मोहन अटाळकर

गेल्या महिन्यात २१ तारखेला अमरावतीतील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने कोल्हे यांची हत्या झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शहराने धार्मिक विद्वेषाचे निखारे अनुभवले. दंगलीमुळे आठवडाभर अमरावतीकर वेठीस धरले गेले होते. दंगलीचे दूरगामी परिणाम कायमच जाणवत राहतात. अशा घटना समाजातील सर्वच घटकांना बाधित करतात. मध्यंतरीच्या काळात धार्मिक  सौहार्द कायम राहावा, यासाठी सर्व घटकांकडून प्रयत्न करण्यात आले. पण, हत्येच्या ताज्या घटनेने सांधत आलेली धार्मिक दरी रुंदावण्यास हातभार लागेल, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

elon musk internet on mars
एलॉन मस्क मंगळावर पोहोचवणार इंटरनेट सेवा? कारण काय? त्याचा फायदा कोणाला?
MATES scheme for indian
भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी देणार ऑस्ट्रेलिया; काय आहे ‘MATES’…
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
Nizam, Razakars, and Operation Polo
Operation Polo: भारतासाठी महत्त्वाचे ठरलेले ‘ऑपरेशन पोलो’ काय होते?
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
Pakistan professor claims India is developing Surya missile
अर्धी पृथ्वी टप्प्यात येईल असे ‘सूर्या’ क्षेपणास्त्र भारताकडे खरेच आहे का? पाकिस्तानी तज्ज्ञाचा दावा काय?
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Donald trump, Elon Musk, Vivek Ramaswamy, Minimum Government, Maximum Governance
विश्लेषण : इलॉन मस्क, विवेक रामस्वामी ‘सरकार कार्यक्षमता’ मंत्री… ‘टीम ट्रम्प’ आतापासूनच का भरवतेय धडकी?

अमरावतीत धार्मिक विद्वेष वाढण्याची कारणे काय?

हिंदू-मुस्लिम अशी संमिश्र लोकसंख्या असलेले अमरावती हे शहर यापूर्वी धार्मिक तणावासाठी फारसे चर्चेत नव्हते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला अमरावतीत हिंसक वळण लागल्यानंतर त्याचा निषेध नोंदविण्यासाठी भाजपने दुसऱ्या दिवशी बंद पुकारला. यादरम्यान पुन्हा जाळपोळ, हिंसाचार झाला. शहराने यापूर्वी अनेक वेळा जातीय संघर्ष पाहिला आहे. पण एका समुदायाच्या हिंसक कृतीविरोधात दुसऱ्या समुदायाने भडकलेली माथी घेऊन लगेच त्याला हिंसक पद्धतीने प्रत्युत्तर देण्याच्या या घटनेने धार्मिक विद्वेषाचे वेगळेच रूप समोर आले. तीन वर्षांपूर्वी ‘एनआरसी’च्या मुद्द्यावरून अल्पसंख्याक संघटनांनी अमरावतीत मोठा मोर्चा काढला होता. मोर्चेकरी आक्रमक होते, पण त्यावेळी एक साधा दगडही उचलला गेला नव्हता. पण, अलीकडच्या काळात कट्टरतावाद का वाढला, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ अल्पसंख्याक समुदायातील नेत्यांवरही आली आहे.

यापूर्वी काय घडले?

त्रिपुरा येथे एका प्रार्थना स्थळावर हल्ला करण्यात आल्याची अफवा पसरली आणि राज्यातील काही भागात अल्पसंख्याक संघटनांनी मोर्चे काढले. अमरावतीतही अशा प्रकारचा मोर्चा काढण्यात आला. मुळात मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती. पण रझा अकादमी आणि इतर अल्पसंख्याक संघटनांनी शक्तिप्रदर्शन करण्याची ही संधी समजून मोठा मोर्चा काढला. या मोर्चाबाबत पोलिसांचा अंदाज पूर्णपणे चुकला. २० ते २५ हजार लोक या मोर्चात सहभागी झाले होते. पण तो नेतृत्वहीन होता. अल्पसंख्याक समाजातील विविध गट, संघटनांचे तसेच वेगवेगळया पक्षांशी बांधिलकी असणारे लोक त्यात सामील होते. काही समाजकंटकांनी मोर्चादरम्यान दुकानांवर दगडफेक केली. दुकानदारांना मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर भाजपने त्याचा निषेध म्हणून दुसऱ्या दिवशी  अमरावती बंद पुकारला. त्यावेळी झालेल्या हिंसाराचारात प्राणहानी झाली नसली, तरी त्यानंतर धार्मिक दरी वाढल्याचे दिसून आले.

धार्मिक ध्रुवीकरण होत आहे का ?

भारताच्या फाळणीच्या वेळी निर्माण झालेली दुफळी मिटवण्यासाठी आजवर बरेच प्रयत्न करण्यात आले, पण ती खपली वारंवार काढली जाते. हिंदुत्ववादी विचारसरणीचे आणि तिच्याशी जवळीक असणाऱ्या पक्षांचे प्राबल्य वाढले आणि निवडणुकीच्या प्रचारात धर्माधारित ध्रुवीकरण होण्यास सुरुवात झाली. याने निवडणुकीच्या राजकारणात फायदा होताना दिसत असला, तरी दोन्ही बाजूंचा कट्टरतावाद हा धोकादायक वळणावर घेऊन जाणारा असतो. गेल्या तीन दशकांचा इतिहास पाहिला, तर राम मंदिर-बाबरी मशीद वाद, जातीय दंगली, दहशतवादी हल्ले हे धार्मिक विद्वेषाचे वातावरण अधिकच गडद करीत राहिले. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.‍

यात राजकीय सहभाग दिसून येतो का?

अलीकडच्या काळात धार्मिक ध्रुवीकरणासाठी अनेक पक्ष पुढे सरसावले आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देऊन घातलेला गोंधळ संपूर्ण देशाने पाहिला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणांचा भाजप आणि हिंदुत्वाकडे झालेला प्रवास अनेकांसाठी अनाकलनीय, पण त्यांच्यासाठी ती राजकीय सोय. मशिदींसमोर भोंगे लावण्याचा विषय असो वा हनुमान चालिसाचे प्रकरण असो, ध्रुवीकरणाचे प्रयत्न यातून दिसून येतात. संपूर्ण वऱ्हाडातच धार्मिक ध्रुवीकरण हा राजकीय पोळी शेकणाऱ्या पक्षांसाठी आधार ठरला आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणातही सर्वप्रथम भाजपनेच आवाज उठवला आणि नुपूर शर्मा प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला. अशा प्रकारच्या घटनांमधून राजकीय ईप्सित साध्य करण्याची अहमहमिका लागल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.

चिथावणीखोरांमुळे उन्माद वाढत आहे का?

चिथावणीखोर वक्तव्ये, समाजमाध्यमांचा वापर करून एकमेकांवर होणारी चिखलफेक यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सौहार्द कायम राहावा, यासाठी शांतता समित्यांच्या बैठका घेतल्या जातात. पण त्यातूनही फारसे काही निष्पन्न होत नाही, हे लक्षात आले. अचलपूर या शहरात गेल्या एप्रिल महिन्यात झेंडा काढण्याच्या एकमेव कारणावरून दोन समुदायांमध्ये संघर्ष निर्माण झाला. त्यातूनही दोन टोकाच्या भूमिका निदर्शनास आल्या. जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्या संघटना सक्रिय आहेत, याचा शोध आता तपास यंत्रणांना घ्यावा लागणार आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांना कठोर पाऊले उचलावी लागणार आहेत.

mohan.atalkar@expressindia.com