पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सिडकोने गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी जाहीर केलेली २६ हजार घरांची ‘माझे पसंतीचे’ घर योजना वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त ठरू लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असताना मोठा गाजावाजा करत सिडकोने ही योजना जाहीर केली. खारघर, वाशी, बामणडोंगरी, तळोजा, मानसरोवर, कळंबोली आणि पनवेल या सात उपनगरांमध्ये ही घरे उभारली जाणार आहेत. या योजनेच्या पहिल्याच जाहीरातीपासून ही पसंतीची योजना अनेकांसाठी नापंसतीची ठरू लागली. गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही ‘परवडणारी’ घरे ‘महागच’ ठरल्याचे चित्र निर्माण झाले असताना घरांचे आकारमानही कमी असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. या वादात सिडको प्रशासनाने मात्र आमची घरे बिल्डरांच्या तोडीस तोड असल्याचा दावा करत सारवासारव सुरू केली आहे.

सिडको घरांचा इतिहासही वादग्रस्त कसा?

सिडकोने १९७० च्या दशकापासून नवी मुंबईमध्ये अनेक गृहनिर्माण योजना राबवून आजवर दीड लाखांहून अधिक घरे उभारली आहेत. नवी मुंबईची निर्मिती होत असताना येथील गृहनिर्मितीची जबाबदारी सिडकोच्या खांद्यावरच होती. जुन्या ठाणे-बेलापूर अैाद्योगिक पट्ट्यातील कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर सिडकोचे तेव्हाचे अधिकारी, कर्मचारी घर विक्रीचे अर्ज घेऊन ग्राहकांच्या शोधात उभे राहात. ‘कुणी घर घेता का घर’ असे तेव्हाचे चित्र होते. वाशी सेक्टर एक येथे ‘डी’ टाईप वसाहतीची निर्मिती करत सिडकोने गृहनिर्मितील क्षेत्रात पहिले पाउल टाकले. पुढे वाशी, नेरुळ , सानपाडा, कोपरखैरणे, बेलापूर, ऐरोली, घणसोली अशा उपनगरांमध्ये सिडकोने शेकडो घरे उभारली. मात्र वाशीतील बरीच घरे ही अवघ्या १५-२० वर्षांत निकृष्ट दर्जाची ठरली. वाशीतील जेएन टाईप वसाहतीमधील घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी आंदोलन उभारत निकृष्ट घरांचे पितळ उघडे पाडले. राज्य सरकारने नवी मुंबईत पुनर्विकासाचे जे धोरण आखले आहे, तेच मुळी सिडकोच्या निकृष्ट आणि धोकादायक इमारतींसाठी आहे. त्यामुळे गृहनिर्मितील क्षेत्रात अव्वल ठरल्याचे कितीही दावे सिडको प्रशासन करत असले तरी निकृष्ट आणि धोकादायक इमारतींच्या रांगा नवी मुंबईत सिडकोनेच उभ्या केल्या आहेत हे वास्तव नाकारता येणार नाही.

नव्या २६ हजार घरांचा वाद काय?

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सिडकोने गेल्या वर्षी २६ हजार घरांची ‘माझे पसंतीचे घर’ योजना जाहीर केली. नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी सिडको ही घरे उभारणार आहे. त्यामुळे ग्राहकांना या घरांच्या विक्री योजनेत कमालीचा रस दिसून आला. २६ हजार घरांसाठी काही लाखांच्या घरात अर्ज विक्री झाली. मात्र योजना जाहीर झाल्यापासून काही दिवसातच सिडकोने या घरांचे दरपत्रक जाहीर केले आणि ग्राहकांचा भ्रमनिरास झाला. वाशीसारख्या उपनगरात ३२२ चौरस फुटांचे घर ७५ लाखांना विकले जाईल अशी घोषणा सिडकोने केली आणि वेगवेगळ्या घटकांकडून सिडकोवर चौफेर टीका सुरू झाली. वाशीसह इतर उपनगरातील घरांचे दरही चढेच असल्याचे मत विविध क्षेत्रांतून व्यक्त होऊ लागले. त्याचा परिणाम या घर विक्री योजनेवर स्पष्टपणे दिसून आला. २६ हजार घरांसाठी जेमतेम २२ हजार अर्ज सिडकोकडे आले. गरीबांसाठी घरे बांधत आहोत असा आव आणणाऱ्या राज्यकर्त्यांचीही यामुळे अडचण झाली. सिडकोच्या तत्कालीन अध्यक्षांनाही ही घरे महाग आहेत अशी कबुली द्यावी लागली. इतके सगळे होत असताना सिडको प्रशासनाने मात्र घरांच्या किमती अजूनही कमी केलेल्या नाहीत.

