अमोल परांजपे
जगात करोनाची सुरुवात झाली ती चीनमधूनच. वुहानमध्ये घडलेल्या कोणत्यातरी घटनेमुळे (ही घटना नैसर्गिक आहे की मानवनिर्मित यावर वाद आहे) हा विषाणू माणसांमध्ये आला आणि त्यानंतर त्याने जगात गोंधळ घातला. आता याच विषाणूचा एक वंशज चीनमध्ये धुमाकूळ घालत आहे. मात्र यामुळे नव्हे, तर चीनच्या एका निर्णयामुळे जगाची झोप उडविली आहे.
चीनचे ‘शून्य कोविड’ धोरण काय आहे?
चीनने गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आपल्या नागरिकांना अक्षरश: नजरकैद केले होते. करोना संशयितांचे सक्तीने विलगीकरण, सततची टाळेबंदी याला तेथील जनता वैतागली होती. क्षी जिनपिंग यांच्या या लाडक्या धोरणाला तेथील जनतेने विरोध केला. कधी नव्हे ते चीनमध्ये मोर्चेही निघाले. या धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही खीळ बसल्याचे चित्र आहे. अखेर नागरिकांच्या दबावापुढे नमते घेत जिनपिंग प्रशासनाने आपले ‘शून्य कोविड’ धोरण टप्प्याटप्प्याने मागे घेण्यास सुरुवात केली.
टाळेबंदी शिथिल केल्यामुळे काय फरक पडला?
चीनमध्ये धोरण थोडे शिथिल होताच करोनाच्या ओमायक्रॉन प्रकारातील बीएफ-७ हा परिवर्तित विषाणू प्रचंड वेगाने पसरल्याच्या बातम्या बाहेर आल्या. अगदी रुग्णालयांमध्ये जागा नाही इथपासून ते स्मशानभूमीवर रांगा असल्यापर्यंतच्या कहाण्या माध्यमे आणि समाजमाध्यमांत चर्चिल्या गेल्या. अर्थात चीनमधील खरी परिस्थिती अधिकृतपणे कधीच समजत नसल्यामुळे सध्या तरी या दंतकथाच आहेत. मात्र आता धोरण शिथिलतेच्या दुसरा टप्पा चीन हाती घेणार असल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.
जगाला घाबरवणारा चीनचा निर्णय कोणता?
शून्य कोविड धोरण मागे घेत असताना आता चीन आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा खुल्या करणार आहे. याच महिन्यात चीनचे चांद्रवर्ष सुरू होते. त्यानिमित्त देशभर सुट्ट्यांचे वातावरण असते. आता चीन आपल्या नागरिकांना पारपत्रे आणि परदेशात पर्यटनाला जाण्याची परवानगी देऊ करणार आहे. मात्र यामुळे जगातील अनेक देश प्रचंड सावध झाले आहेत. अनेक देशांनी चिनी नागरिकांच्या आगमनावर बारीक नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत, अमेरिकेसह युरोपमध्ये कोणती सावधगिरी?
भारत सरकारने चीनसह हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, थायलंड आणि सिंगापूर या आशियाई देशांमधून येणाऱ्या (थेट किंवा अन्य देशांमार्गे) प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र ‘एअर सुविधा’ या अॅप्लिकेशनवर टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही चाचणी जास्तीत जास्त ७२ तास पूर्वी केलेली असावी, असे सांगण्यात आले आहे. याखेरीज कोणत्याही देशातून येणाऱ्या विमानांतील दोन टक्के प्रवाशांची अनियमित पद्धतीने करोना चाचणी केली जात आहे. अमेरिका, युरोपमधील इटली या देशांनीही चीनमधून येणाऱ्या पर्यटकांसाठी कमी-अधिक प्रमाणात अशाच पद्धतीचे नियम लागू केले आहेत. या देशांच्या भीतीमागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे चीनकडून होत असलेली लपवाछपवी आणि दुसरे म्हणजे जगाने करोनाच्या पहिल्या लाटेचा घेतलेला पूर्वानुभव.
चीनमधील खरी स्थिती का समजत नाही?
करोनाचा उगम असो की रुग्णांची संख्या, चीनमध्ये नेमकी स्थिती कधीच अधिकृतपणे जगासमोर येत नाही. तेथील एका पक्षाचे सरकार आणि त्याच पक्षाच्या आधीन असलेले प्रशासन जगाला खरी माहिती देत नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये वुहानसह चीनमधील शहरांमध्ये करोनाची स्थिती काय आहे, याची माहिती केवळ सूत्रांच्या हवाल्याने येत असते. आताही जागतिक आरोग्य संघटनेने चीनला तेथील खरी परिस्थिती उघड करण्याचे आवाहन केले असले तरी त्याला अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. अशा चीनमधून पर्यटक येणार असतील, तर सावधगिरी बाळगणे सर्वच देशांना गरजेचे वाटत असेल, तर त्यात नवल नाही.
करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये काय घडले?
२०२० साली जगात करोना पसरण्यापूर्वी चीनच्या वुहानमध्ये या विषाणूने ‘थैमान’ घातल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र कोणतीही अधिकृत माहिती नसल्यामुळे जगाने ते फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्या वर्षीच्या जानेवारीमध्ये चीनमधून पर्यटक जगभरात गेले आणि त्यानंतर काय घडले, हे सांगण्याची आवश्यकता नाही. आता पुन्हा एकदा त्याच करोना ओमायक्रॉनच्या ‘बीएफ-७’ या परिवर्तित विषाणूने चीनमध्ये हाहाःकार मागविल्याच्या बातम्या, चित्रिकरणे बाहेर आली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा २०२० साली घडलेला प्रकार होणार नाही ना, याची चिंता सर्वांनाच सतावते आहे.
घाबरण्याचे कारण नाही, मात्र सावधगिरी हवी…
भारतामधील जवळजवळ ९५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. अनेकांनी वर्धक मात्राही घेतली आहे. शिवाय भारतात टाळेबंदी लवकर शिथिल झाल्यामुळे समूहसंसर्ग होऊन करोनासाठी प्रतिकारशक्ती वाढली आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असे सर्वच तज्ज्ञ सांगत असले तरी सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचा सल्लाही देत आहेत. सरकार आणि प्रशासन नवी लाट रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना नागरिकही थोडे सजग राहिल्यास पुन्हा एकदा मुखपट्टीची सक्ती, टाळेबंदी, निर्बंध याला सामोरे जावे लागणार नाही.
amol.paranjpe@expressindia.com