देशात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने काही राज्यांनी मास्क अनिवार्य केलं आहे. देशात रुग्णसंख्या वाढत असताना सध्या क्रिडाविश्वाचं लक्ष लागलेल्या आयपीएलमध्येही करोनाने घुसखोरी केली असून दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. गुरुवारी सकाळी या खेळाडूंच्या केलेल्या चाचण्यांमध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. पण करोनाने सर्वांची चिंता वाढवली असून गेल्या हंगामाप्रमाणे यावेळीही आयपीएल मध्येच थांबवावं लागेल का? अशी शंका उपस्थित होत आहे. यानिमित्ताने आयपीएलमधील करोना नियमांचा आढावा घेऊयात…

काय आहेत करोनासंबंधी नियम ?

  • जर एखादा खेळाडू किंवा संघाचा सदस्य पॉझिटिव्ह आढळला तर त्याला किमान सात दिवस विलगीकरणात राहावं लागतं. यानंतर जर २४ तासाच्या आत आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळते.
  • जर एखाद्या संघाचे अनेक सदस्य पॉझिटिव्ह आढळले तर रिपोर्ट निगेटिव्ह असणाऱ्या कमीत कमी १२ खेळाडूंसोबत ते सामना खेळू शकतात. यामध्ये सात भारतीय आणि एक राखीव खेळाडू असणं आवश्यक आहे.
  • जर १२ निगेटिव्ह खेळाडूदेखील उपलब्ध नसतील तर मात्र आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल अंतिम निर्णय घेईल. हा निर्णय सर्वांना मान्य करावाच लागेल.

बायो बबलच्या नियमाचं उल्लंघन उल्लंघन झालं तर?

बायो बबलच्या नियमांचं उल्लंघन केल्यास खेळाडू स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. करोना नियमांतर्गत बायो बबलमध्ये खेळाडू, त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा संघाचे मालक आणि त्याच्याशी संबंधित लोकांनी नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

जर खेळाडूने बायो बबलच्या नियमाचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात येईल. तसंच सात दिवस विलगीकरणात राहावं लागेल. दुसऱ्यांदा चूक केल्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात येईल. तिसऱ्यांदा चूक केल्यास मात्र संपूर्ण हंगामासाठी त्या खेळाडूवर बंदी घालण्यात येईल आणि संघाला त्याच्या जागी दुसरा खेळाडूही मिळणार नाही.

कुटुंबाने नियम तोडल्यास काय?

खेळाडूच्या कुटुंबाने करोनाच्या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना सात दिवस विलगीकरणात राहावं लागेल. दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास त्यांना बायो बबलमधून बाहेर काढण्यात येईल आणि त्यांच्याशी संबंधित खेळाडूला सात दिवस विलगीकरणात राहावं लागेल.

संघाकडून नियमाचं उल्लंघन झाल्यास एक कोटींचा दंड

जर संघ बायो बबलच्या नियमांचं उल्लंघन करण्याची चूक करत असेल तर एक कोटींचा दंड ठोठावला जाऊ शकतो. तर दुसऱ्यांदा नियम मोडला तर एक गुण आणि तिसऱ्यावेळी संघाचे तीन गुण कमी करण्यात येतील.

करोना चाचणी करण्यात निष्काळजीपणा केल्यासही दंड

बीसीसीआयने करोना चाचणीसंबंधी वेगवेगळे नियम आखले आहेत. जर एखाद्या सदस्याने करोना चाचणी केली नाही तर आधी त्याला समज दिली जाईल. दुसऱ्या वेळी त्याला ७५ हजारांचा दंड ठोठावण्यात येईल आणि स्टेडियम किंवा सराव मैदानात जाण्यावर बंदी घालण्यात येईल.

Story img Loader