भक्ती बिसुरे
कर्करुग्णांना केस किंवा कृत्रिम विग मिळवून देण्याच्या उद्देशाने हेअर फॉर होप इंडिया या स्वयंसेवी संस्थेतर्फे राष्ट्रीय पातळीवरील ‘कट अ थॉन’ कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. देशातील २५ शहरांमध्ये ही मोहीम पार पडली. त्यामध्ये सहभागी होऊन १२ इंच लांबीच्या केसांचे दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच, केमोथेरपी उपचार घेणाऱ्या कर्करुग्णांना पूर्वनोंदणी केल्यानंतर पाच पोनीटेल एवढे केस मोफत देण्यात आले. त्यानिमित्ताने कर्करुग्णांसाठी केशदान करण्याच्या या मोहिमेबाबत…
केशदान कशासाठी?
बहुतांश कर्करुग्णांना कर्करोग या नावानेच धडकी भरते. आपल्याला कर्करोग झाला आहे, या कल्पनेनेच हे रुग्ण हातपाय गाळतात. त्यावरील उपचारही प्रचंड वेदनादायी असतात. त्या उपचारांचे परिणाम रुग्णाच्या मनावर आणि शरीरावर होतात. त्याचाच एक भाग म्हणजे कर्करोगावरील उपचारांदरम्यान रुग्णांचे केस गळतात. डोक्यावरील सगळे केस केमोथेरपीमुळे जाणे ही कर्करोगाच्या निदानाने खचलेल्या रुग्णांच्या मनावर अधिक आघात करणारी गोष्ट असते. त्यावर उपाय म्हणून कर्करुग्णांसाठी केसांचे विग तयार करुन वापरण्याची कल्पना पुढे आली. कर्करुग्णांसाठी हे विग वापरायचे असल्याने शक्यतो ते नैसर्गिकच असावेत, असा कटाक्ष होता, म्हणूनच नागरिकांनी केशदान करावे असे आवाहन कर्करुग्णांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांतर्फे केले जाते. गेल्या काही वर्षांत कर्करुग्णांसाठी केशदान करण्याच्या कृतीला चळवळीचे स्वरुप प्राप्त होत आहे. त्याचाच भाग म्हणून अनेक महिला, पुरुष आणि अगदी लहान मुलेही नियमित केस दान करतात.
हेअर फॉर होप इंडियाही संस्था काय करते?
स्वत: कर्करोगातून बऱ्या झालेल्या प्रेमी मॅथ्यू यांच्या पुढाकाराने हेअर फॉर होप इंडिया या स्वयंसेवी संस्थेची सुरुवात झाली. कर्करोग बरा करण्यासाठी केमोथेरपी सुरू केल्यानंतर रुग्णांच्या केवळ डोक्यावरील नव्हे तर अंगावरील सगळेच केस जातात. एका बाजूला शरीर पोखरणाऱ्या आजाराची चिंता आणि दुसरीकडे आपल्या बाह्यरुपामुळे नाहीसा झालेला आत्मविश्वास अशा कात्रीत सापडलेल्या रुग्णांची अवस्था स्वत: जगल्यानंतर प्रेमी यांनी केशदान चळवळ उभी करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातूनच हेअर फॉर होप इंडियाची सुरुवात झाली. या स्वयंसेवी संस्थेमार्फत कर्करुग्णांना देण्यासाठी केस संकलित केले जातात. केरळमधून सुरु झालेली ही मोहीम दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये आणि पाठोपाठ देशभर, परदेशातही लोकप्रिय झाली आहे. प्रेमी मॅथ्यू सांगतात, कर्करुग्णांसाठी विग तयार करण्यासाठी १२ इंच लांबीचे केसांचे पाच पोनीटेल एवढे केस आवश्यक असतात. त्यामुळे कर्करुग्णांसाठी केस द्यायचे असल्यास ते कसेही कापलेले असता कामा नयेत ही प्रमुख अट आहे. रबरबँडने बांधलेल्या स्वरुपातील १२ इंच लांबीचे एकसलग केसच आवश्यक असल्याचे त्या स्पष्ट करतात.
कर्करुग्णांना मोफत केस?
केमोथेरपी उपचार सुरु असलेल्या कर्करुग्णांना आधार कार्ड आणि वैद्यकीय अहवालाची प्रत दाखवून मोफत केसांसाठी नावनोंदणी करता येते. या रुग्णांना पाच पोनीटेल एवढ्या प्रमाणात केस दान केले जातात. त्यांनी त्याचे विग तयार करून वापरावेत, असे सुचवले जाते. अथवा विग निर्मात्यांशी त्यांना जोडून दिले जाते. हेअर फॉर होप इंडियाचे प्रादेशिक समन्वयक लेंडिल सनी हे गेली कित्येक वर्षे नियमितपणे केस दान करतात. सनी सांगतात, माझ्यासारखेच कित्येक पुरुषही आता नियमितपणे केशदान करतात. हेअर फॉर होप इंडियाचे अनेक स्वयंसेवक नियमित केस वाढवतात आणि कर्करुग्णांसाठी दान करतात. `कट अ थॉन’सारख्या एकत्रित उपक्रमांव्यतिरिक्त सुद्धा केस देण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती पोनीटेल स्वरुपातील केस कापून ते पाठवू शकतात. ते गरजू कर्करुग्णांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संस्था पार पाडते. कर्करुग्णांसाठी दिले जाणारे केस हे स्वच्छ धुतलेले आणि कोणत्याही रासायनिक प्रक्रिया न केलेले असणे आवश्यक असल्याचे हेअर फॉर होप इंडियातर्फे सांगितले जाते. http://www.protectyourmom.asia या संकेतस्थळावर केस दान करण्याबाबत अधिक माहिती उपलब्ध आहे.
केशदान कसे करता येते?
कर्करुग्णांसाठी केस देण्यासाठीची प्रमुख अट म्हणजे केसांवर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केलेली नसावी. केसांचा रंग काळा, पांढरा, करडा असा कोणताही असला तरी तो नैसर्गिक असावा. कृत्रिम रंगाने रंगवलेले केस कर्करुग्णांसाठी पाठवू नयेत. केस १२ इंच लांब असतील तर शँपूने स्वच्छ धुवून वाळवलेले केस पोनीटेल स्वरुपात बांधावेत. बांधलेल्या रबर बँडच्या वरच्या बाजूने केस कापावेत. हे केस झिपलॉक प्लास्टिक पिशवीत बंद करावेत. बाहेरच्या हवेशी त्यांचा संपर्क येणार नाही हे पहावे आणि कुरिअरद्वारे – कोप विथ कॅन्सर, मुंबईच्या पत्त्यावर ते पाठवण्यात यावेत, असे हेअर फॉर होप इंडियातर्फे सांगण्यात आले आहे. http://www.protectyourmom.asia या संकेतस्थळावर केस दान करण्यासाठी पाठवण्याचे पत्ते देण्यात आले आहेत.