करोनावर मात करण्यासाठी देशभरात गतवर्षी १६ जानेवारीला सुरू झालेल्या करोना प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमाला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात झालेल्या लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास निश्चितच फायदा झाला असून आता १५ वर्षांखालील बालकांच्या लसीकरणाची प्रतीक्षा आहे.
पहिला टप्पा
१८ वर्षांवरील नागरिकांचे व्यापक प्रमाणात लसीकरण करण्याचा देशातील हा पहिलाच राष्ट्रीय कार्यक्रम होता. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लशींना भारतीय औषध नियंत्रक विभागाने (डीसीजीआय) आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आणि लसीकरणाच्या पहिला टप्पा १६ जानेवारीपासून सुरू झाला. आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात आली. लसीकरण मोहिमेचे नियोजन आणि नियमनासाठी केलेल्या कोविन सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे पहिल्या दिवसापासूनच लसीकऱण कार्यक्रमामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. परंतु कालांतराने लसीकरण वेगाने सुरू झाले.
दुसरा टप्पा
लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्च २०२१ रोजी देशभरात सुरू झाला. त्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील विविध दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण यांसाठी लसीकरण खुले झाले. दरम्यानच करोनाची दुसरी लाट तीव्रतेने पसरत असल्याने लसीकरण वेगाने करण्यासाठी लस निर्यातीवर केंद्र सरकारने निर्बंध घातले. लशीची मागणी वेगाने वाढू लागली परंतु त्या तुलनेत साठा उपलब्ध नसल्यामुळे गर्दी होऊ लागली. दरम्यान कोविशिल्ड लशीची दुसरी मात्रा २८ दिवसांऐवजी ४५ दिवसांनी देण्याचा केंद्रीय आरोग्य विभागाने २२ मार्च रोजी निर्णय
तिसरा टप्पा
लसीकरणाचा विस्तार करण्यासाठी ४५ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण १ एप्रिल २०२१ रोजी खुले केले. देशात रशियाच्या स्पुटनिक लशीच्या वापरासही डीसीजीआयची मान्यता प्राप्त मिळाल्याने आणखी एका लशीचा पर्याय उपलब्ध झाला. परंतु तिचा वापर अजूनही खासगी रुग्णालयांपुरता मर्यादित राहिला आहे.
लसीकरणाचे खुले धोरण
१ मे पासून ‘१८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकऱण खुले केले जाईल. परंतु ४५ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी केंद्रामार्फत मोफत लशींचा साठा राज्याना दिला जाईल. परंतु १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण राज्यांनी करावे,’ असे नवे लसीकरणाचे खुले धोरण केंद्राने जाहीर केले खासगी रुग्णालये आणि कंपन्याना लसखरेदीचे अधिकार या नव्या धोरणात दिले गेले. उत्पादकांनी निर्मिती केलेल्या लस साठ्यापैकी निम्मा लस साठा केंद्र सरकार खरेदी करेल, तर उर्वरित साठा खासगी कंपन्या आणि राज्यांना खरेदी करता येईल असे यात नमूद केले होते. यामुळे देशभरात खळबळ उडाली आणि सर्वांना मोफत लसीकरण उपलब्ध करण्याची मागणी जोर धरू लागली.
लस खरेदीसाठी स्पर्धा
सर्वांसाठी लसीकरण खुले करून कोविनमध्ये नोंदणी सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी देशभरात १ कोटी ३० लाख नागरिकांनी नोंदणी केली. खासगी कंपन्या आणि रुग्णालयांनी साठा केल्यामुळे राज्यांना लस प्राप्त होण्यात अडचणी आल्या. त्यामुळे अनेक राज्यांना १ मे पासून लसीकरण सुरू करता येणार नाही, असे जाहीर करावे लागले. लसखरेदीच्या खुल्या धोरणामुळे खासगी रुग्णालये आणि कंपन्यांनी लससाठा करून ठेवला. त्यामुळे सरकारी केंद्रांमध्ये खडखडाट झाला तर खासगी रुग्णालयांमध्ये एका मात्रेसाठी एक ते दीड हजार रुपये आकारून लसीकरण करण्यात येते होते.
राज्यात १८ वर्षावरील लसीकरण स्थगित
गरजेनुसार लससाठा मिळत नसल्यामुळे केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली. त्याचवेळी दुसरी लाट तीव्रतेने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याने १८ वर्षांवरील लसीकऱण स्थगित केले आणि खरेदी केलेल्या लससाठ्यातील २ लाख ७५ हजार मात्रांचा साठा ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी उपलब्ध केला.
