मध्य काश्मीरचा बडगाम जिल्हा दहशतवादी कारवायांचे एक नवीन केंद्र बनला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हत्यांच्या मालिकेमुळे बडगाम जिल्हा चर्चेत आला आहे. हत्यासत्रामुळे सुरक्षा दलांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या वर्षी मार्चपासून श्रीनगर, पुलवामा आणि बारामुल्ला जिल्ह्यांच्या सीमेला लागून असलेल्या बडगाममध्ये पाच टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत.

टीव्ही कलाकार अमरीनची गोळ्या झाडून हत्या

गुरुवारी बडगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात एका स्थलांतरित मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. २५ मे रोजी अज्ञात बंदुकधारींनी हश्रू बडगाम येथील सोशल मीडिया स्टार अमरीनची तिच्या घरी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यात त्यांचा १० वर्षांचा भाचाही जखमी झाला आहे. पुलवामा येथील या कलाकाराच्या हत्येला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा २४ तासांत खात्मा केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

सुरक्षाविषयक बाबींची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात अनेक दहशतवादी मॉड्यूल सक्रिय आहेत, त्यामुळे या हत्या होत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही बडगाममधील लोकांना लक्ष्य करून दहशतवाद्यांना दक्षिण काश्मीरमध्ये पळून जाताना पाहिले आहे. अमरीन भटची हत्या करणाऱ्यांना पुलवामा येथे गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यामुळे हे द्योतक आहे की स्थानिक दहशतवाद्यांशिवाय दक्षिण काश्मीरमधील दहशतवादी देखील बडगाम जिल्ह्यात सक्रिय आहेत.

काश्मिरी पंडित राहुल भट यांची हत्या

१२ मे रोजी बडगाममधील चदूरा तहसील कार्यालयात काश्मिरी पंडित सरकारी कर्मचारी राहुल भट यांची हत्या करण्यात आली होती. भट यांच्या हत्येला जबाबदार असलेल्यांना बांदीपूरच्या जंगलात गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. २१ मार्च रोजी बडगाममध्ये तजमुल मोहिउद्दीन राथेर या नागरिकाचीही हत्या झाली होती. दोन आठवड्यांपूर्वी टेरिटोरियल आर्मीचा जवान समीर अहमद मल्ला याचे लोकीपोरा येथून अपहरण करण्यात आले होते आणि नंतर त्याचा मृतदेह बडगाममधील एका बागेत सापडला होता. मल्ला जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्री मध्ये तैनात होता.

बडगाम हा अतिसंवेदनशील जिल्हा

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, चकमकीत मारले गेलेले युसूफ कंत्रू आणि अब्बास शेख हे दोन टॉप कमांडर बडगाममध्ये दहशतवादी नेटवर्क तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. बडगाम जिल्ह्यात सेवा बजावलेल्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बडगाम हा अतिशय संवेदनशील जिल्हा आहे आणि येथे दहशतवाद वाढला तर त्याचा परिणाम श्रीनगरवरही होईल. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांनी बडगामकडे विशेष लक्ष द्यावे.

दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवादी सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर प्रशासनाने काश्मिरी पंडितांसह अल्पसंख्याक समुदायातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरूवात केली आहे. जम्मू-काश्मीरसाठी पंतप्रधानांनी २०१५ मध्ये जाहीर केलेल्या विकास योजनेनुसार भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी विचारले असता सूत्रांनी सांगितले की सुमारे सहा हजारपैकी साडे पाच हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे. विशिष्ठ समाजाला लक्ष्य करण्यात येत असल्याने अल्पसंख्याक समाजातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर सुमारे दहा हजार अल्पसंख्याक कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी नियुक्ती देण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.