बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अक्षय कुमार लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. अभियंते जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर आधारित ‘कॅप्सुल गिल’ या चित्रपटात आपल्याला अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या आगामी चित्रपटामधील अक्षय कुमारचा फर्स्ट लूक सुदधा नुकताच समोर आला आहे. अक्षय कुमारचा हा लूक सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्यामुळे, अर्थातच चाहत्यांसह, सर्वांनाच अक्षय कुमारच्या या नव्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता लागली आहे. पण ज्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे ते जसवंत सिंग गिल नेमके कोण आहेत?
कोण आहेत जसवंत सिंग गिल?
जसवंत सिंग गिल हे एक खाण अभियंते होते. १९८९ मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील कोळसा खाणीला पूर आला होता. कोळसा खाणीत निर्माण झालेल्या पूरस्थिती दरम्यान गिल यांनी ६५ कामगारांचे प्राण वाचवले होते. ३ नोव्हेंबर १९८९ रोजी पश्चिम बंगालच्या महावीर कोळसा खाणीत ३०० फूट खाली अडकलेल्या ६५ कोळसा कामगारांचे प्राण वाचवण्यात जसवंत सिंग गिल यांना यश आले होते. त्यावेळी ते अतिरिक्त मुख्य खाण अभियंता होते. या कामगारांचे प्राण वाचवण्यासाठी अभियंता गिल यांनी स्टीलची कॅप्सूल बनवली. लिफ्टमुळे काही खाण कामगार बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते.
मात्र काही कामगार अद्याप खाणीमध्ये अडकले होते. अशा परिस्थितीत जसवंत आणि त्यांच्या पथकाने बचावकार्य सुरू केले स्टीलच्या कॅप्सूलच्या सहाय्याने एक एक करून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. हे ऑपरेशन आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या कोळसा खाण बचाव कार्यापैकी एक मानले जाते.
म्हणूनच, जसवंत सिंग गिल यांच्यावरील जीवनपटाला ‘कॅप्सूल गिल’ हे समर्पक नाव देण्यात आलं आहे. दरम्यान, गिल यांच्या या शौर्याचा, धैर्याचा सन्मान करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरामन यांनी त्यांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदकाने गौरविले होते.
‘कॅप्सूल गिल’सह अक्षय कुमारचे आणखीही अनेक चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. येत्या ११ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या आनंद एल राय यांच्या ‘रक्षा बंधन’ या चित्रपटात अक्षय कुमार दिसणार आहे. त्याचसोबत ‘राम सेतू’, ‘मिशन सिंड्रेला’, ‘ओह माय गॉड २’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘सेल्फी’ असे अक्षय कुमारचे अनेक नवेकोरे चित्रपट चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.