भक्ती बिसुरे
कर्नाटकमधील चेतना राज या अभिनेत्रीचा चरबी निर्मूलन शस्त्रक्रियेदरम्यान (फॅट फ्री कॉस्मेटिक सर्जरी) मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. कॉस्मेटिक सर्जरी ही अलिकडच्या काळात सर्रास होणारी गोष्ट झाली आहे. कॉस्मेटिक सर्जरी हा प्लास्टिक सर्जरीचाच एक प्रकार आहे. चेहरा किंवा शरीरावरील दोष दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे काय, ती कशासाठी केली जाते, त्याचे परिणाम काय होतात आणि अशी शस्त्रक्रिया अयशस्वी झाली असता त्यात जोखीम किती अशा अनेक पैलूंचा आढावा घेणारे हे विश्लेषण.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेतना राजच्या प्रकरणात काय झाले?

चेतना राज या कर्नाटकमधील अभिनेत्रीचा फॅट फ्री सर्जरीदरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला. बंगळुरुमधील खासगी रुग्णालयात तिने ही शस्त्रक्रिया करून घेतली. उपलब्ध माहितीनुसार, शस्त्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे तिच्या फुप्फुसांमध्ये दोष निर्माण झाला. त्यातून हृदयक्रिया बंद पडून तिचा मृत्यू झाला.

कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे काय?

कॉस्मेटिक सर्जरी हा प्लास्टिक सर्जरीचाच एक प्रकार आहे. प्लास्टिक सर्जरी ही सहसा शरीराचा एखादा दोष किंवा विकृती दूर करण्यासाठी केली जाते. याउलट कॉस्मेटिक सर्जरी ही प्रामुख्याने सौंदर्योपचारांचा भाग म्हणून केली जाते. शरीराची त्वचा भाजल्याने झालेल्या जखमा किंवा व्रण दूर करण्यासाठी किंवा कर्करोगासारख्या आजारावरील उपचारांदरम्यान निर्माण झालेले दृष्य दुष्परिणाम करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केल्या केल्या जाऊ लागल्या. काळाबरोबर त्या तंत्रात झालेल्या विस्तारामुळे आता सौंदर्योपचारातंर्गत अनेक प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी केल्याजातात. त्यामध्ये प्रामुख्याने शरीराच्या आकारात बदल करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, बांधा सुडौल बनवण्यासाठीही कॉस्मेटिक सर्जरी सर्रास केल्या जातात.

फॅट फ्री कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे काय?

डाएट किंवा व्यायाम यांना न जुमानणारी शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी सध्याच्या काळात कॉस्मेटिक सर्जरी केली जाते. १८ वर्षांनंतर साधारण ६५ वर्षे वयापर्यंत ही शस्त्रक्रिया केली जाते. ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया करायची त्याच्या विविध प्रकारच्या शारीरिक चाचण्या आणि तपासण्या करून रुग्ण शस्त्रक्रियेसाठी सक्षम असल्यास त्याच्यावर फॅट फ्री शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला जातो. या शस्त्रक्रियेला लिपोसक्शन सर्जरी म्हणूनही ओळखले जाते. जनरल किंवा रिजनल ॲनेस्थेशिया (भूल) देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने त्वचेखालील चरबी वितळवणे किंवा काढून टाकणे अशा दोन प्रक्रिया केल्या जातात. इंजेक्शन, अल्ट्रासॉनिक प्रक्रियाआणि लेसर किरणांच्या वापरातून ही प्रक्रिया होते. ट्युमेसंट लिपोसक्शन ही सर्वांत सुरक्षित पद्धत मानली जाते. या पद्धतीमध्ये काही द्रव पदार्थ आणि औषधे चरबीत सोडली जातात. त्यानंतर काही वेळात चरबी वेगळी होण्याची प्रक्रिया सुरू होते. ही चरबी एका यंत्राद्वारे शोषून घेण्याची(सक्शन) प्रक्रिया केली जाते. त्यामुळे चरबीच्या जागी रिकाम्या जागा तयार होतात आणि आकार आक्रसतो. त्यामुळे शरीराचा आकार कमी होतो. 

