महेश सरलष्कर
नवीन संसदभवनाच्या दर्शनी भागावर, भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह असलेल्या अशोक स्तंभातील सिंहमुद्रेची प्रतिकृती बसवण्यात आली असून तिचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. परंतु ही प्रतिकृती सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रतीकाच्या अनावरणप्रसंगी विरोधी पक्षियांना बोलावले गेले नाही, हा एक आक्षेप. दुसरा अधिक गंभीर आक्षेप प्रत्यक्ष सिंहमुद्रेच्या स्वरूपाविषयी आहे. या मुद्रेतील सिंह मूळ सिंहांच्या तुलनेत निष्कारण दात विचकणारे, बटबटीत, आक्रमक असल्याची टीका अनेकांकडून होत आहे. या सर्व घडामोडींवरील हा विश्लेषणात्मक दृष्टिक्षेप –
राष्ट्रीय मानचिन्हाचा वाद का निर्माण झाला?
संसदेच्या आवारात नवे संसदभवन उभारले जात असून या इमारतीच्या दर्शनी भागावर राष्ट्रीय मानचिन्ह असलेल्या अशोक स्तंभावरील सिंहमुद्रेची प्रतिकृती बसवण्यात आली आहे. तिचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या समारंभाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश उपस्थित होते. मात्र, विरोधी पक्षांच्या एकाही सदस्याला समारंभासाठी निमंत्रण देण्यात आले नव्हते. राष्ट्रीय मानचिन्ह वा संसदभवन जनतेचे प्रतिनिधित्व करतात, त्यावर फक्त केंद्र सरकारचा वा सत्ताधारी पक्षाचा अधिकार असत नाही. संसद सरकार आणि विरोधकांची मिळून बनते. त्यामुळे संसदेतील समारंभाला विरोधकांनाही सहभागी करून घ्यायला हवे होते. मोदींनी कोणाचीही दखल न घेता मानचिन्हाच्या नव्या प्रतिकृतीचे अनावरण केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
मानचिन्हाच्या नव्या प्रतिकृतीवर विरोधकांनी आक्षेप का घेतले?
सम्राट अशोकाने देशात विविध ठिकाणी युद्ध आणि शांततेचे प्रतीक असलेले स्तंभ उभे केले. या स्तंभावर असलेल्या चारही सिंहांच्या चेहऱ्यावर शांत भाव प्रकट होतात. हे सिंह आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत. पण, मूळ सिंहमुद्रेच्या वैशिष्ट्यांकडे, आत्मगुणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असून नव्या प्रतिकृतीतील सिंह उग्र आणि विनाकारण आक्रमक दिसतात. ही सारनाथमधील सिंहमुद्रेची प्रतिकृती आहे की, गीरच्या सिंहांचे विकृतीकरण, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. नव्या प्रतिकृतीमध्ये सिंहांच्या मूळ गुणधर्म, स्वभावधर्मात बदल केलेला आहे. हे संविधानाचे स्पष्टपणे उल्लंघन आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. राष्ट्रीय मानचिन्हामध्ये कोणताही बदल करण्यास मनाई करणारा कायदा २००५ मध्ये करण्यात आला होता. पण, मोदी सरकारने या कायद्याचेही उल्लंघन केले आहे. सिंहमुद्रेतील बदल लज्जास्पद असल्याची टीका तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार जवाहर सिरकार यांनी केली आहे. राष्ट्रीय मानचिन्हावर ‘सत्यमेव जयते’ लिहिलेले आहे. पण नव्या प्रतिकृतीला मोदी सरकारने ‘संघीमेव जयते’ बनवलेले आहे, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांनी केली आहे. उग्र, आक्रमक आणि संतप्त सिंहमुद्रा ही मोदी युगातील नव्या भारताचे प्रतीक असल्याचाही आरोप विरोधक करत आहेत.
केंद्राचा युक्तिवाद नेमका काय?
सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहमुद्रेची हुबेहूब नवी प्रतिकृती आहे. मूळ प्रतिकृती १.५ मीटर उंचीची आहे तर, संसदेच्या नव्या इमारतीच्या दर्शनी भागावर बसवलेली मानचिन्हाची प्रतिकृती ६.५ मीटर उंचीची आहे. छोटा आकार आणि वेगवेगळ्या कोनातून काढलेल्या छायाचित्रांमुळे सारनाथची सिंहमुद्रा शांतचित्त वाटते, तर मानचिन्हाची नवी प्रतिकृती उग्र भासते, असा युक्तिवाद केंद्रीय नागरी विकासमंत्री हरदीप पुरी यांनी केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सौंदर्य प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपात दिसते. विरोधकांना चारही सिंह संतप्त आणि आक्रमक दिसत असतील तर ती त्यांची सौंदर्याकडे पाहण्याची दृष्टी असेल. सिंहांच्या चेहऱ्यावर संताप दिसतो की, आत्मविश्वास हे ज्याचे-त्याने ठरवावे. सिंहमुद्रेची नवी प्रतिकृती ३३ मीटर उंचीवर बसवण्यात आली असून त्याकडे खालून पाहिले तर सिंहांचे दात दिसू शकतात. सारनाथमधील मूळ प्रतिमा जमिनीवर ठेवलेली आहे. मानचिन्हाची प्रतिकृती मूळ सिंहमुद्रेइतकी लहान केली तर, दोन्हींमध्ये कोणताही फरक दिसणार नाही, असाही दावा पुरी यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्री-भाजपच्या नेत्यांचे म्हणणे काय आहे?
भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, विरोधक निव्वळ विरोधासाठी विरोध करत आहेत. त्यांचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे एवढेच आहे. ज्यांनी संविधानाचे पालन केले नाही, (काँग्रेसने आणीबाणी लागू केली!), जे काली मातेचा सन्मान करत नाहीत, त्यांना अशोक स्तंभावर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे.
शिल्पकारांचे म्हणणे काय आहे?
मानचिन्हाची नवी प्रतिकृती औरंगाबाद, जयपूर आणि दिल्ली या तीन ठिकाणी बनवली गेली असून शिल्पकार सुनील देवरे व लक्ष्मी व्यास यांनी ही प्रतिकृती तयार केली आहे. राष्ट्रीय मानचिन्हाची प्रतिकृती ६.५ मीटर उंचीची असून कांस्य धातूमध्ये बनवलेली आहे. ही प्रतिकृती साडेनऊ हजार किलो वजनाची असून त्याला साडेसहा किलोचा पोलादी आधार देण्यात आला आहे. शिल्पकार देवरे यांच्या म्हणण्यानुसार, प्रतिकृती कशी तयार करायची हे आम्हाला सांगण्यात आलेले होते. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी आम्हाला ९ महिने लागले. सारनाथमधील मूळ सिंहमुद्रेची ही हुबेहूब प्रतिकृती आहे. प्रतिकृतीसाठी आम्हाला टाटा कंपनीने कंत्राट दिले होते. केंद्र सरकार वा भाजपशी आमचे थेट कंत्राट झालेले नव्हते. अशोक स्तंभाचे प्रारूप दाखवण्यात आले होते, त्याला हिरवा कंदिल मिळाल्यानंतर प्रतिकृती तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले.
सारनाथमधील शिल्प कसे आहे?
सम्राट अशोक याची राजधानी उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे इस. पूर्व २५० मध्ये सिंहमुद्रा असलेला स्तंभ उभारला होता. अशोकाच्या काळात देशभर असे स्तंभ उभारले गेले. या स्तंभांवर चार सिंहांची मुद्रा बसवलेली आहे. वाराणसीपासून काही अंतरावर असलेल्या सारनाथमधील संग्रहालयामध्ये मूळ सिंहमुद्रा ठेवण्यात आली आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर अशोक स्तंभावरील सिंहमुद्रा राष्ट्रीय मानचिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.