शैलजा तिवले
करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाने देशात २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. करोना लशीमुळे जगभरातील सुमारे दोन कोटी नागरिकांची प्राण वाचल्याचे लंडनमधील इंम्पीरियल महाविद्यालयाने गणिती प्रारूपाच्या अभ्यासातून मांडले आहे. त्यानुसार मृतांची संख्या कमी करण्यात अस्ट्राझेनेका आणि फायझर या दोन लशींचा सर्वांत मोठा वाटा असल्याचे नुकत्याच एका अभ्यासातून निदर्शनास आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागरिकांचे प्राण वाचविण्यात लशींचा वाटा कसा ?

जगभरात १८५ देश आणि प्रदेश यामध्ये करोना साथीचा झालेला प्रसार, मृत्यू आणि लसीकरणाचा फायदा याचा एकत्रित अभ्यास लंडनच्या इम्पीरियल महाविद्यालयातील एमआरसी सेंटर फॉर ग्लोबल इन्फेक्शिअस डिसीज अनॅलिसिस विभागाने केला आहे. हा अभ्यास जून २०२२ मध्ये लॅन्सेट वैद्यकीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. अभ्यासात मांडलेल्या गणिती प्रारूपानुसार, डिसेंबर २०२० ते डिसेंबर २०२१ या काळात सुमारे १ कोटी ४४ लाख संभाव्य मृत्यू करोनाच्या प्रतिबंधात्मक लशीमुळे रोखता आले. करोना साथीची वास्तवातील व्याप्ती लक्षात घेता हा आकडा सुमारे दोन कोटीच्या जवळ जात आहे. हे सर्व मृत्यू लसीकरणाच्या पहिल्याच वर्षामध्ये टाळणे शक्य झाल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. कोविड-१९ वॅक्सिन ग्लोबल एक्सेस या कोवोवॅक्स या मोहीमेअंतर्गत लशींचे वाटप जगभरात केले गेले. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या देशांना लशीचा अपुरा पुरवठा झाल्यामुळे या देशांमध्ये मात्र लसीकरणाचा फारसा फायदा होऊ शकला नाही. त्यामुळे जगभरात लशीचा समान पुरवठा आणि सहभाग यासाठी येत्या काळात प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे या अभ्यासात अधोरेखित झाले आहे.

फायझर आणि अस्ट्राझेनेका या लशींचा वाटा कसा महत्त्वाचा आहे?

जगभरात लसीकऱणामुळे टाळता आलेल्या मृत्यूंच्या अभ्यासावरून एअरफिनिटी ॲनॅलिटिक्स या कंपनीने आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये कोणत्या लशींचा वाटा कितपत असून यामुळे किती जणांचे प्राण वाचविता आले याचा लेखाजोखा मांडला आहे. या अभ्यासानुसार, लसीकरणाच्या पहिल्या वर्षात अस्ट्राझेनेका या लशीमुळे सुमारे ६३ लाख ४१ हजार तर फायझरमुळे सुमारे ५९ लाख ७९ हजार जणांचे प्राण वाचविणे शक्य झाले. भारतात निर्मिती केलेल्या भारत बायोटेक या लशीचा वाटाही यात असून यामुळे सुमारे ३ लाख ७१ हजार रुग्णांची प्राणहानी टाळता आली. सिनोव्हॅक या लशीमुळे २० लाख १३ हजार, तर मॉडर्ना लशीमुळे १७ लाख ३३ हजार नागरिकांच्या जिवाचा धोका टाळता आला आहे. सिनोफार्मने १० लाख १९ हजार तर रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीमुळे ९ लाख ३९ हजार संभाव्य मृत्यू टाळता आले आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या देशांमध्ये फायझर लशीचे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या मध्यम आणि गरीब देशांमध्ये अस्ट्राझेनेका आणि जे अन्ड जे या लशींचे लसीकरण जास्त प्रमाणात झाले आहे. यामध्ये सर्वांत कमी वाटा हा नव्याने आलेल्या नोव्होव्हॅक्स या लशीचा असून २ हजार ३३३ जणांचे प्राण वाचविण्यात या लशीला यश आले आहे.

या दोन लशींचा वाटा सर्वांत जास्त का आहे?

फायझर आणि अस्ट्राझेनेका या दोन्ही लशीची निर्मिती झाल्यानंतर त्याचे उत्पादन आणि पुरवठा इतर लशीच्या तुलनेत कमी वेळात मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला. अस्ट्राझेनेकाच्या लशींच्या साठ्याचे वितरण मोठ्या प्रमाणात केले गेले. त्यामुळे ही लस आरोग्य व्यवस्था सक्षम नसलेल्या देशांमध्ये पोहोचू शकली. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचविण्यात या लशीचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्याच वर्षात मृत्यू टाळणे शक्य झाले, असे मत एअरफिनिटी ॲनॅलिटिक्स कंपनीच्या संचालक डॉ. मॅट लिनली यांनी व्यक्त केले आहे.

या अभ्यासाच्या काय मर्यादा आहेत?

एअरफिनिटी ॲनॅलिटिक्स कंपनीने केलेल्या या अभ्यासामध्ये चीनमधील माहितीचा समावेश केलेला नाही. यामध्ये वर्धक मात्रेचाही समावेश केलेला नाही. दोन मात्रा घेऊन लसीकरण पूर्ण झालेल्यांचा यामध्ये समावेश नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained covid 19 how many lives pfizer and astrazeneca vaccines saved print exp sgy