विनायक परब
संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या हस्ते बुधवार, २० एप्रिल रोजी माझगाव गोदीमध्ये भारतीय नौदलाच्या आयएनएस वागशीर या पाणबुडीचे समारंभपूर्वक जलावतरण होणार आहे. वागशीर ही स्कॉर्पिन वर्गातील सहावी आणि अखेरची पाणबुडी असेल. प्रकल्प-७५ अंतर्गत एकूण सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्यात आली. या सर्व कलवरी वर्गातील पाणबुड्या आहेत. या निमित्ताने एकूणच भारतीय नौदलाला असलेली पाणबुड्यांची गरज आणि इतर संबंधित बाबींचा घेतलेला आढावा.
प्रकल्प- ७५ आहे तरी काय?
भारतीय नौदलाला अत्याधुनिक पाणबुड्यांची गरज आहे, हे लक्षात आल्यानंतर इंदरकुमार गुजराल पंतप्रधान असताना हा प्रकल्प आकारास आला. याअंतर्गत खरे तर एकूण २४ पाणबुड्यांची निर्मिती करणे सुरुवातीस प्रस्तावित होते. मात्र नंतर ती संख्या केवळ चार आणि नंतर सहावर आली.
सध्या या प्रकल्पाची स्थिती काय आहे?
या प्रकल्पातील पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी हिच्या नावे आता हा वर्ग ओळखला जातो. कलवरी वर्गातील आयएनएस कलवरी आणि आयएनएस खंदेरी या दोन्ही पाणबु्ड्या अनुक्रमे २१ सप्टेंबर २०१७ आणि १० सप्टेंबर २०१९ रोजी भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाल्या. त्यानंतरच्या पाणबुड्या आयएनएस करंज १० मार्च २०२१, तसेच आयएनएस वेला २५ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्या. पाचवी पाणबुडी वागीर सध्या सागरी चाचण्यांमध्ये असून २०२२च्या वर्षअखेरीस ती भारतीय नौदलात दाखल होणे अपेक्षित आहे. सहावी पाणबुडी असलेल्या वागशीरचे जलावतरण २० एप्रिल रोजी होत आहे.
नौदलामध्ये पाणबुडीचे महत्त्व काय?
पाणबुडी ही नौदलाची गोपनीय नजरच असते. त्यामुळे पाणबुडी विभागाला नौदलात अनन्यसाधारण असे महत्त्व असते. पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन तसेच समुद्राखालूनही हल्ला करू शकते. अधिक संख्येने आणि सक्षम पाणबुड्या असणे म्हणूनच नौदलासाठी महत्त्वाचे असते.
आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब पाणबुडी निर्मितीतही दिसते का?
होय. पाणबुडीची मुख्य बॅटरी, गॅस अॅनालायझर्स, इंटरकॉम, वातानुकूलन यंत्रणा, आरओ प्रकल्प आदी बाबींची स्वयंपूर्ण निर्मिती वागशीरमध्ये करण्यात आली आहे. या शिवाय पाणबुडी निर्मितीच्या संदर्भात स्कॉर्पिन प्रकल्प अधिक महत्त्वाचा आहे. कारण याअंतर्गत भारतीय तंत्रज्ञांनी नवीन तंत्रज्ञान शिकून घेतले असून कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा वापर भविष्यात होऊ शकेल. या साठीचे वेल्डिंग हे विशेष असून त्यासाठी माझगाव गोदीचे कर्मचारी प्रशिक्षणासाठी जर्मनीमध्ये जाऊन आले.
भारतीय नौदलाकडे पुरेशा पाणबुड्या आहेत का?
या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी नाही असेच आहे. भारतीय नौदलामध्ये सध्या आयएनएस शिशुमार, शंकुश, शल्की आणि शंकुल या शिशुमार वर्गातील जर्मन बनावटीच्या चार पाणबुड्या आहेत. तर रशियन बनावटीच्या सिंधुघोष, सिंधुध्वज, सिंधुराज, सिंधुरत्न, सिंधुकेसरी, सिंधुकीर्ती, सिंधुविजय आणि सिंधुराष्ट्र या ८ पाणबुड्या आहेत. त्यात आता कलवरी आणि खंदेरी यांचा समावेश झाल्याने एकूण पाणबुड्यांची संख्या १५ वर पोहोचली आहे. मात्र भारत हा तिन्ही बाजूंनी पाणी असलेला सागरी देश असल्याने आपल्याला आवश्यक असलेल्या पाणबुड्यांची कमीत कमी संख्या ४६ असल्याचे नौदल अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण विदेशात जाणाऱ्या ताफ्यासोबतही काही पाणबु्ड्या पाठवाव्या लागतात. त्यामुळे काही पाणबुड्या या सातत्याने बाहेरच असतात. हे लक्षात घेतले तर गरजेची संख्या अधिक का हेही लक्षात येईल.
चिनी नौदलाच्या वाढलेल्या वावरामुळे पाणबुड्यांची गरज वाढली आहे का?
चीनच्या नौदलाचा वावर बंगालच्या उपसागरापासून ते हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय नौदलाला चिनी आक्रमक कारवाया रोखण्यासाठी किंवा त्या वावरास प्रतिबंध घालण्यासाठी पाणबुड्या अधिक संख्येने असाव्या लागतील. त्यामुळे पाणबुडी निर्मितीच्या क्षेत्रात भारताला वेगात उतरावे लागेल, ती गरज आहे.