भक्ती बिसुरे
गुटगुटीत, बाळसेदार मुले ही सर्वसाधारणपणे कौतुकाचा विषय असतात. मात्र, अलीकडच्या काळात हा बाळसेदारपणा वाढत्या वयानुसार कमी होत नसल्यामुळे तो कौतुकाचा नव्हे तर चिंतेचा विषय ठरत असल्याचा इशारा तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. भारतात सुमारे एक कोटी ४४ लाख मुलांना लठ्ठपणाचा विकार (पिडियाट्रिक ओबेसिटी) आहे. त्यामुळे मुलांमधील लठ्ठपणाच्या क्रमवारीत भारताचे जगातील स्थान चीनपाठोपाठ दुसरे आहे. लहान वयातील अतिरिक्त वजन हे मोठेपणीही मुलांच्या प्रकृतीसाठी चिंतेचे असल्याने मुलांच्या वजनाच्या काटय़ाकडे लक्ष ठेवण्याची गरज डॉक्टरांकडून अधोरेखित होत आहे.
लहान मुलांमधील लठ्ठपणा म्हणजे काय?
गेल्या काही वर्षांमध्ये मुलांचा लठ्ठपणा हा मुलांचे पालक आणि तज्ज्ञ डॉक्टर यांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. आहारातील जंकफूडचा वाढता समावेश, गोड पदार्थाचा अतिरेक, व्यायाम आणि हालचालींचा अभाव, करोना काळात घरात बंदिस्त राहावे लागणे अशा अनेक कारणांमुळे विशेषत: करोनाकाळ आणि टाळेबंदीनंतर मुलांच्या वजनाचा काटा वर जात आहे. मुले गलेलठ्ठ होत आहेत. विशेष करून पोटावर चरबी साठण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. यामध्ये प्रामुख्याने दहा वर्षांवरील वयाच्या मुलांचा समावेश आहे. १३ ते १८ या यौवन वयातील मुलांमध्ये ‘ओबेसिटी’चे प्रमाण अधिक आहे. भारतात सुमारे एक कोटी ४४ लाख मुलांचे वजन अतिरिक्त आहे. पेडियाट्रिक ओबेसिटीमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. या बाबतीत चीनचा प्रथम क्रमांक लागतो. भारतात बालरोगतज्ज्ञांकडे तपासणीसाठी येणाऱ्या मुलांमध्ये १०० पैकी दहा मुलांची वाटचाल ओबेसिटीच्या दिशेने असल्याचे निरीक्षण आहे.
लहान मुलांमधील लठ्ठपणाची कारणे काय आहेत?
मागील काही वर्षांत कुटुंबाची, पर्यायाने मुलांची बदलेली जीवनशैली हे त्यांच्या लठ्ठपणाचे प्रमुख कारण आहे. पालकांचा बदललेला आर्थिक स्तर, त्यातून संसाधने आणि पर्यायांची उपलब्धता, वाढत्या स्पर्धेमुळे शाळा, शिकवणी या चक्राला बांधली गेलेली मुले खेळ आणि व्यायाम या निकषावर मागे पडत आहेत. पालकांकडून मुलांना वेळ देणे कमी होत आहे. त्याचा परिणाम म्हणून मुलांचे हट्ट पुरवणे, त्यांना बाहेर खायला नेणे या गोष्टींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आहारात शीतपेये, फळांचे बाटलीबंद रस, पाकीटबंद पदार्थ, मैदा, साखर यांचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ मुलांच्या दैनंदिन आहारात आहेत. शाळा सुटल्यानंतर मैदानावर खेळणे हे जवळजवळ बंद झाले आहे. त्या सगळय़ाचा स्वाभाविक परिणाम मुलांच्या आकारावर होत आहे.
लहान मुलांमधील लठ्ठपणाबाबत डॉक्टर काय म्हणतात?
