प्रसाद रावकर
कुणे एकेकाळी मुंबईत झुळझुळ वाहणाऱ्या मिठी नदीतून मालवाहतूक करण्यात येत होती असे सांगितले तर ते कुणालाही खरे वाटणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. मुंबई विस्तारत गेली आणि मिठी आक्रसत गेली. केवळ मिठी नदीच नाही तर दहिसर, पोयसर, ओशिवरा अशा विविध नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये झाले आहे. अतिक्रमणामुळे नद्या आक्रसत गेल्या आणि नाल्यांच्या काठावरील परिस्थितीकडे सरकारी यंत्रणांचे दुर्लक्षच झाले. मात्र २६ जुलै २००५ रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबईत हाहाकार उडाला आणि अतिक्रमणाच्या मगरमिठीत अडकलेली मिठी आणि अन्य नदी-नाल्यांचे स्मरण यंत्रणांना झाले. त्यानंतर नदी-नाल्यांच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला. याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपविण्यात आली.
सोसायट्या, झोपड्या, कारखान्यांमुळे मिठी प्रदूषणग्रस्त
महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास पालिकेने घेतला. मात्र अद्यापही मिठीचा विकास पूर्ण होऊ शकलेला नाही. गेल्या काही दशकांमध्ये मुंबईतील लोकसंख्या वाढली आणि निवाऱ्यासाठी अनेकांनी मिठी काठाचा आश्रय घेतला. मिठी काठावर मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी उभी राहिली. काही भागात किनाऱ्यावरच छोटेखानी उद्योग थाटण्यात आले. तर लगतच्या भागात गृहनिर्माण सोसायट्याही उभ्या राहिल्या. झोपडपट्टी, सोसायट्या आणि कारखान्यांमधील सांडपाण्याचा मिठीतच विसर्ग होऊ लागला आणि आक्रसलेली मिठी प्रदूषणग्रस्त झाली. मिठीला बकाल रूप आले.
कामे अपूर्णच
आक्रसलेल्या मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण आणि काठावर संरक्षक भिंत उभारण्याची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. आपापल्या हद्दीतील कामे पालिका आणि एमएमआरडीएने जोमाने हाती घेतली. मात्र निरनिराळ्या कारणांमुळे ही कामे शंभर टक्के पूर्ण होऊ शकली नाहीत. परिणामी, मिठी पूर्णपणे अतिक्रमणमुक्त होऊ शकलेली नाही.
विकासही अपूर्ण…
मिठी नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी, रसायनयुक्त पाणी रोखण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे. मिठी काठी साधारण १७.८५ कि.मी. लांबीच्या मलनि:स्सारण वाहिन्यांचे जाळे उभे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यापैकी ९.७१ कि.मी. लांबीच्या मलनि:स्सारण वाहिन्या टाकण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली तर उर्वरित भागातील कामाची तयारी पालिका करीत आहे. मुंबईतील पुराला येत्या पावसाळ्यात आता १७ वर्षे पूर्ण होतील. मात्र या कालावधीत मिठीचा विकास करणे पालिकेला शक्य झाले नाही.
सौदर्यीकरणाचा घाट
काही भागातील वस्तीतून वाट काढून मिठी काठावरून जाताना आजही नाक मुठीत धरूनच चालावे लागते. मग अशा परिस्थितीतही आता मिठीच्या सौंदर्यीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. सर्वप्रथम मिठी काठावरील वस्त्या हटविणे गरजेचे आहे. या वस्त्यांमधील पात्र रहिवाशांचे स्थलांतर कळीचा मुद्दा आहे. विकासकामाआड येणाऱ्या कुटुंबियांच्या पर्यायी निवाऱ्यासाठी पुरेशी घरे पालिकेकडे नाहीत. त्यामुळे पुनर्वसनाचा मुद्दाही ऐरणीवर आहे. असे असताना आता मिठीच्या सौदर्यीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आता नवी कामे हाती घेण्यात येतील. आतापर्यंत हाती घेतलेली किती कामे पूर्ण झाली याचा यंत्रणांनीच आढावा घेण्याची गरज आहे. आता सौंदर्यीकरणाच्या कामांचाही त्यात भर पडणार आहे. ही सर्व कामे पूर्ण होऊन मिठी कधी वाहती कधी होणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे.