काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अगोदर वाद निर्माण होत असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या अनेक नेत्यांनी मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी केली होती, जी काँग्रेसने फेटाळली आहे. काँग्रेसचे म्हणने आहे की ही एक अंतर्गत प्रक्रिया आहे आणि पक्षाचा कोणताही सदस्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयातून मतदार यादी घेऊ शकतो.
मनीष तिवारी, शशी थरूर आणि कार्ति चिदंबरम यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.

काँग्रेसच्या निवडणूक कार्यक्रमानुसार २४ सप्टेंबरपासून नाम निर्देशन दाखल केले जातील. १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होईल आणि १९ ऑक्टोबरला निकालाची घोषणा होईल. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधींनी अद्यापर्यंत होकार दिलेला नाही. अशावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव या शर्यतीत सर्वात पुढे आहे.

पण मतदार याद्यांवर प्रश्नचिन्ह का? –

मतदार याद्या सार्वजनिक करण्याची मागणी काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी, शशी थरूर आणि कार्ति चिदंबरम यांच्याकडून केली जात आहे. मनीष तिवारी यांचे म्हणणे आहे की, पारदर्शक निवडणुकीसाठी मतदार यादी सार्वजनिक करायला हवी.

मनीष तिवारींनी म्हटले की, जर मतदार यादी सार्वजनिकच होणार नसेल, तर कोणी निवडणूक लढवण्याचा कसा विचार करेल. याशिवाय त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, मी मधुसूदन मिस्त्रींना आदरपूर्वक विचारू इच्छितो की, मतदार याद्या सार्वजनिक न करता स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक कशी होऊ शकते? स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी प्रतिनिधींची नावं आणि पत्ते काँग्रेसच्या वेबसाईटवर सार्वजनिकरित्या उपलब्ध असायला हवीत.
काँग्रेस खासदार शशी थरुर हे देखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभा राहू शकतात. त्यांनी मनीष तिवारींच्या बोलण्याला पाठिंबा दर्शवत सांगितले की, हे माहिती हवे की कोण नाम निर्देशन आणि कोण मतदान करू शकतं. त्यांनी असेही म्हटले की, मला वाटतं मतदार यादीत पारदर्शिता असायला हवी. जर मनीषने ही मागणी केली आहे, तर मला खात्री आहे की याच्याशी सगळे सहमत असतील. सर्वांना हे समजलं पाहिजे की कोण नामनिर्देशित करू शकतं आणि कोण मतदान करू शकतं. त्यांनी म्हटलं की यामध्ये काहीच चुकीचं नाही.

याशिवाय आणखी एक काँग्रेस खासदार कार्ति चिंदबरम यांनी देखील याचे समर्थन केले आणि म्हटले की, प्रत्येक निवडणूक ही पारदर्शिक असणे आवश्यक असते. जे सुधारणांची मागणी करतात ते बंडखोर नसतात.

काँग्रेसचे काय आहे म्हणणे? –

काँग्रेसने ही मागणी फेटाळली आहे. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणचे (सीईए) चेअरमन मधुसूदन मिस्त्रींनी सांगितले की, पक्षाच्या अध्यपदाची निवडणूक पारदर्शी आहे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्वतंत्र आणि निष्पक्ष आहे.
मिस्त्रींनी सांगितले की, पक्षाच्या घटनेनुसार मतदार यादी सार्वजनिक नाही केली जाऊ शकत. ही अंतर्गत प्रक्रिया आहे. जे पण निवडणूक लढवत आहे, ते प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयातून मतदार यादी मिळवू शकतात.

तसेच, काँग्रेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, काँग्रेसमध्ये अशी परंपरा कधीच राहिली नाही. आम्ही जुन्याच परंपरेचं पालन करू.

यावर प्रश्न उपस्थित करत मनीष तिवारींनी म्हटले की, मतदार कोण आहेत, हे जाणून घेण्यासाठी का कुणाला देशातील प्रत्येक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात गेलं पाहिजे? त्यांनी हे देखील प्रश्न उपस्थित केले की, ज्या कोणाला पक्षात सुधारणा हवी आहे, त्याने राजीनामा दिला पाहिजे का? केवळ अंध अनुयायांनाच पक्षात परवानगी आहे का?

अध्यक्षपदाची निवडणूक कशी होते? –

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची जबाबदारी ही केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाची असते. या प्राधिकरणाचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे. हे प्राधिकरण वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणूक प्राधिकरण गठित करते आणि नंतर राज्य निवडणूक प्राधिकरणच जिल्हा आणि ब्लॉकमधील निवडणूक प्राधिकरण असते.

ब्लॉक कमिटी आणि बूथ कमिटी मिळून प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी निवडतात. हेच पीसीसी प्रतिनिधी अध्यक्षाच्या निवडणुकीत मतदान करतात. २०१७ च्या निवडणुकीत ९ हजार प्रतिनिधी होते. ज्या उमेदवाराला पीसीसी प्रतिनिधींकडून सर्वाधिक मते मिळतात तो विजयी घोषित केला जातो.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोणीही निवडणूक लढवू शकते. यासाठी त्याला दहावी पीसीसी प्रस्तावकांचा पाठिंबा असायला हवा. निवडणुका संपल्यानंतर निकाल जाहीर होतात. त्यानंतर अधिवेशन बोलावले जाते, ज्यामध्ये अध्यक्षांची औपचारिक घोषणा केली जाते.