India coronavirus numbers explained: देशाला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत असताना मृतांची संख्या उच्चांक गाठत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात जवळपास गेल्या महिन्याभरापासून चार हजारांहून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. बुधवारी बळींच्या संख्येने उच्चांक गाठला असून देशात ४५२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत एकूण मृतांची संख्या दोन लाख ८३ हजार २४८ वर जाऊन पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत असताना अचानक बळींच्या संख्येत इतकी वाढ होण्याचं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं कारण म्हणजे मृतांच्या आकडेवारीत काही दिवस ते दोन आठवड्यांचं अंतर असतं. म्हणजे एखाद्या राज्याने जाहीर केलेल्या आकडेवारीत झालेले मृत्यू हे २४ तासांत झालेले नसतात. राज्यं गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मृत्यूचीही नोंद घेत असतात. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मृतांची संख्यादेखील कमी होईल असा अंदाज आहे. मात्र यादरम्यान ही संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.

उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रात सोमवारी १०१९ जणांचा मृत्यू झाला. यापैकी २८९ मृत्यू हे शनिवार ते सोमवारदरम्यान झाले होते, तर २२७ मृत्यू आधीच्या आठवड्यात झाले होते. याशिवाय आठवड्याभराच्या आधी ४८४ जणांचा मृत्यू झाला होता, पण राज्याच्या आकडेवारीत त्याची नोंद झालेली नव्हती. तसंच महाराष्ट्राने १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद केली होती, मात्र त्यांचा मृत्यू इतर आजारांमुळे झाल्याचं नंतर समोर आलं.

इतर राज्यंही आधीच्या मृत्यूची नोंद घेत आहेत. करोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीत प्रशासकीय अडचण आहे, जी कधीकधी कित्येक आठवड्यांपर्यंत वाढते. उदाहरणार्थ, कर्नाटकने ४६७ जणांच्या मृत्यूची नोंद केली त्यामधील काही मृत्यू मार्च आणि एप्रिल महिन्यातील आहेत.

सध्याच्या घडीला महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये दिवसाला सरासरी ३०० मृत्यू होत आहेत. मंगळवारी तुलनेने छोटं राज्य असणाऱ्या उत्तराखंडमध्ये २२३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली, यापैकी ८० हून जास्त मृत्यू आधीच्या दिवसांमधील आहेत. १२ हून अधिक राज्यं १०० आणि त्याहून जास्त मृत्यूची नोंद करत आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained covid 19 why deaths are spiking as caseload is going down sgy