कॅनडातील हजारो ट्रक चालक अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्याचा करोना व्हायरस, क्वारंटाइन नियम आणि लसीशी संबंध आहे आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना या मुद्द्यांवरून लोकांनी घेरले आहे. २९ जानेवारी रोजी कॅनडातील ओटावा येथे या ट्रक चालकांनी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले होते.
नेमकं प्रकरण काय?
जानेवारीच्या सुरुवातीला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी नवीन नियम लागू केला. या अंतर्गत अमेरिका-कॅनडा सीमा ओलांडणाऱ्या ट्रक चालकांना कॅनडामध्ये परतल्यावर त्यांना क्वारंटाईन व्हावे लागणार होते. नियमांमध्ये असे नमूद केले आहे की चालकांनी पूर्णपणे लसीकरण केले पाहिजे. यासोबतच त्यांची कॅनडाला परतल्यावर चाचणी केली जाईल. या नियमावर नाराज होऊन ट्रकचालकांचा समूह जमा होऊ लागला आणि हळूहळू याने आंदोलनाचे स्वरूप धारण केले. कॅनडात एका आठवड्याहून अधिक काळ निदर्शने केल्यानंतर हे चालक आता राजधानी ओटावा येथे पोहोचले आहेत.
ट्रक चालक आणि ट्रकिंग कंपनीचे मालक हॅरोल्ड जोन्कर यांनी बीबीसीला सांगितले की आम्हाला मुक्त राहायचे आहे. आयोजकांनी याचे वर्णन फ्रीडम कॉन्वेय असे केले असून हे आंदोलन पूर्णपणे शांततेत होणार असल्याचे सांगितले आहे.
जस्टिन ट्रूडो काय करत आहेत?
कॅनेडामधल्या माध्यमांच्या वृत्तानुसार, ओटावामध्ये जिथे निदर्शने होत होती तिथे ट्रूडो उपस्थित नव्हते. कॅनडाच्या पंतप्रधानांनी नुकतेच सांगितले की ते करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांची दोन मुलेही पॉझिटिव्ह आली आहेत. संसर्गामुळे ते आणि त्याचे कुटुंब अज्ञात ठिकाणी राहत आहे. मात्र, ट्रुडो यांनी आंदोलकांवर तिखट शब्दांत टीका केली आहे.
कॅनडातील बहुतेक लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. अहवालानुसार, आतापर्यंत लसीसाठी पात्र असलेल्या ८० टक्क्यांहून अधिक लोकांना ही लस देण्यात आली आहे. मात्र ट्रकचालकांचे कोविड नियमांबाबत आंदोलन सुरू आहे. या निदर्शनाला अनेक स्थानिक नेत्यांचाही पाठिंबा मिळत आहे.
अनेक व्यावसायिक गट वाढत्या आंदोलनामुळे चिंतेत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा विरोध दीर्घकाळ चालला तर पुरवठा साखळीचा प्रश्न बिघडेल आणि सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.