उदित मिश्रा
आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या हे आपले मनुष्यबळ की देशाच्या साधनसंपत्तीवरचा भार यासारख्या चर्चा जागतिक लोकसंख्यादिनी दरवर्षी झडत असल्या तरी भारत, चीन या दोन्ही देशांच्या वाढत्या लोकसंख्येबाबत चिंताही दरवर्षी केली जातेच. यंदाच्या जागतिक लोकसंख्यादिनीदेखील ती झालीच आणि ती आपल्यासाठी जास्त काळजीची आहे, असे चित्र पुढे आले आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

आपण काळजी करावी असे या अहवालात काय आहे?

संयुक्त राष्ट्रांचा जागतिक लोकसंख्येबाबतचा २०२२ चा अहवाल सोमवारी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्यादिनी प्रसिद्ध झाला असून या अहवालात २०२३ मध्ये लोकसंख्येत भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०२२ मध्ये चीनची लोकसंख्या १,४२६ दशलक्ष होती तर भारताची लोकसंख्या १,४१२ दशलक्ष होती. वर्षभरात भारत चीनला मागे टाकेल असा या अभ्यासाचा अंदाज आहे. अर्थात असे असले तरी भारतात गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणा (पाच)मध्ये असे आढळून आले आहे की या वर्षी प्रथमच भारतातील प्रजनन दर कमी होऊन २.२ वरून २.० वर आला आहे. गर्भनिरोधक पद्धतींचा वापर, आरोग्य सेवेची उपलब्धता आणि कुटुंब नियोजनाला चालना यामुळे ही घट झाली असे मानले जात आहे. पण तरीही जगाच्या तुलनेत आपली लोकसंख्या जास्तच आहे. आणि म्हणून ती आपल्यासाठी काळजीचा विषय आहे.

लोकसंख्यावाढ जास्त गंभीर की लोकसंख्येचे पोषण जास्त गंभीर?

इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस (ककढर) चे संचालक तसेच वरिष्ठ प्राध्यापक के. एस. जेम्स  यांच्या म्हणण्यानुसार भारत लोकसंख्येबाबत चीनला मागे टाकेल हे गेल्या काही काळापासून सातत्याने सांगितले जात होते. यापुढील काळात लोकसंख्यावाढीची फार काळजी करण्याची गरज नाही कारण जागतिक लोकसंख्या आठ अब्जांवर गेली असली तरी अनेक देशांनी (भारतासह) प्रजनन दर बदलण्याचे प्रमाण गाठले आहे. भारताची लोकसंख्या आधीच १.४ अब्ज आहे आणि कमी होण्याआधी ती १.६ अब्जांपर्यंत जाऊ शकते, याचा अभ्यासकांना अंदाज आहे. पण त्यानंतर ती स्थिरावत जाईल आणि कमी होऊ लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चिंता आहे ती लोकांच्या जीवनमानाची. त्याच्या गुणवत्तेची. आपण लोकांची गरिबी कमी करू शकतो का, त्यांना आरोग्य सुविधा पुरवू शकतो का, शिक्षण देऊ शकतो का यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

जागतिक लोकसंख्येबाबतची परिस्थिती काय आहे?

१९५० मध्ये जगाची लोकसंख्या २.५ अब्ज होती. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी जगाची लोकसंख्या आठ अब्ज होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजे अवघ्या ७२ वर्षांमध्ये जगाची लोकसंख्या जवळपास तिप्पट झाली आहे. अर्थात जगाची लोकसंख्या वाढत असली तरी, या वाढीचा वेग मंदावत आहे. २०३० मध्ये जागतिक लोकसंख्या सुमारे ८.५ अब्ज असेल, २०५० मध्ये ती ९.७ अब्ज तर २१०० मध्ये १०.४ अब्जपर्यंत वाढणे अपेक्षित आहे. २०२० मध्ये, जागतिक लोकसंख्यावाढीचा दर १९५० च्या नंतर प्रथमच एक टक्क्याने खाली आला आहे. २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येतील निम्म्याहून अधिक वाढ केवळ आठ देशांमध्ये होईल असे मानले जात आहे. काँगो, इजिप्त, इथिओपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलिपिन्स आणि टांझानिया हे ते देश. आफ्रिकेतील देशांची लोकसंख्या २१०० पर्यंत वाढत राहील आणि २०५० पर्यंत ते त्यांची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक असेल असे अपेक्षित आहे.

लोकसंख्यावाढीचे इतर परिणाम काय आहेत?

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात असे आढळून आले आहे की १९५० नंतर प्रथमच, २०२० मध्ये, लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्षी एक टक्क्यापेक्षा कमी झाला आहे आणि पुढील काही दशकांमध्ये आणि या शतकाच्या अखेरीस तो मंदावण्याचा अंदाज आहे. म्हणजेच जगभरातील प्रजनन दरात घट झाली आहे. अर्थात फक्त प्रजनन दर कमी होतो आहे, असे नाही तर औषधोपचारातील सुधारणा, लोक आरोग्यसेवेपर्यंत पोहोचू शकणे, सुधारलेले जीवनमान यामुळे जगात मृत्युदरही कमी होत आहे. हा घटकही लोकसंख्यावाढीसाठी कारणीभूत ठरला असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. म्हणजे हे एक प्रकारे दुष्टचक्र असल्यासारखेच आहे.

वृद्धांची संख्या जास्त असण्यामुळे काय होईल?

एकीकडे लोकसंख्यावाढ आणि दुसरीकडे सुधारलेल्या जीवनमानामुळे कमी झालेला मृत्युदर याचा परिणाम म्हणजे उत्पादक वयातील तरुणांची संख्या कमी होऊन अनुत्पादक वयातील वृद्धांची संख्या वाढणे. हा प्रकार जगातील अनेक देशांमध्ये दिसू लागला आहे. १९९० मध्ये जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान ६२ च्या आसपास होते. ते २०१९ मध्ये आयुर्मान ७२.८ वर्षांपर्यंत पोहोचले आहे.  म्हणजे साधारण २० वर्षांमध्ये ते सरासरी ९ वर्षांनी वाढले आहे. मृत्युदरात घट झाल्यामुळे २०५० मध्ये जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान ७७.२ वर्षे असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचे जागतिक लोकसंख्येतील प्रमाण वाढेल असा अंदाज आहे. २०५० पर्यंत, ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींची संख्या पाच वर्षांच्या मुलांपेक्षा दुप्पट आणि १२ वर्षांच्या लोकांपेक्षा दुप्पट होईल असा अंदाज आहे. भारतातील परिस्थितीदेखील यापेक्षा वेगळी नसेल. भारतात ०-१४ वर्षे आणि १५ ते २४  वर्षे वयाच्या लोकांची संख्या कमी होत जाईल, तर २५ ते ६४ आणि ६५ हून अधिक वयोगटातील लोकांची संख्या येत्या काही दशकांमध्ये वाढत जाईल, असे सांगितले जात आहे. अनुत्पादक लोकसंख्या वाढणे आणि तिला आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवणे याचा मोठा ताण येण्याची शक्यता त्यामुळे वाढते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained china will throw back population country resources manpower ysh
Show comments