पंकज भोसले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गीतांजली श्री यांच्या `रेत समाधि’ या हिंदी कादंबरीची चर्चा हिंदी साहित्य जगतात गेले काही महिने जोरात होती. बुकर इंटरनॅशनल या इंग्रजी भाषेतील अनुवादासाठी दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च सन्मानाच्या स्पर्धेत त्यांचे पुस्तक पोहोचले होते. दीर्घ यादीतून लघुयादीत त्यांच्या पुस्तकाचा सव्वासातशे पानी अनुवाद `टूम्ब ऑफ सॅण्ड’ दाखल झाला तेव्हा हिंदी साहित्य मासिकांनी त्यांच्या मुलाखतींचा धडाकाच लावला. हिंदी साहित्यविश्व त्यांच्याद्वारे एक नवा इतिहास घडण्याची वाट पाहत होता, मात्र पुरस्कार मिळण्या- न मिळण्यात त्यांना कोणतेही स्वारस्य नव्हते. पुरस्कारामुळे एका दिवसात जगभर दखलपात्र ठरलेल्या गीतांजली श्री यांच्याविषयी…
कोण बरे या लेखिका?
उत्तर प्रदेशातील मैनपुरीत जन्मलेल्या आणि सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेल्या गीतांजली यांचे ‘रेत समाधि’ हे पाचवे पुस्तक आहे. गेली कित्येक दशके त्या हंस या हिंदीतल्या सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या साहित्यिक मासिकापासून इतर महत्त्वाच्या साहित्यिक व्यासपीठांवर आपल्या कथांद्वारे व्यक्त होत आहेत. हिंदी भाषेचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले नाही. मात्र त्यामुळेच विद्यापीठीय हिंदीपेक्षा वेगळी अशी भाषिक शैली त्यांना आत्मसात करता आली. त्यांच्या अनेक कथांचे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, कोरियन भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्या इंग्रजीत आल्या आहेत, शिवाय भारतीयता आणि डावेपणा यांच्यातला दुभंग प्रेमचंदांच्या साहित्यात कसा दिसतो, हे सांगणारा प्रबंधही त्यांनी इंग्रजीत (गीतांजली पाण्डेय या नावानं) लिहिला, तोही ग्रंथरूप झाला आहे.
जडण आणि घडण…
प्रेमचंद, शमशेर, अज्ञेय आणि इतर अभिजात हिंदी व ऊर्दू लेखक कवींच्या संस्कारात घडलेल्या गीतांजली श्री यांनी आपली भाषा आधुनिक म्हणून तयार केली. आयुष्याच्या प्रारंभीच्या काळात रंगभूमीशी जोडलेल्या असल्यामुळे त्यांच्या भाषेवर ध्वनी माध्यमाचा मोठा प्रभाव होता. प्रत्येक शब्द-वाक्य ध्वनीच्या ठोकताळ्यावरून सजवणारी त्यांची कथनशैली म्हणूनच लक्षवेधी ठरते. हिंदी कादंबरी लेखनासाठी त्यांना अनेक विदेशी अभ्यासवृत्ती मिळाल्या आहेत. फ्रान्स आणि जर्मनी या देशांतील महत्त्वाच्या रायटर अॅट रेसिडन्स लाभल्यामुळे त्यांच्या लिखाणात आपसूक जागतिक भान आढळते.
बुकर जाहीर झालेल्या कादंबरीविषयी
सातशेहून अधिक पानांचा ठोकळारुपी आकार असलेली ही कादंबरी भारतात, पाकिस्तानात आणि वाघा-अटारी सीमेवरही घडते. चंद्रप्रभा देवी ही ८० वर्षांची स्त्री दिल्लीच्या घरी पतिनिधनानंतर अंथरुणाला खिळलेली असते. मात्र एक दिवस अचानक तिची जीवनेच्छा जागृत होते, ‘स्त्री आणि पुरुष यांच्या सीमेवर’ असलेल्या एका तृतीयपंथीयाला भेटते आणि नंतर, मुलीसह पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेते. वाघा सीमेवरले ते संचलन पाहाताना तिला सआदत हसन मंटो, कृष्णा सोबती यांच्यापासून सारे ‘सरहदी’ लेखक भेटतात. पाकिस्तानात गोळी लागून ठार होण्याची तिची विचित्र मरणआकांक्षा असते. कादंबरीत कुटुंबातील व्यक्तिरेखांचे तिरकस चित्रण आहे. मुलगी- आई, मुलगा आणि आई यांच्या नात्यांवर गंमतीशीर भाष्य आहे. शिवाय पारंपरिक फाळणी जखमांवरच्या खपलीओढूपणाचीही नवी दृष्टी आहे.
वेगळे काय?
फाळणीच्या जखमांचे साहित्य हा ऊर्दू आणि हिंदी कथाविश्वाला अजिबात नवा विषय नाही. गुलजार यांच्यापासून भीष्म साहनी आणि मंटोपासून रामानंद सागर यांच्यापर्यंत कित्येक लेखक साठोत्तरी ते नव्वदोत्तरीपर्यंत हा विषय हाताळत होते. फाळणी आणि त्यामुळे झालेल्या दुःखाच्या जाणीवांना शेकडो कथांनी बंदिस्त केले आहे. असे असताना गीतांजली श्री यांनी त्यात नवे काय दिले आहे, तर त्या सगळ्याकडे पाहण्याची विनोदाची झालर असलेली दृष्टी. अशा प्रकारची कौटुंबीक गाथा मी यापूर्वी कधीच वाचलेली नाही, असे इंटरनॅशनल बुकर निवड समितीच्या एका सदस्याने म्हटले आहे.
दिग्गजांवर मात…
या स्पर्धेत तीन दिग्गज लेखिकांचा समावेश होता. जपानी लेखिका मिएको कावाकामी, दक्षिण कोरियायी लेखिका बोरा चुंग आणि याआधी हा पुरस्कार पटकावणाऱ्या ओल्गा टोकर्झूक. या तिन्ही लेखिकांचे आधीचे इंग्रजी अनुवाद हे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड लोकप्रिय आहेत. पैकी जपानी तरुण लेखिका मिएको कावाकामी या लेखिकेचा जगभरात मोठा वाचकवर्ग आहे. हारुकी मुराकामी यांनी तिच्या पहिल्या कादंबरीची ओळख करून दिली होती. त्यामुळे तिच्या कादंबरीला बुकर इंटरनॅशनल मिळेल असा अंदाज मांडला जात होता. त्याला बाद ठरवत हिंदी लेखिका गीतांजली श्री या यंदा बुकर इंटरनॅशनल ठरल्या.
मराठीशी संबंध…
गीतांजली श्री यांचे वाचन अभिजात आणि समकालीन हिंदी आणि इंग्रजी साहित्यापुरतेच मर्यादित नाही. वि. स. खांडेकर, अरुण कोल्हटकर, नामदेव ढसाळ, दया पवार, लक्ष्मण गायकवाड, भालचंद्र नेमाडे यांचे हिंदी अनुवाद त्यांंनी आवर्जून वाचल्याचे संदर्भ अनेक मुलाखतींमध्ये दिले आहेत. मराठी रंगभूमीशीही त्या परिचित आहेत. त्यामुळे पुकर इंटरनॅशनल हा एका बहुआयामी लेखिकेचा सन्मानच ठरला आहे. यामुळे अनेक भारतीय भाषांतील लेखकांना जागतिक पुरस्कारांचे कवाड खुले झाले आहे.