-भक्ती बिसुरे
भारतीय हवाईदलाला बळकटी देण्यात अनन्यसाधारण योगदान असलेली चेतक ही लढाऊ हेलिकॉप्टर्स आपल्या कारकिर्दीची साठ वर्षे पूर्ण करत आहेत. भारतीय हवाईदलाच्या ताफ्यातील सर्वांत जुने हेलिकॉप्टर म्हणून चेतकचा लौकिक आहे. ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर प्रकारात मोडणाऱ्या चेतक हेलिकॉप्टर्सच्या ६०वर्षांच्या दमदार कामगिरीचा गौरव समारंभपूर्वक करण्यात आला. भारतीय हवाईदल आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे २ एप्रिलला एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन हैदराबादच्या सिकंदराबाद येथिल हकीमपेट हवाईदल स्थानकावर करण्यात आले.
चेतक हेलिकॉप्टर्सचा इतिहास काय? –
चेतक हेलिकॉप्टरचे मूळ नाव ॲलौट – ३ असे होते. तत्कालीन युरोकॉप्टर (सध्या सुद एव्हिएशन) या फ्रेंच कंपनीबरोबर सामंजस्य करार करून हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय कंपनीने १९६२ मध्ये या हेलिकॉप्टरचे उत्पादन सुरू केले. भारताच्या इतिहासात १६व्या शतकातील राजपूत राजा महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्याच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून या हेलिकॉप्टरचे चेतक असे नामकरण करण्यात आले. १९६५ मध्ये हवाईदलाला पहिले चेतक हेलिकॉप्टर उड्डाण खर्चामध्ये (फ्लाय अवे कॉस्ट) देण्यात आले. या हेलिकॉप्टरचे वजन दोन टन आहे. ५०० किलोमीटर पल्ला आणि १८५ किलोमीटर प्रती तास एवढी त्याची क्षमता आहे. सिंगल इंजिन हेलिकॉप्टर दोन वैमानिक आणि सात जणांना सामावून घेऊ शकते. प्रवास, मालवाहतूक, आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्यासाठी चेतकचा वापर गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. भारतात लष्कर, हवाईदल, नौदल आणि तटरक्षक दलाच्या ताफ्यात चेतक हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या माहितीनुसार, भारतात आणि भारताबाहेर किमान ३५० चेतक वापरात आहेत. परदेशातील हवाई दलांकडूनही या हेलिकॉप्टरला मागणी आहे.
भारतीय हवाई दलातील स्थान? –
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात गेल्या ६० वर्षांपासून चेतक हेलिकॉप्टर कार्यरत आहे. हवाई दलाच्या ताफ्यातील सर्वांत जुने हेलिकॉप्टर म्हणून चेतक ओळखले जाते. हवाई दलाच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी चेतकचा वापर प्रामुख्याने केला जातो. देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी, ल्ष्करी मोहिमांसाठी, आपत्ती निवारण आणि मदत कार्यासाठी चेतक हेलिकॉप्टर्सचे योगदान नेहमीच अनन्यसाधारण राहिले आहे. सियाचिनसारख्या देशाच्या भूभागांचे रक्षण करण्यात महत्त्वाच्या असलेल्या प्रदेशामध्ये तैनात असलेल्या सैन्यदलांसाठी चेतक जीवनवाहिनी म्हणून काम करते. २०१७पर्यंत प्रशिक्षण, आपत्ती निवारण आणि लष्करी मोहिमांतील गरजेच्या दृष्टीने भारतीय हवाईदलाच्या सर्वाधिक वापरात असलेले हेलिकॉप्टर म्हणून चेतकची नोंद करण्यात आली आहे. १९८६ मध्ये भारतीय लष्कराच्या उड्डाण विभागात (आर्मी एव्हिएशन कोअर) चेतक हेलिकॉप्टर्सचे हस्तांतरण