संदीप नलावडे
पर्यटन हा जगातील सर्वात मोठा आणि वेगाने वाढणारा उद्योग आहे. भारतासारख्या इतिहास, भूगोल, निसर्ग, कला, परंपरा यांचे वरदान लाभलेल्या देशासाठी पर्यटन उद्योग खूप महत्त्वाचा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी, सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीसाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी पर्यटन उद्योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. २०२० ते २०२९ या काळात भारतातील पर्यटन १७.३० टक्क्यांनी वाढवण्याचे लक्ष्य जाहीर करतानाच देशाच्या पर्यटन उद्योगासदंर्भात महत्त्वाची आकडेवारीही केंद्रिय पर्यटन मंत्रालयाने जारी केली आहे. २०२९ पर्यंत पर्यटन व्यवसाय ५१२ अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर केला जाणार आहे. जारी केलेल्या या आकडेवारीतून पर्यटन उद्योगाशी संबधित अनेक बाबींचा उलगडा होतो.
करोनाचा मोठा फटका
गेल्या दोन वर्षांत करोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला. करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत पर्यटकांचा ओघ आटला आणि देशभरात जवळपास दोन कोटी रोजगार धोक्यात आले. २०१६ साली पर्यटन व्यवसायातून २०८.९ अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळाले, जे सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ९.१ टक्के होते. २०१७ आणि २०१८मध्ये अनुक्रमे २४०.६ अब्ज (जीडीपीच्या ९.१ टक्के) आणि २४७.३ अब्ज डॉलर (जीडीपीच्या ९.२ टक्के) उत्पन्न होते. २०१९ साली यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. २०२०मध्ये मात्र करोनाचा मोठा फटका पर्यटन व्यावसायाला बसला. आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ आटला. त्यामुळे या व्यवसायातून केवळ १२१.९ अब्ज डॉलरचेच (जीडीपीच्या ४.६ टक्के) उत्पन्न मिळाले. करोनामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला
करोनाच्या फटक्यातून सावरणार कसे?
आता करोनापश्चात कालखंडात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी अधिक प्रयत्न केले जात आहे. २०२९ पर्यंत पर्यटन व्यवसायातून ५१२ अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज सरकारी पातळीवर व्यक्त केला जात आहे.
पर्यटकाचा ओघ किती?
करोना काळात केवळ परदेशी पर्यटकच नव्हे तर देशांतर्गत पर्यटकांचाही ओघ आटल्याचे दिसून आले. २०२०मध्ये केवळ ६१ कोटी १० लाख देशांतर्गत आणि ७० लाख परदेशी पर्यटकांनी विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. हाच आकडा आदल्या वर्षी म्हणजे २०१९मध्ये कित्येक पटीने अधिक होता. त्या वर्षी २३२.२ कोटी देशांतर्गत पर्यटकांनी तर ३ कोटी १० लाख परदेशी पर्यटकांनी भारतातील विविध स्थळांना भेटी दिल्या.
बांगलादेशी पर्यटक अधिक
केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक पर्यटक बांगलादेशातून येत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या पाच वर्षांत बांगलादेशातून आलेल्या पर्यटकांची संख्या वेगाने वाढत आहे. भारतात येणाऱ्या पाच परदेशी पर्यटकांपैकी एक बांगलादेशी असल्याचे आकडेवारी सांगते. २०२०मध्ये बांगलादेशातून दोन कोटी पर्यटक भारतात आले. याच वर्षी अमेरिकेतून १. ४४ कोटी तर ब्रिटनमधून १. ०६ कोटी पर्यटकांनी भारतातील पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. कॅनडा, रशिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, मलेशिया, श्रीलंका या देशांतून पर्यटकांचा ओघ भारतात येत आहे.
‘यूएई’ला सर्वाधिक पसंती
परदेशी पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत असले तरी भारतीयांची पसंती मात्र आखाती देशांना असल्याचे दिसून येते. संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएई या देशात २०२०मध्ये भारतातून सर्वाधिक पर्यटक गेल्याचे आकडेवारी सांगते. ३.४० कोटी भारतीयांनी यूएईला भेट दिली. त्याखालोखाल अमेरिका (८१ लाख) , सौदी अरेबिया (७५ लाख) , कतार (४२ लाख) , सिंगापूर (४० लाख) या देशांचा क्रमांक लागतो. ब्रिटन, थायलंड, कॅनडा, कुवेत या देशांनाही भारतीय पर्यटक भेट देत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
तमिळनाडू महाराष्ट्रापेक्षाही सरस
काही वर्षांपूर्वी देशांतर्गत आणि परदेशी प्रवाशांचा ओढा महाराष्ट्राकडे सर्वाधिक होता, मात्र २०१४पासून तमिळनाडूने महाराष्ट्राला मागे सारत परदेशी पर्यटकांची गर्दी खेचणारे राज्य म्हणून नाव कमावले आहे.
देशांतर्गत पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असणारे राज्य तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश आहे. महाराष्ट्र या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. युनोस्कोच्या यादीतील अजिंठा- वेरूळ यांसारखी लेणी, सह्याद्रीच्या विशाल डोंगररांगा, कोकणातील विस्तीर्ण समुद्रकिनारा, वाघांची सर्वाधिक संख्याा असलेले ताडोबासारखे जंगल इतके वैभव असतानाही महाराष्ट्र मागे पडला आहे. याचे कारण म्हणजे पर्यटनला दुय्यम स्थान देणारा प्रशासकीय दृष्टीकोन. दक्षिण भारतातील अनेक राज्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आखतात, मात्र महाराष्ट्र याबाबतीत उदासीन आहे. कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांतील पर्यटनस्थळी जाणारे रस्ते उत्तम आणि वाहतुकीसाठी योग्य आहेत. महाराष्ट्रात रस्ते ही फार मोठी समस्या आहे. राज्यातील समुद्रकिनारे आणि अन्य पर्यटनस्थळांच्या ठिकाणी असलेली अस्वच्छता पर्यटकांचा ओघ कमी करते.
ताजमहाल अग्रेसर
भारतातील अनेक पर्यटनस्थळे युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहेत. यामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू, किल्ले आणि लेणींचा समावेश आहे. त्यामुळे परदेशी पर्यटक अशा वारसा स्थळांना भेट देतात. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालाला देशांतर्गत आणि परदेशी पर्यटक सर्वाधिक भेट देतात. परदेशी पर्यटकांचा सर्वाधिक ओघ ताजमहालानंतर आग्य्राचा किल्ला, नवी दिल्लीतील कुतुब मिनार, फतेहपूर सिक्री, लाल किल्ला, कोचीतील मॅटनचेरी पॅलेस संग्रहालय येथे सर्वाधिक आहे. तर देशांतर्गत पर्यटक कोणार्क येथील सूर्यमंदीर, हैदराबाद येथील गोलकोंडा किल्ला, नवी दिल्लीतील कुतुब मिनार, हैदराबाद येथील चार मिनार, विजापूर येथील गोल घुमट या पर्यटनस्थळांना सर्वाधिक भेट देतात, असे आकडेवारीतून लक्षात येते.