अशा शस्त्रक्रिया कोणासाठी?

शरीराचा बेढबपणा कमी करण्यासाठी महिला आणि पुरुष रुग्ण ही सर्जरी करू शकतात. प्रसूतीनंतर शरीराचा बदललेला आकार पूर्ववत करण्यासाठी अनेक महिला या शस्त्रक्रियेचा आधार घेतात. मांड्या, दंड, कंबर, पोटरी, पाठ, हनुवटी, चेहरा किंवा पोटावर वाढलेली चरबी व्यायाम करून कमी होत नसल्यास अशा शस्त्रक्रियांना पसंती दिली जाते. अवयवांचा आकार कमी-जास्त करण्यासाठी लिपोसक्शन किंवा कॉस्मेटिक सर्जरी हा पर्याय अवलंबला जातो. पुरुषांमध्येही लिपोसक्शन आणि कॉस्मेटिक सर्जरी करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने स्तनांवरील अनियंत्रित चरबीची वाढ कमी करण्यासाठी पुरुष लिपोसक्शन सर्जरी करतात. अनुवांशिकता, औषधे, वजन, संप्रेरके किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय डाएटमध्ये वापरलेले सप्लीमेंट्ससारखे घटक यांच्या दुष्परिणामांतून अशी वाढ संभवण्याचा धोका असतो.

अशा शस्त्रक्रियांमध्ये जोखीम किती?

लिपोसक्शन किंवा फॅट फ्री सर्जरी ही वजन कमी करण्याचा उपाय नाही. शरीराचा आकार सुडौल करण्यासाठी तिचा वापर केला जातो. वजन कमी करण्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी हा पर्याय  उपलब्ध आहे. मात्र, चरबी कमी करून शरीर सुडौल करण्याच्या शस्त्रक्रियेचे धोकेही आहेत. या शस्त्रक्रियेनंतर शरीराचा भाग काळानिळा होतो. दुखू लागतो. शरीरावर काही व्रण राहण्याची शक्यताही असते. काही वेळा अशा शस्त्रक्रियेनंतर त्वचा सैल पडण्याची शक्यता असते. शस्त्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंती हाताळण्याची योग्य तयारी रुग्णालयाकडे नसल्यास रुग्ण दगावण्याचा धोकाही असतो.

तज्ज्ञ काय सांगतात?

त्वचारोग आणि सौंदर्योपचार तज्ज्ञ डॅा. नरेंद्र पटवर्धन म्हणाले, की शरीर सुडौल करणे हा अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचा उद्देश असतो. अनुभवी शल्यविशारद, प्लास्टिक सर्जन आणि त्वचारोगतज्ज्ञ अशा तीन तज्ज्ञांच्या उपस्थितीत या शस्त्रक्रिया होणे अपेक्षित असते. लोकल ॲनेस्थेशिया देऊन त्या करणे श्रेयस्कर असते. जनरल ॲनेस्थेशियामध्ये गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. लाखात एखाद्या रुग्णाला तातडीच्या उपचारांची गरज भासणे शक्य असते त्यामुळे अशा शस्त्रक्रिया अतिदक्षता विभाग आणि सर्व पायाभूत सुविधा असलेल्या सुसज्ज रुग्णालयात करणे हिताचे असते. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाच्या सर्व चाचण्या, ईसीजी इ. तपासण्या करून डॉक्टरांनी त्या रुग्णाला ‘फिटनेस’ प्रमाणपत्र दिल्यानंतरच अशा शस्त्रक्रिया केल्या जातात, असेही डॅा. पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

bhakti.bisure@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained cosmetic surgery how useful how risky print exp 0522 abn