अन्वय सावंत
इंग्लंड क्रिकेट संघाने गेल्या काही वर्षांत एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे कसोटी क्रिकेटमधील त्यांचा आलेख मात्र वेगाने खालावल्याचे पाहायला मिळाले आहे. जो रूटच्या नेतृत्वाखाली खेळताना इंग्लंडला गेल्या १७ पैकी केवळ एक कसोटी सामना जिंकता आला. त्यामुळे रूटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आणि त्याच्या जागी अष्टपैलू बेन स्टोक्सकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. त्यानंतर काही दिवसांतच न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅककलमची इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. यामागे इंग्लंड क्रिकेट मंडळाचा (ईसीबी) नक्की काय विचार होता आणि मॅककलमपुढे कोणती आव्हाने असणार याचा घेतलेला आढावा.
मॅककलमची प्रशिक्षकपदी निवड का झाली?
‘‘मॅककलमला क्रिकेट संघातील संस्कृती आणि वातावरण बदलण्याचा अनुभव आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली संघांनी चांगली कामगिरी केली आहे. तो इंग्लंड कसोटी संघाला योग्य दिशा देईल याची मला खात्री आहे,’’ असे मॅककलमची प्रशिक्षकपदी निवड केल्यानंतर ‘ईसीबी’चे क्रिकेट संचालक रॉबर्ट की म्हणाले. इंग्लंडच्या कसोटी संघाला खेळण्याच्या शैलीत आणि मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता आहे. आक्रमक शैलीत खेळणाऱ्या मॅकलमने न्यूझीलंडचे ३१ कसोटी, ६२ एकदिवसीय आणि २८ ट्वेन्टी-२० सामन्यांत कर्णधारपद भूषवले होते. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या खेळण्याच्या पद्धतीचा कायापालट झाला. मॅककलमने सर्वच खेळाडूंना आक्रमक शैलीत खेळण्याची मोकळीक दिली. तसेच त्याने युवा खेळाडूंना प्रोत्साहन दिले. परिणामी न्यूझीलंडने २०१५च्या एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर केन विल्यम्सनने न्यूझीलंडच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. मॅककलमने केलेल्या बदलांचा विल्यम्सनलाही फायदा झाला आणि न्यूझीलंडने गेल्या वर्षी पहिल्या कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली. मॅककलम आता प्रशिक्षक म्हणून इंग्लंडच्या संघात महत्त्वाचे बदल घडवेल अशी ‘ईसीबी’ला आशा आहे.
प्रशिक्षकपदाचा कितपत अनुभव मॅककलमला आहे?
मॅककलम २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट, तर २०१९मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यानंतर त्याची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघ कोलकाता नाइट रायडर्स आणि कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) संघ ट्रिंबागो नाइट रायडर्सच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. त्याच्या मार्गदर्शनात ट्रिंबागो संघाने २०२०च्या ‘सीपीएल’चे जेतेपद पटकावले. या हंगामात ट्रिंबागो संघाने १२ पैकी १२ सामने जिंकण्याची किमया साधली. तसेच कोलकाता संघाने गेल्या ‘आयपीएल’ हंगामात अंतिम फेरीचा टप्पा गाठला होता.
पुढील आव्हाने मॅककलमपुढे कोणती असतील?
इंग्लंडच्या कसोटी संघाने अलीकडच्या काळात निराशाजनक कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या संघाची कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी ॲशेस मालिकाही ०-४ अशी गमावली. तसेच तारांकित फलंदाज रूटचा अपवाद वगळता इंग्लंडच्या एकाही खेळाडूला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मॅककलम-स्टोक्स जोडीला इंग्लंड कसोटी संघात मोठे बदल करावे लागणार आहे. ३९ वर्षीय जेम्स अँडरसन आणि ३५ वर्षीय स्टुअर्ट ब्रॉड या कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असलेल्या वेगवान गोलंदाजांना पर्याय शोधणे गरजेचे आहे. तसेच इंग्लंडला सलामीवीरांचा प्रश्नही सतावत आहे. त्यामुळे मॅककलमपुढे अनेक आव्हाने आहेत. मॅकलमची इंग्लंड कसोटी संघाचा प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका न्यूझीलंडविरुद्ध असणार आहे. जूनमध्ये न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २ जूनपासून खेळवला जाईल.
मॅककलमची खेळाडू म्हणून कामगिरी कशी होती ?
माजी यष्टीरक्षक-फलंदाज मॅककलमने २००२ ते २०१६ या कालावधीत १०१ कसोटी, २६० एकदिवसीय आणि ७१ एकदिवसीय सामन्यांत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. आक्रमक शैलीतील फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मॅककलमने कसोटी क्रिकेटमध्ये ३८.६४च्या सरासरीने ६४५३ धावा केल्या. तसेच त्याने २०१४मध्ये भारताविरुद्ध ३०२ धावांची खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा तो न्यूझीलंडचा एकमेव खेळाडू आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून त्याने १९ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली. तसेच ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामातील सलामीच्या सामन्यात त्याने कोलकाताकडून नाबाद १५८ धावांची खेळी साकारली होती.