करण्यात आले. सध्या रणगाडे विरोधी (अँटी टँक) मोहिमांसाठी तसेच संकटग्रस्तांची सोडवणूक (कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन) करण्याच्या मोहिमांसाठी प्रामुख्याने चेतक हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. २०१० नंतर इतर मोहिमांसाठी प्रामुख्याने ‘युटिलिटी’ प्रकारातील ध्रुव या हेलिकॉप्टरचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. हिमालयातील अतिउंच आणि दुर्गम भागातील मोहिमांसाठी चेतकला अत्याधुनिक टर्बोमेक टीएम ३३३-२बी इंजिन बसवून अद्ययावत करण्याचा पर्याय मध्यंतरीच्या काळात चर्चेत आला, मात्र त्याचा पाठपुरावा अद्याप झालेला नाही. भारतीय सैन्यदलांबरोबरच नामिबिया, सुरीनाम या देशांच्या सेनादलांमध्ये चेतक वापरात आहे. नेपाळसारख्या मित्र देशांना भारतीय सेनादलांनी चेतक प्रकारातील हेलिकॉप्टर दिली आहेत. भारत, घाना, ब्रिटन आणि नायजेरियाच्या संयुक्त राष्ट्र मदत अभियानासाठी राबवण्यात आलेल्या ऑप-खुकरीमध्ये चेतक हेलिकॉप्टरचा प्रभावी वापर करण्यात आला होता.
आपत्ती व्यवस्थापनातील अग्रणी? –
केवळ भारतातील नव्हे तर जगातील अनेक मित्र देशांवर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीसदृश संकटांमध्ये सर्वप्रथम मदतीला धावून जाणाऱ्यांमध्ये भारतीय हवाई दलाच्या चेतक हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. भारतातील महापुरासारख्या आपत्ती काळात चेतक हेलिकॉप्टरने आपले महत्त्व वेळोवेळी अधोरेखित करुन दाखवले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत नागरिकांना सुरक्षित जागी हलवणे, त्यांना अन्नाची पाकिटे, औषधे यांसारखी मदत पोहोचवणे या कामी चेतक हेलिकॉप्टर्सचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. २०१९मध्ये आलेले वायू चक्रीवादळ असो की देशाच्या अनेक भागात येणारे महापूर, स्थानिक प्रशासनाच्या मदतीसाठी हवाईदलाची चेतक हेलिकॉप्टर सदैव तैनात असतात.
पण काळाबरोबर की कालबाह्य? –
गेली ६० वर्षे भारतीय हवाईदल आणि सैन्यदलांना बळकटी देणाऱ्या चेतक हेलिकॉप्टर्सच्या ख्यातीला गालबोट लागण्याचे कारण म्हणजे त्यांची सुरक्षितता हे होय. २०१७पासून तिन्ही सैन्यदलांच्या ताफ्यातील ९ चेतक हेलिकॉप्टर्स दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती २०२१मध्ये समोर आली. म्हणजे दरवर्षी चेतकचे सरासरी दोन अपघात झाले. सध्या वापरात असलेल्या एकेरी इंजिन चेतक हेलिकॉप्टरचे हवाई तंत्रज्ञान (एव्हिऑनिक्स) कालबाह्य असल्याने त्यात ग्राऊंड प्रॉक्सिमिटी सिस्टिम्स सारख्या यंत्रणांचा अभाव आहे. आधुनिक हेलिकॉप्टर्समध्ये असलेले हवामानासाठीचे रडारही चेतकमध्ये नाहीत. खराब हवामानासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीत उद्भवणारा संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी लागणारी ऑटो-पायलट यंत्रणाही चेतकमध्ये नाही. त्यामुळे भविष्यात चेतक हेलिकॉप्टर्ससाठी पर्याय शोधले जाण्याची शक्यता आणि गरज आहे. मात्र, त्यामुळे चेतकने हवाईदलासह तिन्ही सैन्यदले आणि तटरक्षक दलाच्या कामगिरीत दिलेले योगदान कमी होत नाही.