Tiangong या अवकाश स्थानकांचे बांधकाम पूर्ण करण्याचे काम सध्या चीन युद्धपातळीवर करत आहे. या अवकाश स्थानकाचे विविध भागाचे अवकाशात प्रक्षेपित केले जात आहे. Long March 5 या सर्वात मोठ्या प्रक्षेकाच्या – रॉकेटच्या सहाय्याने ३१ ऑक्टोबरला तब्बल २२ टन वजनाचा एक भाग चीनने प्रक्षेपित केला. या रॉकेटचा मुख्य भाग हा पृथ्वीच्या वातावरणात नष्ट होण्याएवजी अनियंत्रित पद्धतीने पृथ्वीभोवती तीन दिवस फिरत राहीला आणि पॅसिफिक महासागरात कोसळला. मात्र या तीन दिवसात हा रॉकेटचा भाग नक्की कुठे कोसळणार, कधी कोसळणार हे निश्चित नसल्याने जगभर चिंतेचे वातावरण परसले होते.

रॉकेटचा भाग केवढा मोठा होता?

Long March 5 या रॉकेटचा मुख्य भाग हा तब्बल ३० मीटर लांब आणि २३ टनापेक्षा जास्त वजनाचा होता. प्रक्षेपणा दरम्यान या भागातील इंधन संपल्यावर हा भाग परत पृथ्वीच्या वातावरणात नष्ट होणे अपेक्षित होते. मात्र हा नष्ट न होता पृथ्वीभोवती अनियंत्रित पद्धतीने फिरत राहीला.

हे किती धोकादायक होतं?

रॉकेटचा एवढा मोठा भाग हा पृथ्वीभोवती तीन दिवस फिरत असतांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्याची उंची कमी होत होती. मात्र हे होतांना हा भाग पृथ्वीवर नक्की कुठे पडणार, पडतांना तो वातवरणात जळून नष्ट होणार का याबाबत अनिश्चितता होती. पृथ्वीवर कोसळता या भागाचे वातवारणाशी घर्षण होत जळत तुकडे होण्याची शक्यता होती. जर याचे काही तुकडे जमिनीवर पडले तर मनुष्यहानी किंवा वित्तहानी होण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला होता. स्पेन देशाने तर ही शक्यता लक्षात घेता त्यांचे आकाश हवाई क्षेत्र वाहतुकीकरता काही काळ बंद ठेवले होते.

असं या आधी कधी झालं होतं?

Long March 5 हे चीनचे सर्वात शक्तीशाली आणि जगातील सध्याचे दुसऱ्या क्रमांकाचे, उपग्रहांचे प्रक्षेपण करणारे रॉकेट-प्रक्षेपक आहे. या रॉकेटचे प्रक्षेपणाच्या वेळी इंधनासह एकुण वजन तब्बल ८५४ टन एवढे असते. चीनच्या रॉकेटचे भाग अनियंत्रित होत पृथ्वीवर कोसळण्याच्या अशाच घटना तीन वेळा गेल्या तीन वर्षात झाल्या होत्या आणि त्याही याच Long March 5 रॉकेटच्या बाबतीत. पहिल्या वेळी रॉकेटचे भाग हे Ivory Coast इथे कोसळले आणि वित्तहानी झाली होती. तर एकदा हिंदी महासागरात आमि फिलिपिन्स देशाजवळच्या समुद्रात याच रॉकेटचे अवकाशात भरकटलेले भाग हे कोसळले होते. आता पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये याच रॉकेटचे पुन्हा एकदा प्रक्षेपण होणार आहे.

चीन म्हणतो यात काही धोका नाही?

जगात अनेक वेळा उपग्रहांचे प्रक्षेपण अशा रॉकेटच्या माध्यमातून होत असते आणि रॉकेटचे भाग पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट होत असतात. हे भाग नियंत्रित पद्धतीने नष्ट केले जातात. Long March 5 हे एक उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असलेले रॉकेट असून प्रक्षेपणा दरम्यान त्याचे भाग नियंत्रित पद्धतीने नष्ट केले जात असल्याचं चीनने स्पष्ट केलं आहे.

गेल्या काही वर्षात चीनने अवकाश तंत्रज्ञानात मोठी झेप घेतली असून उपग्रह आणि अवकाश स्थानकासाठी आवश्यक प्रक्षेपण मोहीमांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अशा प्रक्षेपणाच्या माध्यमातून चीन आणखी चर्चेत रहाण्याची शक्यता आहे.

Story img Loader