ज्या वृद्धनागरिकांना एकदा करोना झाला आहे, त्यांना एका वर्षात स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता आहे. ६० लाख लोकांवर केलेल्या एका संशोधनानंतर १३ सप्टेंबररोजी प्रसिद्ध झालेल्या ‘जर्नल्स ऑफ अल्झायमर डिसीज’ या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे आणि स्मृतिभ्रंश नेमका काय असतो, हेच आज जाणून घेऊया.

हेही वाचा – RIP Asad Rauf: जगप्रसिद्ध पंच ते पाकिस्तानात शूज विक्रेता..भारतीय मॉडेलच्या ‘या’ आरोपाने बदललं असद रौफ यांचं आयुष्य

अहवालात नेमकं काय म्हटले आहे?

फेब्रुवारी २०२० ते मे २०२१ या दरम्यान, अमेरिकेतील संशोधकांनी ६५ वर्षांवरील ज्यांना एकदा करोना होऊन गेला आहे, अशा नागरिकांच्या आरोग्याबाबत एक संशोधन केले. यावेळी नागरिकांचे दोन गट पाडण्यात आले. एका गटात असे नागरीक होते, ज्यांना करोनाची लागण झाली होती, तर दुसऱ्या गटात ज्यांना करोनाची लागण झाल्याचा कोणताही पुरावा नव्हता, असा नागरीकांचा समावेश करण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही गटातील नागरिकांना स्मृतिभ्रंश झाल्याचे कोणतेही निदान झाले नव्हते. दरम्यान, अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला, की करोना झाल्याच्या एका वर्षानंतर ६५ वर्षांवरील नागरिकांना, करोना न झालेल्या नागरिकांच्या तुलनेत स्मृतीभ्रंश होण्याची शक्यता दुप्पट आहे. या नागरिकांना स्मृतीभ्रंश होण्यास कोणते घटक कारणीभूत यासंदर्भात अद्याप माहिती पुढे आलेली नाही, अशी माहिती वेस्टर्न रिझर्व्ह स्कूल ऑफ मेडिसिनच्या प्राध्यापक पामेला डेव्हिड यांनी दिली आहे. तसेच SARS-CoV2 हा मज्जासंस्थेवर हल्ला करत असल्याने यामुळे नागरिकांना दुसरे काही आजार होतात का? याचा आम्हाला अभ्यास करायचा होता, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाच – विश्लेषण : अमेरिकेतील ज्येष्ठ विधिज्ञ केनेथ स्टार कोण होते? कसे उजेडात आले बहुचर्चित मोनिका ल्युइन्स्की प्रकरण?

स्मृतिभ्रंश नेमका काय असतो?

ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून येणाऱ्या आजारांपैकी स्मृतिभ्रंश हा एक गंभीर आजार आहे. स्मृतिभ्रंश या आजारामुळे रुग्णांना दैनंदिन व्यवहार करणे अशक्य होते. जसे वय वाढते तसे मेंदूतील बदलांमुळे विसरभोळेणाचे प्रमाणसुद्धा वाढते. जेव्हा तुमची स्मरणशक्ती तुमचा निर्णय, भाषा व इतर कौशल्यांमध्ये बाधा आणते तेव्हा तिला स्मृतिभ्रंश म्हणतात. स्मृतिभ्रंश या आजारामध्ये मेंदूची क्षमता हळूहळू कमी होते. स्मरणशक्ती, विचारशक्ती कमी होते. त्यामुळे वागण्यात, स्वभाव व स्वावलंबनावर परिणाम होतो. हा आजार हळूहळू वाढत जातो व रुग्ण परावलंबी होतात. अशा रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी कुटुंबातील इतर व्यक्तींवर पडते.

स्मृतिभ्रंशाची लक्षणे काय आहेत?

स्मृतिभ्रंशाची लक्षणे अनेक लक्षणे आहेत. हळूहळू लक्षात कमी राहणे व दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढणे, लक्ष केंद्रित न होणे, अतिशय राग येणे, चिडचिड करणे, मूड बदलणे, परत-परत तेच तेच बोलणे, असंबद्ध बोलणे, वाचता न येणे, भास होणे, भूक न लागणे, स्थळ काळाचे भान कमी होणे, ओळखायला न येणे, ही स्मृतिभ्रंशाची प्रमुख लक्षणे आहेत.