मोफत लसीकरण धोरण लागू
महिनाभर सर्व स्तरांतून झालेली टीका, लशीसाठीची स्पर्धा आणि तुटवडा यामुळे अखेर केंद्राने सर्वांसाठी मोफत लसीकरण करण्याचे नवे धोरण लागू केले. २१ जून २०२१ पासून लसीकरण सुरू झाले. लशींच्या खासगी विक्रीचे दर निश्चित केले गेले. १८ ते ४४ या वयोगटासाठी लसीकरण मोफत खुले केल्याच्या पहिल्याच दिवशी देशभरात सुमारे ८२ लाख ७० हजार नागरिकांचे लसीकरण झाले. तोपर्यंतचे हे सर्वाधिक लसीकरण होते. लसीकरण वेगाने वाढल्यामुळे देशाने अमेरिकेलाही लसीकरणामध्ये मागे टाकले.
एका दिवसांत एक कोटी लसीकरण
लशींचा पुरेसा साठा मिळू लागल्यावर राज्यातील लसीकऱण वेगाने वाढले आणि राज्यात दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांची संख्या हळूहळू १ कोटींवर पोहोचली. ऑगस्टमध्ये तर देशाने एका दिवसांत एक कोटी लसीकरण करून जागतिक विक्रम केला. नोव्हेंबरमध्ये राज्यात पहिल्या मात्रेचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करणारा मुंबई पहिला जिल्हा ठरला. देशभरात पहिल्या मात्रेचे लसीकऱण पूर्ण करणारे हिमाचल प्रदेश पहिले राज्य ठरले. हिमाचल प्रदेशात २९ ऑगस्टला पहिल्या मात्रेचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले.
ओमायक्रॉनच्या भीतीने लसीकरणास पुन्हा वेग
दुसरी लाट ओसरायला लागली तशी नोव्हेंबरमध्ये लसीकरणाची गतीही मंदावली. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ओमायक्रॉन या नव्या करोना रूपाच्या धास्तीने पुन्हा लसीकरणाला वेग आला.
आणखी एका लशीला मान्यता
देशभरातील पहिल्या जनुकीय आधारित झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डीच्या लशीच्या वापरास डीसीजीआयने परवानगी दिली असून सुईचा वापर न केलेली ही तीन मात्रांमध्ये दिली जाणारी लस आहे.
सध्या भारतात जॉन्सन अण्ड जॉन्सनस, बायोलॉजिकल ई, मॉडर्ना अशा विविध कंपन्यांच्या नऊ लशींच्या वापराला मान्यता असून यातील कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक या तीन लशींचा वापर केला जात आहे. १ जानेवारीपासून १५ ते १७ या किशोरवयीनांचे लसीकरणही सुरू झाले आहे. बालकांसाठी सध्या कोव्हॅक्सिन लस देण्यात येत असून सीरमच्या कोविशिल्ड लशीच्याही बालकांवर चाचण्या सुरू आहेत. भविष्यात यासह झायडसच्या लशीलाही बालकांसाठी मान्यता मिळण्याची शक्यता आहे. १५ वर्षाखालील बालकांसाठी अजून लसीकरण सुरू झालेले नाही. बालकांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर या वयोगटासाठीही लसीकरण सुरू होईल. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ६० वर्षांवरील दीर्घकालीन आजार असलेले नागरिक यांना वर्धक मात्रा (प्रिकॉशन डोस) देण्यास १० जानेवारीपासून सुरू झाला आहे. वर्धक मात्रा ४५ वर्षावरील नागरिकांसाठी खुली करण्याची मागणीही केली जात आहे.
देशभरातील लसीकरण स्थिती (१५ जानेवारीअखेर)
पहिली मात्रा ……सुमारे ९० कोटी ९३ लाख
दोन्ही मात्रा …….सुमारे ६५ कोटी ४८ लाख
प्रतिबंधात्मक मात्रा …..सुमारे ४२ लाख २१ हजार
१५ ते १७ वयोगट…सुमारे ३ कोटी ३९ लाख
राज्यातील लसीकरण स्थिती (१५ जानेवारीअखेर)
पहिली मात्रा ……सुमारे १४ कोटी ३० लाख
दोन्ही मात्रा …….सुमारे ५ कोटी ८० लाख
प्रतिबंधात्मक मात्रा …..सुमारे ३ लाख २२ हजार
१५ ते १७ वयोगट…सुमारे २५ लाख १२ हजार