भक्ती बिसुरे
दिवसा कडक ऊन आणि रात्रीपासून पहाटेपर्यंत जाणवणारी थंडी महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून अनुभवत आहे. त्यामुळे दिवसाचे तापमान आणि रात्रीचे तापमान यांच्यामध्ये सुमारे १५ ते २० अंश सेल्सिअसचा फरकही नोंदवण्यात येत आहे. अशा टोकाच्या विषम हवामानाचा सामना करताना प्रकृतीकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन सर्व स्तरांतून करण्यात येत आहे. प्रामुख्याने दिवसा कामानिमित्त घराबाहेर पडणे अनिवार्य असलेल्या व्यक्तींनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर स्पष्ट करत आहेत.
हेही वाचा >>>विश्लेषण : ब्रिटनमध्ये भाजीपाल्याची टंचाई, टोमॅटोचा भाव चौपट; जाणून घ्या नेमकं काय घडतंय?
विषम हवामान म्हणजे काय?
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सातत्याने दिवसा आणि रात्रीच्या तापमानामध्ये टोकाचा फरक नोंदवण्यात येत आहे. सगळय़ा जिल्ह्यांमध्ये दिवसाचे तापमान हे फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवडय़ापासूनच ३० अंश सेल्सिअसच्या वर गेलेले पाहायला मिळाले आहे. रात्रीचे तापमान काही भागांमध्ये १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा कमी नोंदवण्यात आले. आता ते चित्र बदलत असून रात्री काही भागांमध्ये थंडी आणि काही भागांमध्ये उकाडा असे चित्र दिसण्यास सुरुवात झाली आहे. मात्र रात्रीची थंडी अद्याप पूर्णपणे गेलेली नाही, असे संकेतही हवामान विभागातील तज्ज्ञांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस वातावरणातील ही विषमता कायम राहण्याची शक्यता आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील ही विषमता मानवी आरोग्यावर परिणाम करणारी ठरू शकते, याकडे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ लक्ष वेधतात.
हेही वाचा >>>विश्लेषण : करोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली? आतापर्यंत शास्त्रज्ञांच्या हाती काय लागले?
विषम हवामानाचे परिणाम?
मागील काही दिवसांपासून दिवसाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर रात्रीचे तापमान मात्र १० अंश सेल्सिअसच्या खाली असलेले पाहायला मिळत आहे. अशा टोकाच्या परिस्थितीचा परिणाम म्हणून आरोग्याच्या तक्रारी जाणवतात. दिवसाच्या कडक उन्हामुळे थकवा, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, त्याचा परिणाम म्हणून उलटय़ा होणे (डिहायड्रेशन) या गोष्टी आढळून येतात. या दिवसांत बहुतेक वेळा बाहेरील पाणी, सरबते प्यायल्याने पोटाच्या तक्रारी उद्भवतात. त्वचेवर चट्टे उठणे, त्वचा कोरडी पडून खाज येणे अशी लक्षणे दिसणारे रुग्ण अधिक दिसतात. डोळय़ांची आग होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणेही जाणवतात. शरीरातील पाणी कमी असेल आणि मूत्रविकारांची पार्श्व भूमी असेल तर अशा व्यक्तींना या हवामानामध्ये मूतखडय़ासारखा त्रास किंवा मूत्रिपडाचे विकार जाणवू शकतो. राज्यातील काही भागांमध्ये तापमान ३० अंशांवर गेले आहे. अनेक भागांमध्ये ते आत्ताच ३५ अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेले आहे. रात्रीच्या थंडीमुळे ताप, खोकला अशी लक्षणेही काही नागरिकांमध्ये आहेत.
हेही वाचा >>>विश्लेषण: पंजाबच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांचा नकार, आप सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव; कायदा काय सांगतो?
उष्माघाताची शक्यता किती?
राज्यात सध्या दिसून येणारे दिवसाचे तापमान ३० आणि काही भागांमध्ये ३५ अंश सेल्सिअसच्या वर असले तरी उष्माघाताचा धोका मात्र अद्याप नाही. मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान ३७ अंश सेल्सिअस एवढे असते. शरीराचे तापमान अति वाढल्यास किंवा फार कमी झाल्यास मेंदूवर, रक्ताभिसरणावर आणि शरीरातल्या आवश्यक रसांवर दुष्परिणाम होऊ शकतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास ही यंत्रणा बिघडते. दरदरून घाम येणे, मळमळणे, उलटय़ा, धडधडणे, अति थकवा, त्वचा काळी-निळी होणे, रक्तदाब आणि नाडीचे ठोके कमी होणे अशी उष्माघाताची लक्षणे असतात. वेळेवर उपचार झाले तर रुग्ण बरे होतात, मात्र दुर्लक्ष झाले तर जिवावर बेतण्याची शक्यताही असते.
काय काळजी घ्यावी?
विषम हवामानाचा त्रास होऊ नये यासाठी उन्हाचा चटका थेट अंगावर न घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यासाठी दुपारी ११ ते ४ या वेळेत गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, कामानिमित्त बाहेर पडणे आवश्यकच असेल तर डोक्यावर टोपी घालणे, सुती कापड घेणे, डोळय़ांवर काळय़ा काचांचा चष्मा लावणे महत्त्वाचे आहे. घराबाहेर पडताना सतत पाण्याची बाटली बरोबर ठेवावी आणि घोट-घोट पाणी पीत राहावे, यामुळे शरीरातील पाण्याची पातळी स्थिर राखणे शक्य आहे. ताजे, पौष्टिक अन्न घेणे; आहारात ताक, दही यांचा समावेश करणे यानेही तापमानाचा त्रास रोखणे शक्य आहे. फळांचा ताजा रस, शहाळय़ाचे पाणी, सरबते, लहान मुलांसाठी मीठ-साखर आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेले पाणी पिणे हे ओआरएससारखे काम करते, असेही तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.