रसिका मुळ्ये
श आणि ल ही देवनागरीतील अक्षरे मराठी कशी लिहावीत याबाबत आलेल्या शासन निर्णयावरून सध्या बहुत प्रमाणात चर्चा आणि काही प्रमाणात सध्या तरी वाद सुरू आहे. यानंतर मराठी प्रमाण भाषेत देठ असलेला ‘श’ आणि पाकळीवाला ‘ल ’ याचाच वापर करावा, असे निर्णयात नमूद करण्यात आले आहे. कालौघात अंगवळणी पडलेल्या अक्षर लेखनात आता बदल करावा का, तो का करावा, असे वाद सुरू झाले आहेत. त्या अनुषंगाने नमके कोणते बदल सुचवण्यात आले आहेत. याविषयीच्या वादाचा हा आढावा..
‘श’ आणि ‘ल’ मध्ये कोणते बदल सुचवण्यात आले?
श आणि ल कसा लिहावा याबाबतचा मूळ निर्णय खरा २००९ मधील आहे. नुकत्याच म्हणजे १० नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयात त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असेच म्हणावे लागेल. भाषा लेखनाचे प्रमाणीकरण करणारा शासन निर्णय २००९ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील काही मुद्दय़ांवर आक्षेप, मते मांडण्यात आली. त्यात श आणि ल या अक्षरांच्या दृश्यरूपाचाही मुद्दा होता. श हा देठयुक्त म्हणजे (श) आणि ल हा पाकळीयुक्त म्हणजे (ल) असा असावा असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले होते. मात्र दोन्ही स्वरूपात लिहिलेली अक्षरे ग्राह्य धरण्यात यावीत अशी मागणी करण्यात येत होती. ती मागणी फेटाळून देठयुक्त श आणि पाकळीयुक्त ल ग्राह्य धरण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला.
शासन निर्णयात इतर कोणते बदल?
याच शासन निर्णयात इतरही अक्षरांच्या वापराबाबत काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय आता वर्णमालेत १४ स्वर आणि ३२ व्यंजने असतील. ऋ, लृ , अॅ, ऑ याचा समावेश करण्यात आला आहे. अनुस्वार म्हणजे आतापर्यंत अंकलिपीत शिकलेला अं आणि विसर्ग म्हणजे अ: हे दोन स्वरादी तर क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने असतील. अब्जनंतर खर्व, निखर्व ही संख्यानामे समविष्ट करण्याचीही मागणी करण्यात आली होती. मात्र, या संख्यानामांचा समावेश करण्यात आलेला नाही.
‘छापील मराठी’ इतिहास आणि वर्तमान काय?
ध्वनीतून निर्माण झालेल्या भाषेला शिस्तबद्ध रचना आणि स्थैर्य हे लिपीने दिले. लिपी म्हणजे भाषेचे दृश्यरूप असे म्हणता येईल. लिपीचा हा प्रवास विशेषत मराठी भाषेने स्वीकारलेल्या देवनागरी लिपीचा छापील प्रवास हा अनेक वाद विवाद, चर्चा यांच्या साक्षीनेच झालेला आहे. तात्कालिन परिस्थितीनुसार लिपीच्या वापराबाबत अनेक वाद झाले. त्यातील काहीचे मासले द्यायचे झाल्यास १९०४ साली ‘मराठीची लेखन पद्धती’ ही पुस्तिका प्रकाशित झाली. त्यात अनुच्चारित अनुस्वार काढून टाकण्यात यावा असे सुचवण्यात आले होते. त्यावरून झालेल्या वादात लोकमान्य टिळकांनी लेख लिहून मध्यम मार्ग काढला होता. त्यानंतर १९३२ साली तत्कालीन प्रचलित लेखनात बदल सुचवण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने नेमलेल्या समितीने हे बदल सुचवले होते. साहित्य संस्कृती मंडळाने १९५७-५८ मध्ये लेखन विषयक बदल सुचवले. उ, इ या स्वरांसाठी स्वतंत्र अक्षरचिन्हांऐवजी अ या अक्षरचिन्हाला उकार, वेलांटी वापरावी असा बदल विनायक दामोदर सावरकर यांनी सुचवला होता. मात्र स्वतंत्र अक्षरचिन्हे वापरण्याचाच नियम वेळोवेळी झाला. आजही हा मुद्दा काही प्रमाणात वादाचा किंवा लेखन तफावतीचा असल्याचे दिसते. संगणक आणि अनुषंगाने संगणकावर लिपीचा वापर म्हणजेच फॉन्ट या संकल्पनांनंतर लेखनासाठी, लिपीच्या वापरासाठी नव्याने नियम करणे आवश्यक वाटू लागले. सध्या प्रचलित श आणि ल हा मराठीतील बहुतेक अक्षरटंकांमध्ये (फॉन्ट्समध्ये) आहे. गेल्या दोन पिढय़ांच्या सवयीचा आहे असे असताना तो बदलण्याची आवश्यकता आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.
लिपीबाबत विविध मतप्रवाह काय आहेत?
श आणि ष याच्या उच्चारांत फरक असला तरी लोकांच्या रोजच्या बोलण्यातील उच्चार हा अनेकदा स्वतंत्रपणे केला जात नाही. अशावेळी ष ची खरच आवश्यकता आहे का ? क्ष ऐवजी क्श असे का नाही? असे वाद अधूनमधून होतात. भाषा आणि लिपीबाबत आग्रही असणाराही मोठा वर्ग आहे.
rasika.mulye@expressindia. com