घरांचा आकारही लहान

या घरांच्या किमती आवाक्याबाहेर असल्याच्या तक्रारी पुढे येत असताना घरांचे आकारमानही फसवे असल्याच्या तक्रारी काही ग्राहकांनी केल्या आणि हा मुद्दा राजकीय नेत्यांनीही आपल्या अजेंड्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले. सिडकोने जाहीर केल्याप्रमाणे अल्प उत्पन्न गटासाठी ३२२ चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या सदनिका देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र सोडतीच्या निकालानंतर विजेत्यांना मिळालेल्या इरादा पत्रात सदनिकेचे रेरा क्षेत्रफळ २९१.९१ चौरस फूट इतके असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मूळ घोषणा केलेल्या क्षेत्रफळापेक्षा ३- चौरस फूट कमी असल्याच्या तक्रारी काही लोकप्रतिनिधींनी केल्या. यासंबंधी तक्रार करूनही सिडको प्रशासन दाद नेत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. आधीच वाढीव किमती आणि त्यात कमी क्षेत्रफळाची घरे त्यामुळे ही संपूर्ण योजना फसवी असल्याचा आरोप थेट वनमंत्री गणेश नाईक यांनीही केला. ७५ लाखांचे घर स्वस्त कसे असा सवाल करताना त्यांनी सिडको आणि सर्वसामान्यांचा आता संबंध उरलेला नाही अशी टीका केली.

सिडकोचे म्हणणे काय?

किफायतशीर दर, गृहसंकुलांतील सोयी सुविधा व पारदर्शक गृहनिर्माण प्रक्रिया या निकषांवर नवी मुंबईमध्ये सिडकोच्या घरांना पहिली पसंती मिळत आहे. पारदर्शकता हा सिडकोच्या गृहनिर्माण योजनांचा गाभा असल्याने, जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या किमती, क्षेत्रफळ, सोयी सुविधा इ. बाबत कोणतीही विसंगती नसते. या योजनेतील घरांचे चटई क्षेत्रफळ हे ३२२ चौरस फूट (१ BHK), ३९८ चौरस फूट (१ BHK) व ५४० चौरस फूट (२ BHK) राहील व बेडरूम / हॉलचे क्षेत्रफळ किती असेल याबाबतही गृहनिर्माण योजनेत नमूद करण्यात आले होते. गृहनिर्माण योजनेत आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) या घटकातील १ बीएचके घरांचे क्षेत्रफळ हे ३२२ चौ. फू. असल्याचे नमूद करण्यात आले होते. सदर ३२२ चौ.फू क्षेत्रफळामध्ये त्या घरात असणाऱ्या दोन बंदिस्त बाल्कनीचे (Enclosed Balcony) क्षेत्रफळ समाविष्ट आहे. प्रकल्पातील घरांची रेरामध्ये नोंदणी करताना रेरा चटई क्षेत्रफळात सदर दोन Enclosed Balcony च्या क्षेत्रफळाचा समावेश करण्यात येत नाही, असे सिडकोचे म्हणणे आहे. तसेच, प्रत्येक प्रकल्पात असणाऱ्या सोयीसुविधांबाबतही गृहनिर्माण योजनेत नमूद करण्यात आले होते. त्यामुळे या योजनेत अर्ज करताना घरांचा आकार / क्षेत्रफळ व प्रकल्पांतर्गत असणाऱ्या सोयीसुविधांबाबत सर्व अर्जदारांना कल्पना होती. बाजारभावाच्या किमती व सिडकोचे किंमत निश्चितीचे धोरण लक्षात घेऊन घरांच्या किमती ठरवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय गुणवत्तापूर्ण बांधकाम, घराच्या किमतीमध्ये २ वर्षांचा देखभाल खर्च समाविष्ट, क्लिअर प्रॉपर्टी टायटल, मोफत पार्किंग, आरसीसी प्रीकास्ट/मायवान तंत्रज्ञानाचा वापर, लॉन, उद्यान इ. सुविधांनी ही गृहसंकुले परिपूर्ण आहेत, असा सिडकोचा दावा आहे.