बालरोगतज्ज्ञांच्या मते लठ्ठपणा हा केवळ मुलांचा नव्हे तर कुटुंबाचा आजार होत आहे. कुटुंबातील आहाराच्या बदललेल्या सवयी, व्यायामाचा अभाव यांचा परिणाम वजनावर होताना दिसतो. भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग सांगतात, की सहसा आमच्याकडे येणाऱ्या १०० पैकी १० मुलांमध्ये लठ्ठपणा असतो. आपल्याकडे गुटगुटीत मूल म्हणजे निरोगी मूल असा समज आहे. तो तेवढा खरा नाही. मुलांमधील गुटगुटीतपणा हा एका मर्यादेनंतर अत्यंत गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. त्यासाठी बालरोगतज्ज्ञ आणि पालक यांनी सुरुवातीपासूनच मुलांचा ‘ग्रोथ चार्ट’ नोंदवत राहणे आवश्यक आहे. मुलांच्या वजनातील वाढ चुकीच्या दिशेने जात असल्यास त्यावर वेळीच केलेले उपचार मुलांना लठ्ठपणाच्या संकटातून वाचवू शकतात. आजकाल मित्रमैत्रिणी, भावंडे यांच्याबरोबर संध्याकाळचे खेळ ही गोष्टही वेळापत्रकात नसल्यासारखी आहे. मुलांच्या वजनाची समस्या करोनाकाळानंतर प्रामुख्याने जाणवत आहे. शाळा बंद, घराबाहेर पडण्यावर निर्बंध, हालचालींचा अभाव, आधी घरी केलेले आणि नंतर बाहेरून मागवलेले पदार्थ खाणे यांमुळे मुलांच्या वजनावर परिणाम दिसून आला आहे. अलीकडे घराघरांत गोड खाण्याचे व्यसन वाढताना दिसत आहे. बाहेरून विकत आणलेले गोड पदार्थ वारंवार खाणे हे वजन वाढीला हमखास कारणीभूत ठरतात. चयापचय विकारांचे प्रमाण मुलांमध्ये लक्षणीय असल्यानेही वजनाचा काटा वर जातो. त्याचाच परिणाम म्हणून तरुणाईमध्ये रक्तदाब, मधुमेहासारखे विकारही वाढत असल्याचे डॉ. जोग स्पष्ट करतात.
लहान मुलांमधील लठ्ठपणाबाबत आहारतज्ज्ञ काय सांगतात ?
आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर सांगतात, गेल्या काही वर्षांमध्ये १० ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांनाही वजन कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागत आहे. मुलांच्या वाढीच्या वयात शक्यतो त्यांच्यावर आहाराबाबत निर्बंध घालायचे नाहीत असे आहारशास्त्रामध्ये शिकवले जाते. मात्र, लठ्ठ मुलांना त्यांच्या वजनामुळे पुढे जाऊन अनेक त्रास होतात. जीवनशैलीजन्य आजारांच्या धोक्यांचे वयही आता अलीकडे आले आहे. त्यामुळे मुलांसाठी आहार नियोजन करणे हे आवश्यक ठरत आहे. तरी, शक्यतो मुलांना आवडतील अशा स्वरूपात पौष्टिक पदार्थ देण्याचा प्रयत्न केला जातो. मोड आलेली कडधान्ये, प्रथिने, डाळी, मांसाहार यांचे योग्य प्रमाण मुलांच्या पोटात जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. मात्र, हे करत असताना शक्यतो मुलांच्या आहारातून एखादा पदार्थ बंद करणे, एखाद्या पदार्थाची सक्ती करणे किंवा मोजून मापून आहाराचे बंधन घालणे या गोष्टी टाळत असल्याचे अर्चना रायरीकर सांगतात. मुलांच्या आहारात मैदा आणि साखरेचे प्रक्रिया केलेले पदार्थ टाळण्याचा सल्ला त्या देतात. पाकीटबंद पदार्थ घरी आणू नये, दररोज घरी केलेले ताजे पदार्थ मुलांना खायला द्यावे, त्यांच्या दिनक्रमामध्ये भरपूर दमवणारा शारीरिक व्यायाम किंवा खेळ समाविष्ट करावा तसेच चांगल्या व्यायामाचे महत्त्व मुलांना पटवून द्यावे, असा सल्ला रायरीकर देतात.
bhakti.bisure@expressindia.com