कोविड -१९ वरील लसी घेतल्यानंतर बर्याच लोकांना थकवा, ताप, डोकेदुखी, शरीराचा त्रास, मळमळ असे साईड इफेक्टस् दिसत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र लसीकरणानंतर काही लोकांना यापैकी एक साइड इफेक्ट दिसला नाही. मग कोविड -१९ची लस घेतल्या नंतर काही लोकांना त्रास होतो तर काहींना नाही. हे असे का?
सर्वात आधी करोनावरील लस घेतल्यानंतर अशी लक्षणं दिसणे ही सामान्य बाब आहे. ही लक्षणे तात्पुरती असली तरी यामुळे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होत असते. ही लक्षणे सामान्य स्वरुपाची असतात. तसेच, सर्व लोकांवर या लसींचा एकसारखा परिणाम होत नाही. शिवाय, पहिल्या डोसच्या तुलनेत दुसरा डोस घेतल्यानंतर अधिक तीव्र लक्षणे दिसू शकतात.
लसीकरणानंतर काय होते?
जेव्हा पहिल्यांदाच मानवी शरीर एखाद्या प्रतिजनच्या (antigen) संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक तयार करण्यास आणि त्या प्रतिजनाच्या विशिष्ट प्रतिपिंडे(antibodies) तयार करण्यास वेळ लागतो. दरम्यान, ती व्यक्ती आजारी पडू शकते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ” अॅन्टीजेन”च्या व्याख्येनुसार प्रतिजनांमध्ये असलेल्या जंतुमुळे प्रतिपिंडे(antibodies) तयार होतात. तसेच, लसीकरणानंतर तयार झालेली प्रतिपिंडे रोगप्रतिकारक शक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
Explained: करोनातून बरं झाल्यानंतर लस कधी घ्यायची?
रोगप्रतिकारक शक्तीच्या दोन मुख्य बाजू आहेत. त्यानुसार शरीरातील एखाद्या बाहेरील विषाणू ओळखला की त्याला बाहेर काढण्याचे काम करते. पांढर्या रक्त पेशींवर याचा जास्त परिणाम होतो आणि त्यामुळे सर्दी, घसा, थकवा आणि इतर दुष्परिणाम दिसतात.
असोसिएटेड प्रेस (एपी) वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, रोगप्रतिकारक प्रणालीची जलद-प्रतिक्रिया वयाबरोबर कमी होते. त्यामुळे तरुणांमध्ये वयस्कर लोकांपेक्षा जास्त लक्षणे दिसतात. काही लसींमुळे इतरांपेक्षा जास्त परिणाम झाल्याचे दिसते,परंतु प्रत्येकजण लसींवर वेगळी प्रतिक्रिया देत असतो. त्यामुळे एकतर डोस घेतल्यानंतर एक किंवा दोन दिवस काहीच वाटत नसेल तर याचा अर्थ असा नाही की लस काम करत नाही आहे. या लस घेतल्यामुळे एखाद्याच्या रोगप्रतिकारक शक्तीचा दुसरा भागही तयार होऊ शकतो, जो अँटीबॉडीज तयार करून व्हायरसपासून संरक्षण करु करतो, असे एपीच्या अहवालात म्हटले आहे.
लस घेतल्यानंतर दिसणारी सामान्य लक्षणे
अमेरिकेच्या एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या म्हणण्यानुसार, लोक ज्या हातावर लस दिली जाते त्या हातावर वेदना, लालसरपणा आणि सूज येऊ शकते. इतर लक्षणांमध्ये थकवा, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थंडी वाजणे, ताप, मळमळ यांचा समावेश आहे. रोगप्रतिकारक यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे कधीकधी हाताच्या खालीदेखील सूज येते.
काही लोकांमध्ये कधीकधी गंभीर परिणामदेखील दिसतात. म्हणूनच एखाद्यास कोविड-१९ ची कोणतीही लस दिल्यानंतर साधारणत १५ मिनिटे निरिक्षणासाठी ठेवले जाते. त्यामुळे त्वरित उपचार करता येणे शक्य आहे. त्याशिवाय, दुसर्या लसीनंतर होणारे दुष्परिणाम अधिक तीव्र असू शकतात. हे परिणाम सामान्य असून आणि काही दिवसातच दूर होऊ शकतात.
लसीकरणानंतर लक्षणे दिसत असल्यास या टिप्स वापरा
लसीनंतर काही लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती औषधे घ्यावीत. हाताला वेदना होत असतील तर इंजेक्शनच्या ठिकाणी, एखादा स्वच्छ, थंड आणि ओला कपडा त्या भागावर लावत येऊ शकतो. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे आणि हलके कपडे घालावे.
या लक्षणांमुळे एखाद्यास दैनंदिन कामकाजात अडचणी येऊ शकतात. परंतु ही लक्षणे काही दिवसांतच निघून जातात त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.