प्रशांत केणी
४१ वेळा रणजी जेतेपदाचा अनुभव, संघात एकापेक्षा एक तारांकित फलंदाज, अमोल मुझुमदारचे मार्गदर्शन हे सारे घटक रणजी करंडक अंतिम सामन्यात मुंबईचा आत्मविश्वास उंचावणारे होते. पण तरीही मध्य प्रदेशने प्रथमच हा करंडक जिंकून इतिहास घडवला. मुंबईचा खेळाडू हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये ‘खडूस’ म्हणून ओळखला जातो. परंतु मुंबईकर चंद्रकांत पंडित यांनी याच ‘खडूस’ रणनीतीच्या बळावर अपरिचित खेळाडूंचा संच घेऊन रणजी स्पर्धेत यश मिळवून दाखवले. २३ वर्षांपूर्वी कर्णधार म्हणून मध्य प्रदेशला उपविजेतेपद मिळवून देणारे पंडित यांनी यंदा जेतेपदाचे यश प्रशिक्षक म्हणून मिळवून दिले. या निमित्ताने मध्य प्रदेशने कशी वाटचाल केली, या यशाचे शिलेदार कोण होते आणि पंडित यांची भूमिका कशी यशोदायी ठरली, याचा घेतलेला वेध.
मध्य प्रदेशने अंतिम फेरीपर्यंत कोणत्या संघांना हरवून वाटचाल केली?
मध्य प्रदेशने साखळीत तीन पैकी दोन विजय मिळवले. पहिल्या सामन्यात मध्य प्रदेशने गुजरातला १०६ धावांनी नामोहरम केले. मग दुसऱ्या लढतीत मेघालयावर एक डाव आणि ३०१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. केरळविरुद्धचा तिसरा सामना अनिर्णीत राहिला. त्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यात मध्य प्रदेशने पंजाबला १० गडी राखून पराभूत केले, तर उपांत्य सामन्यात बंगालवर १७४ धावांनी शानदार विजय मिळवला.
अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईला कसे नामोहरम केले? या सामन्याचे वैशिष्ट्य काय ठरले?
अंतिम सामन्यात तारांकित फलंदाज आणि गोलंदाजांमुळे मुंबईचे पारडे जड मानले जात होते. यंदाच्या रणजी हंगामातील सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज सर्फराज खान आणि सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज शम्स मुलानी हेसुद्धा मुंबई संघातील आहेत. परंतु तरीही मध्य प्रदेशने सहा गडी राखून निर्णायक विजय मिळवत जेतेपद पटकावले. मध्य प्रदेशच्या संघातील रजत पाटीदार आणि कुमार कार्तिकेया या दोन ‘आयपीएल’ खेळलेल्या खेळाडूंचा समावेश होता. अंतिम सामन्यात मुंबईचा पहिला डाव ३७४ धावसंख्येवर मर्यादित ठेवल्यानंतर मध्य प्रदेशने ५३६ धावांचा डोंगर उभारला. हेच सामन्याच्या निकालासाठी मध्य प्रदेशला पूरक ठरले. यापैकी सलामीवीर यश दुबे (१३३) आणि तिसऱ्या क्रमांकावरील यश शर्मा (११६) जोडीने दुसऱ्या गड्यासाठी २२२ धावांची चिवट भागिदारी उभारत मुंबईच्या गोलंदाजांना झगडायला लावले. त्यानंतर रजत पाटीदारनेही शतक झळकावले. त्यानंतर चौथ्या दिवसाच्या उत्तरार्धातच जेतेपद मुंबईकडून निसटल्याचे स्पष्ट झाले. अखेरच्या दिवशी मुंबईने दुसऱ्या डावात वेगाने २६९ धावा उभारत मध्य प्रदेशला विजयासाठी १०८ धावांचे लक्ष्य दिले. ते त्यांनी चार फलंदाजांच्या मोबदल्यात पेलले.
मध्य प्रदेशच्या यशात कोणत्या फलंदाजांचे आणि गोलंदाजांचे महत्त्वाचे योगदान ठरले?
मध्य प्रदेशकडून फलंदाजीत रजत पाटीदार (६४७ धावा), यश दुबे (६१४ धावा), सौरभ शर्मा (६०७ धावा), हिमांशू मंत्री (३७५ धावा) आणि अक्षर रघुवंशी (२९५ धावा) या फलंदाजांच्या धावांचे महत्त्वाचे योगदान होते. याचप्रमाणे गोलंदाजीत कुमार कार्तिकेया (४४ बळी), गौरव यादव (२३ बळी), अनुभव अगरवाल (१५ बळी) आणि सारांश जैन (१३ बळी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मध्य प्रदेशने याआधी रणजी करंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती का?
याआधी १९९८-९९मध्ये मध्य प्रदेशचा अंतिम फेरीत पोहोचला होता. त्या वेळी कर्नाटककडून ९६ धावांनी पराभवामुळे मध्य प्रदेशला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मध्य प्रदेशने याआधी हे ऐतिहासिक यश मिळवले, तेव्हा पंडित संघाचे कर्णधार होते. आता मिळवलेल्या यशात पंडित यांनी प्रशिक्षक म्हणून योगदान दिले आहे. योगायोगाची आणखी एक बाब म्हणजे मध्य प्रदेशचे हे दोन्ही सामने बंगळूरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळले गेले.
पंडित यांना ‘देशांतर्गत क्रिकेटमधील द्रोणाचार्य’ का म्हटले जाते?
२०१५पासून रणजी स्पर्धेत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संघ यशस्वी ठरत आहेत. विदर्भ आणि मध्य प्रदेश यांचे यश तर अनपेक्षित म्हणता येईल. पंडित यांनी २०१५-१६मध्ये मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. मग २०१६-१७मध्ये मुंबईचा संघ उपविजेता ठरला. २०१७-१८ आणि २०१८-१९ अशी सलग दोन वर्षे त्यांनी विदर्भाला सलग दोने जेतेपदे जिंकून दिली. त्यामुळेच रणजी करंडक स्पर्धेत जेतेपदाच्या शर्यतीत नसलेल्या संघांना विजेतेपद मिळवून देणारा प्रशिक्षक असा त्यांच्याबाबत विश्वास निर्माण झाला. त्यामुळेच पंडित यांना ‘देशांतर्गत क्रिकेटमधील द्रोणाचार्य’ म्हटले जाते.