सात दशकांपूर्वी भारतातून पूर्णपणे नामशेष झालेला चित्ता दुसऱ्या खंडातून भारतात परत आणण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये देशात तो आणण्यात येणार होता. मात्र, करोनामुळे त्याला विलंब झाला. त्याआधी २००९ मध्ये भारतात चित्ता परत आणण्याची कल्पना मांडण्यात आली. नवीन आणि पूर्णपणे वेगळ्या अधिवासात प्राणी स्थिर होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे तो कुठून आणायचा, कुठे स्थलांतरित करायचा यावर विचार करण्यात आला. त्याच्या यापूर्वीच्या स्थलांतरणाचा या अभ्यासात समावेश होता.
असे प्रयोग आधी कुठे झाले होते?
असे प्रयोग यापूर्वी इतरत्र झाले आहेत. उदा. पूर्व आफ्रिकेतील मलावी या देशात १९८०च्या उत्तरार्धात चित्ता नामशेष झाला होता. मग तेथे दक्षिण आफ्रिकेतून २०१७ मध्ये चार चित्ते स्थलांतरित करण्यात आले. आता त्या ठिकाणी २४ चित्ते आहेत. त्या प्रयोगापासून स्फूर्ती घेऊन आफ्रिकेतून भारतात चित्ता आणण्यावर शिक्कामोर्तब झाले. नियोजनाप्रमाणे सर्व काही पार पडल्यास हा पहिला आंतरखंडीय चित्ता स्थलांतरण प्रकल्प ठरेल.
भारतात कुठे आणि कसे?
भारतात चित्ता स्थलांतरणासाठी अनेक ठिकाणे निवडण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात आठ चित्ते मिश्र जंगल आणि गवताळ प्रदेश असलेल्या मध्य प्रदेशातील ७३० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात येतील. याशिवाय मध्य प्रदेशातीलच नौरादेही वन्यजीव अभयारण्य तसेच राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील शाहगंज येथेही ते आणण्यात येणार आहेत.
स्थलांतरणामागील उद्दिष्टे
सुरक्षित अधिवासात प्रजननाच्या माध्यमातून त्यांची संख्या वाढवणे आणि त्यांचे सुयोग्य व्यवस्थापन करणे हे एक उद्दिष्ट आहे. सोबतच पाच वर्षांसाठी दक्षिण आफ्रिका, नामिबिया, तसेच इतर आफ्रिकन देशातून ते आयात केले जाणार असून या कालावधीत ते जगू शकले नाहीत किंवा प्रजननातून त्यांची संख्या वाढू शकली नाही तर पर्यायी कृती कार्यक्रम किंवा ते बंद करण्यासाठी या संपूर्ण कार्यक्रमाचे पुनरावलोकन करण्यात येईल, असे चित्ताविषयक कृती आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.
चित्ता कार्यक्रमाचा तपशील…
१९७० च्या दशकात इराणमधून सुमारे ३०० चित्ते आयात करण्याची योजना आखण्यात आली होती. तथापि, त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या १९व्या बैठकीत भारतात चित्ता आणण्यासाठी पाच जानेवारी २०२२ला एक कार्ययोजना समोर आणली. या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांत भारतात ५० चित्ते आणण्यात येणार आहेत. या प्रत्येक चित्त्याला जीपीएसबंध हाय फ्रिक्वेंसी रेडिओ कॉलर लावून पाठवण्यात येणार आहे. आठ हजार ४०५ किलोमीटरचा प्रवास करून व्यावसायिक किंवा खासगी विमानाच्या माध्यमातून ते भारतात आणण्यात येणार आहेत.
पण मुळात इतका सुंदर जीव भारतात नामशेष कसा झाला?
या योजनेअंतर्गत भारतातील त्या क्षेत्रात चित्ते आणण्यात येणार आहेत, ज्या ठिकाणी आधी ते होते. मुघल तसेच ब्रिटिश अमदानीत अत्याधिक शिकारीमुळे चित्ते संपले. मुगल बादशाह चिंकारा आणि काळविटाच्या शिकारीकरिता चित्ते पाळत. १९००पासून भारतात चित्त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. १९४८मध्ये महाराजा रामानुज प्रताप सिंह देव यांनी भारतातील तीन शेवटच्या आशियाई चित्त्यांची शिकार केली.