भक्ती बिसुरे
जानेवारी महिन्यात ओमायक्रॉन या करोनाच्या उपप्रकाराने राज्यासह देशभरात तिसरी लाट निर्माण केली. त्यानंतर करोना संसर्गाचा ज्वर जवळजवळ ओसरल्याचेच दिसून आले. जगरहाटीही पूर्ववत झाली. मात्र, आता ओमायक्रॉनचे बीए-४ आणि बीए-५ हे उपप्रकार पुन्हा डोके वर काढून रुग्णसंख्या वाढवताना दिसत आहेत. युरोपियन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी हे प्रकार चिंतेचे (व्हेरियंट्स ऑफ कन्सर्न) असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पाठोपाठ भारतात आढळत असलेल्या नव्या करोना रुग्णांमध्ये बीए-४ आणि बीए-५ असल्याचे – ‘द इंडियन सार्स कोव्ही-२ जिनोमिक्स कन्सोर्टियम’ अर्थात इन्साकॉगकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बीए-४ हा दक्षिण आफ्रिकेत नवी लाट निर्माण करण्यास कारणीभूत ठरला आहे, त्यामुळेच या उपप्रकारांबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
बीए-४ आणि बीए-५ ची पार्श्वभूमी काय?
जानेवारी महिन्यात सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन विषाणूचे अस्तित्व आढळले. त्यानंतर भारतात ओमायक्रॉनने तिसरी लाट निर्माण केली. ही लाट निर्माण करणारा विषाणू किंवा उत्परिवर्तन थेट ओमायक्रॉन हे नसून बीए-१ हा ओमायक्रॉनचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते. सुदैवाने या लाटेमध्ये रुग्णांना अत्यंत सौम्य लक्षणे दिसली. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची किंवा प्राणवायू आणि इतर तातडीच्या उपचारांची गरज भासण्याचे प्रमाणही अत्यल्प राहिले. साहजिकच रुग्ण दगावण्याचे प्रमाणही अगदी कमी होते. बीए-१ ओसरेपर्यंत बीए-२ या प्रकाराची कुणकुणही लागली होती. मात्र, हे दोन्ही प्रकार तेवढे गंभीर नसल्याने साथीचे गांभीर्य कमी राहिले. आता ओमायक्रॉनचेच नवे प्रकार म्हणून बीए-४ आणि बीए-५ समोर आले आहेत. भारतातील नव्या करोना रुग्णांमध्येही या दोन प्रकारांच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.
बीए-४ आणि बीए-५ हे काय आहे?
बीए-४ आणि बीए-५ हे भारतात तिसरी लाट आणण्यास कारणीभूत ठरलेल्या ओमायक्रॉनचे नवे प्रकार आहेत. दक्षिण आफ्रिकेत आणि पाठोपाठ युरोप आणि अमेरिकेत अलीकडेच दिसू लागलेल्या या रुग्णवाढीला हे प्रकार प्रामुख्याने कारणीभूत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आतापर्यंत १६ देशांमध्ये या प्रकारांचे रुग्ण आढळून आले आहेत. विशेषतः पहिल्या तीन लाटांमध्ये करोना संसर्ग होऊन त्यातून बरे झालेल्या रुग्णांनाही या प्रकाराचा संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांनी गाफिल न राहता मुखपट्टी वापरासारखे प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.
इन्साकॉगचे म्हणणे काय?
द इंडियन सार्स कोव्ही-२ जिनोमिक्स कन्सॉर्टियम अर्थात इन्साकॉगचे प्रमुख डॉ. सुधांशू वर्टी यांनी बीए-४ आणि बीए-५ फारसे गंभीर ठरण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येला करोनाचा संसर्ग होऊन गेला आहे, तसेच लसीकरणाचे प्रमाणही समाधानकारक आहे. त्यामुळे नवे उपप्रकार आले तरी त्यामुळे पुन्हा दुसरी लाट सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज इन्साकॉगकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र, नवी दिल्लीतील उदाहरणावरुन रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरिकांना बीए-४ आणि बीए-५ चा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती इन्साकॉगकडून देण्यात आली. घाबरुन जाण्याची गरज नसली तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खबरदारीचे उपाय अवलंबणे मात्र आवश्यक असल्याचे आवाहन इन्साकॉगकडून करण्यात आले आहे.
नवी लाट येणार?
बीए-४, बीए-५ उत्परिवर्तनांमुळे नवी लाट येण्याची शक्यता आहे किंवा नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दक्षिण आफ्रिकेतून हैदराबाद येथे आलेल्या एका रुग्णाला बीए-४ बीए-५ उत्परिवर्तनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तामिळनाडूमधील संपूर्ण करोना लसीकरण झालेल्या एका तरुणीलाही संसर्ग झाला आहे. या सर्व रुग्णांमध्ये आजाराची लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासलेली नाही. ज्या नागरिकांचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही किंवा ज्यांना ओमायक्रॉनच्या लाटेमध्ये संसर्ग झालेला नाही त्यांना संसर्गाचा धोका आहे. बाधित रुग्णांना लक्षणे अत्यंत सौम्य असतील तरी त्यांच्यामुळे इतर अनेकांना संसर्ग होण्याचा धोका आहे. ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, वर्धक मात्राही घेऊन झाली आहे त्यांना धोका कमी असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काळजीचे कारण किती?
ओमायक्रॉनच्या बीए-४ आणि बीए-५ उत्परिवर्तनांना जागतिक आरोग्य संघटनेने चिंताजनक उत्परिवर्तन (व्हेरियंट ऑफ कन्सर्न) म्हणून जाहीर केले आहे. ओमायक्रॉनचेच उत्परिवर्तन असलेले जानेवारी महिन्यात आलेले बीए-२ आणि बीए-३ हे डेल्टाच्या तुलनेत सौम्य राहिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही, मात्र लसीकरण न झालेले, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्त यांनी त्याबाबत गाफिल न राहण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. त्यामुळे बीए-४ आणि बीए-५ बाबतही प्रतिबंधात्मक धोरण कटाक्षाने अवलंबण्याची गरज आहे, हे स्पष्ट आहे.
bhakti.bisure@expressindia.com