आपल्या सूर्यमालेत सर्वात आकर्षक असा दिसणारा ग्रह कोणता असेल तर कदाचित अनेक जणांचे उत्तर हे शनी ग्रह असंच असेल. शनीला असणाऱ्या कड्यांनी (ज्यांची प्रत्यक्षात संख्या मोठी आहे) या ग्रहाचे वेगळेपण कायम लक्षात रहाते. मात्र सूर्यमालेतील सर्वात अवाढव्य गुरु ग्रहालाही शनीसारखी कडी आहेत असं सांगितलं तर अनेकांचा त्यावर विश्वास बसणार नाही, बहुसंख्य लोकांना याची माहिती नसेल. परंतू नासाने (NASA) ने नुकतीच गुरु ग्रहाची काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत त्यामध्ये ही कडी स्पष्टपणे दिसून येतात.
गॅलिलीओने जेव्हा १६१० ला दुर्बिण रोखली तेव्हापासून शनी ग्रहाला कडी असल्याचं माहित झालं होतं. त्यानंतर कित्येक वर्षे गुरु ग्रहाचाही अभ्यास केला जात होता पण त्याला कडी आहेत हे माहित नव्हते. १९७९ ला जेव्हा नासाचे Voyager 1 नावाचे यान हे गुरु ग्रहाजवळून गेले तेव्हा या ग्रहालाही कडी असल्याचं लक्षात आलं. अर्थात ज्या प्रमाणे शनी ग्रहाची कडी ही सहज दिसून येतात तसं गुरु ग्रहाच्या बाबतीत होत नाही. एकतर एखाद्या यानाने गुरु ग्रहाजवळून विशिष्ट कोनातून छायाचित्रे काढली तरच गुरुच्या कडींचे दर्शन होते. किंवा शक्तीशाली दुर्बिणीच्या सहाय्याने बघितले तरच ही कडी दिसून येतात. नासाने अशीच काही छायाचित्रे आता प्रसिद्ध केली आहेत. काही महिन्यांपूर्वी अवकाशात पाठवलेल्या ‘जेम्स वेब टेलिस्कोप'(JWST)ने पृथ्वीपेक्षा आकाराने हजारपट मोठा असलेल्या गुरु ग्रहाची अप्रतिम छायाचित्रे काढली आहेत.
गुरु ग्रहाचे अभूतपूर्व दर्शन
गुरु ग्रह म्हटलं की पिवळा-लाल रंगाचे पट्टे असलेला ग्रह डोळ्यासमोर येतो. तसंच या ग्रहाचे छायाचित्र बघितले की यावर असलेला लाल रंगाचा ठिपकाही कायम लक्षात रहातो. हा ठिपका म्हणजे गुरु ग्रहावरील एक प्रकारचे वादळ असून दोन पृथ्वी मावतील एवढा त्याचा आकार आहे. जेम्स वेब टेलिस्कोपच्या Near-Infrared Camera ने काढलेल्या छायाचित्रांमुळे गुरु ग्रहाचे अनोखं असं दर्शन होत आहे. यामुळे निळा, हिरवा, पांढरा, पिवळा, नारंगी अशा रंगांच्या छटा असलेल्या गुरु ग्रह बघायला मिळत आहे. तसंच ऐरवी लाल रंगाचा ठिपका या छायाचित्रांच्या माध्यमातून चक्क पांढरा दिसत आहे. एवढंच नाही तर अशा प्रकारची लहान पण असंख्य वादळे गुरु ग्रहावर असल्याचंही यामुळे दिसून येत आहे. तेव्हा वेगळ्या फिल्टरच्या माध्यमातून काढलेल्या या छायाचित्रांमुळे गुरु ग्रहाचा आणखी अभ्यास करण्यास एकप्रकारे अभ्यासकांना मदत होणार आहे.
गुरुची कडी
या छायाचित्रातून ग्रहाभोवती असलेल्या कडी बघायला मिळत आहेत. अर्थात शनी ग्रहाप्रमाणे कडींची संख्या कमी असल्याने त्यांचे अस्तित्व जाणवत नाही, किमान या छायाचित्रामुळे ते जाणवते. ही कडी गुरु ग्रहापासून ९० हजार किलोमीटर ते दोन लाख २५ हजार किलोमीटर एवढ्या अंतरावर पसरली आहेत. ही एकच कडी नसून चार वेगवेगळ्या थरांमध्ये या कडींचे अस्तित्व आहे. ही कडी म्हणजे धूली कण आणि बारीक आकाराचे लघुग्रह-दगड यांचे मिश्रण आहे. ही कडी जरी छायाचित्रात कमी आकाराची-विरळ वाटत असली तरी प्रत्यक्षात काही किलोमीटर आकाराची रुंद आणि जाड आहेत.
छायाचित्रात आणखी काय बघायला मिळते?
गुरु ग्रह अवाढव्य आकाराचा असल्याने त्याचे ध्रुवही काही पृथ्वी मावतील एवढ्या आकाराचे आहेत. या ध्रुवांवर पृथ्वीप्रमाणे दिसणारा Aurora ( ध्रुवावर आकाशात दिसणारा विशिष्ट प्रकारचा प्रकाश) दिसून येतो. हा प्रकाश प्रत्यक्ष गुरु ग्रहाच्या ध्रुवांवर कित्येक किलोमीटर पसरला असणार हे स्पष्टपणे जाणवते. एवढंच नाही तर हा प्रकाश गुरु ग्रहाच्या अवकाशातही परावर्तित होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तसंच या छायाचित्रांमध्ये गुरु ग्रहाच्या ८० चंद्रांपैकी दोन चंद्रही स्पष्टपणे दिसून येतात.
‘जेम्स वेब टेलिस्कोप’ ही दुर्बिण नासा, कॅनडा स्पेस एजन्सी आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांनी संयुक्तपणे उभारली आहे. अवकाशातील विविध खगोलीय गोष्टींचा खजिना या दुर्बिणीच्या माध्यमातून उलगडवला जात आहे. गुरु ग्रहाचे ही छायाचित्रे त्याचीच एक झलक आहे.