संतोष प्रधान
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपपुढे चार राज्यांची सत्ता कायम राखण्याचे आव्हान असतानाच, काँग्रेसपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस कमकुवत झाल्याने विरोधकांची जागा घेण्यासाठी आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस हे दोन प्रादेशिक पक्ष विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरले आहेत. आम आदमी पार्टीला पंजाब तर तृणमूल काँग्रेसला गोव्यात चांगल्या यशाची अपेक्षा आहे. दोन्ही पक्षांना आपापल्या प्रभाव क्षेत्राबाहेर कक्षा रुंदावयाच्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना २००२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांचा चेहरा म्हणून त्यांचे नेतृत्व विरोधकांनी स्वीकारावे, असा प्रयत्न आहे. दिल्लीबाहेर पंजाबमध्ये सत्ता मिळविण्याचा आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांचा निर्धार आहे. यातूनच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये या दोन छोट्या पक्षांच्या मोठ्या महत्त्वाकांक्षांना किती यश मिळते ते कळेल.
तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची महत्त्वाकांक्षा का वाढली?
गेल्या वर्षी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रिक केली आणि त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली. काँग्रेस कमकुवत झाल्याचा फायदा उठविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या दृष्टीने त्यांनी विविध राज्यांमध्ये दौरे सुरू केले. मुंबई भेटीत त्यांनी यूपीए अस्तित्वात आहे कुठे, असा सवाल करीत काँग्रेसला थेट लक्ष्य केले. गोव्यात काँग्रेसच्या नेत्यांना गळाला लावून पक्षाचा पाया विस्तारण्याचा प्रयत्न केला.तर दिल्लीतील पाठोपाठच्या विजयानंतर आम आदमी पार्टीच्या पंजाबमध्ये अपेक्षा वाढल्या.
पंजाब आणि गोव्यात या दोन पक्षांना चांगल्या यशाची अपेक्षा का वाटते ?
मतदानपूर्व पाहण्यांमध्ये पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पंजाबमध्ये सत्तेत येणारच असे चित्र आम आदमी पार्टीने उभे केले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करताना भगतसिंग मान हे पंजाबचे पुढील मुख्यमंत्री होतील, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला होता. पंजाबमध्ये काँग्रेसमधील गटबाजी, पक्षांतर्गत दुफळी आणि सरकारच्या विरोधात असलेल्या नाराजीमुळे काँग्रेसला फटका बसेल, असा अंदाज व्यक्त केला जातो. अकाली दलाची २०१७ मध्येच पीछेहाट झाली आणि पक्ष त्यातून अद्यापही सावरलेला नाही. भाजप आणि अमरिंदरसिंग यांच्या पक्षाची युती असली तरी या युतीला फार काही जनाधार दिसत नाही. आम आदमी पार्टीचाच पर्याय त्यातून पुढे आला. मतदानपूर्व पाहण्यांमध्ये बहुतांशी माध्यमांनी आपला आघाडी मिळेल, असा अंदाज वर्तविला आहे. अर्थात, २०१७च्या निवडणुकीतही आम आदमी पार्टीने पंजाबात हवा तयार केली होती, पण पक्षाचे २० आमदारच निवडून आले होते. गोव्यातही आम आदमी पार्टीने जोर लावला आहे. भंडारी समाजातील अमित पालेकर हा नवखा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वेळीही गोव्यात आपने हवा तयार केली होती, पण पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता. काँग्रेस कमकुवत झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात तृणमूल काँग्रेसला यश मिळेल, असे वाटते. माजी मुख्यमंत्री एदुआर्दो फालेरो यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. याशिवाय काँग्रेसच्या काही नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. मात्र गोव्यातील मतदार पश्चिम बंगालच्या या पक्षाला स्वीकारतील का, याबाबत साशंकता व्यक्त केली जाते.
आम आदमी पार्टी आणि तृणमूलमध्ये स्पर्धा का आहे ?
भाजपला आपलाच पर्याय असल्याचे दाखविण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांचा काँग्रेस विरोध जगजाहीर आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये चांगले यश संपादन करून राष्ट्रीय पातळीवर पाया विस्तारण्याचा उभयतांचा प्रय़त्न आहे. पंजाबमध्ये सत्ता किंवा सर्वाधिक जागा मिळाल्या तरी आम आदमी पार्टीला आगामी सार्वत्रिक निवडणुकांकरिता पाया विस्तारण्यास वाव मिळेल. तृणमूल काँग्रेसची सारी मदार ही गोव्यावर आहे. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात उतरायचे असले तरी त्यांच्या पक्षाचे पश्चिम बंगालबाहेर कार्यकर्त्यांचे जाळे नाही. ममतादिदींसाठी हीच प्रतिकूल बाब आहे. यामुळेच हे दोन्ही पक्ष पूर्ण तयारीनिशी निवडणुकीत उतरले आहेत. आम आदमी पार्टी पंजाबमध्ये यशस्वी झाल्यास केजरीवाल यांचे महत्त्व वाढेल.