एअरटेल या दूरसंचार कंपनीने मेटाव्हर्सवरील भारतातील पहिले मल्टिप्लेक्स सादर केले आहे. दी एअरटेल एक्सट्रीम मल्टिप्लेक्स पार्टीनाइट मेटाव्हर्स (Partynite Metaverse) या व्यासपीठावर दाखल झाले आहे. एअरटेल एक्सट्रीम बाजारात दाखल झाल्यानंतर १०० दिवसांमध्येच २० लाख ग्राहकांचा टप्पा पार केल्यानंतर आता एअरटेलने मेटाव्हर्सवर मल्टिप्लेक्स सादर केले आहे.
एअरटेल एक्सट्रीम मल्टिप्लेक्सवर एकूण २० पडदे असून एअरटेल एक्सट्रीम अॅपवर असलेल्या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरचे कार्यक्रम ग्राहकांना बघता येणार आहेत. ओटीटीवरील मूळ म्हणजे ओरिजिनल कार्यक्रम, सिनेमे, पहिला भाग, स्थानिक भाषांमधील कार्यक्रम, सिनेमे, सिनेमाच्या सुरुवातीचे काही क्षण अशा विविध प्रकारे ग्राहकांना निवड करता येणार आहे. ग्राहकांनी घेतलेल्या प्लॅननुसार त्यांना मल्टिप्लेक्सचा संपूर्ण वापर करता येणार आहे.
एअरटेलने या संदर्भातला व्हिडीओ यू ट्यूबवर प्रदर्शित केला असून मल्टिप्लेक्सचा अनुभव नक्की काय आहे, हे तिथं बघता येणार आहे. तसेच Partynite Metaplex हे अॅप अँड्रॉइड वा विंडोजच्या उपकरणांमध्ये डाइनलोड करता येणार आहे.
एअरटेलच्या दाव्यानुसार एअरटेल एक्सट्रीम मल्टिप्लेक्स, वेगवेगळ्या स्तरांवरील हा अत्यंत वेगळा अनुभव असून पार्टीनाइट मेटाव्हर्सच्या माध्यमातून ग्राहकांना संवादही साधता येणार आहे. ही मल्टिप्लेक्सची सुविधा लार्जर दॅन लाइफ असा अनुभव देणारी असल्याचे कंपनीचे म्हणणे असून वेब ३.० अॅप्स, गोष्टी मांडण्याची खुबी आणि कार्यक्रमाचे व्यवस्थित सादरीकरण यांचा संगम म्हणजे मल्टिप्लेक्सचा अनुभव असल्याचे एअरटेलचे म्हणणे आहे.
“लोकांचे सिनेमा व मनोरंजनाप्रती असलेले प्रेम आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. मेटाव्हर्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. एअरटेल एक्सट्रीम प्रीमिअमच्या माध्यमातून इच्छुक ग्राहकांना हा अनुभव घेण्याची संधी आम्ही देत आहोत,” असे एअरटेलचे विपणन संचालक शाश्वंत शर्मा यांनी सांगितल्याचे न्यूज १८ने म्हटले आहे.