुख्य भूमिका बजावणार आहे. हा टप्पा ५० मीटर उंचीचा असून अवकाशात अधिक वेग पकडण्यासाठी, दिशा बदलवण्यासाठी यामध्ये सुमारे १२०० टन इंधन असणार आहे. Starship मध्ये पुरेशी जागा असून विविध आकार असलेले १०० टन पेक्षा जास्त वजन हे सामावले जाऊ शकते. थोडक्यात भविष्यात अंतराळवीर आणि आवश्यक उरकरणे यामधून वाहून नेली जाणार आहेत. आत्तापर्यंत जगात विविध प्रकारच्या रॉकेटची निर्मिती करण्यात आली आहे. पण या सर्वांच्या तुलनेत १२० मीटर उंचीचे Starship रॉकेट हे अतिभव्य आणि सर्वात मोठे ठरले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे Super Heavy booster आणि Starship या वाहकाचा पुर्नवापर केला जाणार आहे. त्यामुळे ऐरवी महागडी ठरु शकणाऱ्या या मोहिमेत अब्जावधी डॉलर्सची बचत होणार आहे. त्यामुळे एक मोहिम झाल्यावर दोन्ही टप्प्यांचा, खास करुन Super Heavy booster चा पुन्हा पुन्हा वापर करणे शक्य होणार आहे.
Starship चे पहिले उड्डाण कसे असेल?
चंद्र आणि मंगळ ग्रहापर्यंत अंतराळवीरांना घेऊन जाण्यासाठी आवश्यक रचना जरी Starship ची करण्यात आली असली तरी पहिल्या उड्डाणात कोणत्याही प्रकारच्या उपकरणांचा किंवा अंतराळवीरांचा समावेश करण्यात आलेला नाही. पहिल्या उड्डाणात Starship रॉकेटच्या पहिला टप्पा हा ठराविक उंची गाठल्यावर समुद्रात कोसळेल तर दुसरा टप्पा Starship हा पृथ्वीभोवती एक प्रदक्षणा पूर्ण करेल आणि समुद्रात कोसळेल. उड्डाणापासून ही सर्व प्रक्रिया ९० मिनीटांत पूर्ण होणार आहे. या पहिल्या उड्डाणाच्या माध्यमातून Starship रॉकेटची क्षमता तपासली जाणार आहे.
Starship रॉकेट का महत्त्वाचे आहे?
येत्या काळात चंद्रावर मानवी मोहीमा या नियमित सुरु होणार आहेत. 2030 पर्यंत चंद्रावर मानवी वस्ती उभारण्याची अमेरिकेच्या ‘नासा’ ( NASA ) ची योजना आहे. अशा मोहिमांकरता एकदा दमात जास्तीत जास्त अंतराळवीर पण त्यापेक्षा आवश्यक उपकरणे वाहून नेणे आवश्यक ठरणार आहे. त्यासाठी Starship सारखे रॉकेट महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
सध्या तरी मंगळ ग्रहापर्यंत पोहण्यासाठी काही महिन्यांचा अवधी लागत आहेत. हा कालावधी भविष्यात काही आठवड्यापर्यंत येईल यात शंका नाही. पण एवढ्या दूर कोट्यावधी किलोमीटर अंतरापर्यंत मोठी उपकरणे-जास्तीत जास्त सामान वाहून नेणे हे एक आव्हान असणार आहे. तेव्हा अशा मोहिमांमध्ये Starship सारखी रॉकेट आणि त्यामधील Starship सारखे वाहक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
सध्या तरी या Starship रॉकेटचे उड्डाण हे काही तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. येत्या गुरुवारी उड्डाणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही पहिली मोहिम जर यशस्वी झाली तर भविष्यात चंद्रावरील मानवी वस्ती करण्याच्या दृश्टीने अधिक वेगाने पावले पडतील यात शंका नाही.