मागील एका महिन्यामध्ये देशामधील सक्रीय करोना रुग्णांची संख्या ६२ टक्क्यांनी कमी झालीय. त्यामुळेच आरोग्य व्यवस्थेवर, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर वाढत्या रुग्णसंख्येमुळे आलेला ताणही कमी झाला आहे. सर्वाधिक सक्रीय रुग्णसंख्या भारतामध्ये ९ मे २०२१ रोजी होती. ९ मे रोजी देशात करोनाचे ३७ लाख ४५ हजार सक्रीय रुग्ण होते. मात्र त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या कमी होत असून रविवारी (६ जून २०२१ रोजी) हीच रुग्णसंख्या १४ लाखांपर्यंत खाली आलीय.
सध्या देशातील सक्रीय करोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी पहिल्या लाटेदरम्यान सर्वोच्च रुग्णसंख्येपेक्षा ही आकडेवारी ४० टक्क्यांनी अधिक आहे. मात्र ज्या वेगाने सध्या रुग्णसंख्या कमी होत आहे ते पाहता पुढील आठवड्याभरामध्ये पहिल्या लाटेच्या सर्वोच्च रुग्णसंख्येच्या खाली ही आकडेवारी जाईल असं चित्र दिसत आहे.
या पाच राज्यांमध्ये ७० टक्के रुग्ण…
भारतामधील एकूण रुग्णसंख्येमध्ये पाच राज्यांचा वाटा सर्वाधिक म्हणजेच ७० टक्क्यांपर्यंत आहे. सर्वाधिक सक्रीय रुग्ण असणाऱ्या या राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे. या पाच राज्यांमध्येच देशातील १४ लाखांपैकी ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण आहेत. या प्रत्येक राज्यात एक लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये तर सक्रीय रुग्णसंख्येचा आकडा हा अडीच लाखांहून अधिक आहे. मात्र यामधील सामाधानकारक बाब म्हणजे या पाचही राज्यांबरोबरच देशामध्येही सक्रीय रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे.
नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?
चार राज्यांमधील रुग्णसंख्येत वाढ
सध्या देशातील चार राज्यांमध्ये करोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. ही सर्व राज्यं ईशान्य भारतामधील असून त्यामध्ये मणिपूर, मिझोरम, नागालँण्ड आणि सिक्कीमचा समावेश आहे. ही राज्ये आकाराने छोटी असल्याने येथील रुग्णसंख्येची वाढही मोठ्या राज्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. असं असलं तरी येथील लोकसंख्येच्या दृष्टीने ही वाढ चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. मागील आठवड्याभरामध्ये मिझोरम आणि सिक्कीममध्ये सक्रीय रुग्णसंख्या ३०० ने तर मणिपूरमध्ये जवळजवळ २५० ने वाढलीय.
नक्की वाचा >> ‘साइटोकिन स्टोम’ म्हणजे काय?; तरुण रुग्णांचा मृत्यू होण्यासाठी हाच फॅक्टर कारणीभूत असतो का?
उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परिस्थिती काय?
ही चार राज्ये वगळता इतर ठिकाणी परिस्थितीमध्ये वेगाने सुधारणा होत आहे. देशात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या १८ हजार इतकी असून बिहारमध्ये सक्रीय रुग्णसंख्या १० हजारांखाली आहे. सध्या उत्तराखंड, छत्तीसगड, आसाम आणि पंजाब सारख्या छोट्या राज्यांमध्ये सक्रीय रुग्णसंख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या सहा हजारांच्या खाली आहे.
नक्की वाचा >> समजून घ्या : ‘नेजल व्हॅक्सिन’ म्हणजे काय? लहान मुलांच्या लसीकरणात ती अधिक फायद्याची कशी ठरु शकते?
पॉझिटिव्हिटी रेट घसरला
देशातील सध्या आणखीन एक सकारात्मक बाब म्हणजे पॉझिटिव्हीटी दरामध्ये होणारी घसरण. आठवड्याभराचा किंवा सध्याचा (७ जून २०२१ पर्यंतचा) पॉझिटिव्हिटी रेट हा पाच टक्क्यांपर्यंत आहे. काही आठवड्यांपूर्वी हा दर २३ टक्क्यांपर्यंत होता. विषाणूचा संसर्ग किती वेगाने होते हे तपासण्यासाठी पॉझिटिव्हिटी रेटचा वापर केला जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं दर शंभर व्यक्तींची चाचणी केल्यानंतर पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. आधी हा आकडा १०० मागे २३ इतका होता. करोना संसर्गाचा वेग किती आहे हे सांगण्याचं काम पॉझिटीव्हिटी रेट करतो. हा पॉझिटिव्हिटी रेट कसा मोजतात, तो एवढा महत्वाचा का असतो या प्रश्नांची उत्तरे पुढील लिंकवर क्लिक करुन जाणून घ्या… Positivity Rate म्हणजे काय? तो इतका का महत्वाचा असतो?
मे महिन्यामध्ये शेवटचा आठवडा वगळल्यास सतत्याने पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आलं. मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेटमध्ये बरीच सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे. एकूण केलेल्या चाचण्यांच्या प्रमाणात किती जण बाधित आहेत याच्या प्रमाणावर हा पॉझिटिव्हिटी रेट अवलंबून असतो.
नक्की वाचा >> समजून घ्या : करोनानंतर लहान मुलांना होणारा MIS-C आजार आणि त्याच्या सात लक्षणांबद्दल
आकड्यांमधील गोंधळ कमी करण्यात आल्याने संख्या कमी झाली
मागील एका आठवड्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट कमी होण्यामागील कारण म्हणजे एकूण चाचण्यांच्या संख्येमध्ये होणारा गोंधळ कमी करण्यात आलेलं यश. जून १ ते जून ६ दरम्यान इंडियन मेडिकल रिसर्चने एकूण चाचण्यांच्यासंख्येमध्ये ७५ लाख चाचण्यांची भर घातली आहे. राज्य सरकारांकडून आलेल्या माहितीच्या आधारे ही भर घालण्यात आलीय मात्र याचा केंद्राकडे असणाऱ्या माहितीमध्ये समावेश करण्यात आला नाही. मागील बऱ्याच काळापासून राज्यांमध्ये होणाऱ्या चाचण्या आणि आयसीएमआरकडून देण्यात येणाऱ्या आकडेवारीमध्ये तफावत होती.
नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?
आयसीएमआरकडून देण्यात येणाऱ्या माहितीपेक्षा राज्यांकडून देण्यात येणाऱ्या माहितीमध्ये तीन ते चार लाख चाचण्या अधिक झाल्याचं दिसून यायचं. मागील आठवड्यामध्ये ही तफावत कमी करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. मोठ्या संख्येने चाचण्यांची दखल घेत ती संख्या आयसीएमआरने सरकारी माहितीमध्ये समाविष्ट केल्याने पॉझिटिव्हिटी दरामध्ये मोठी घसरण झाली. खास करुन मागील आठवड्याभरामध्ये हा दर झापाट्याने खाली आलाय. पुढील आठवड्यामध्ये यामध्ये वाढ होण्याची शक्यता मीच आहे. आता आय़सीएमआरने आधी केलेल्या चाचण्यांची संख्या सध्याच्या माहितीमध्ये समाविष्ट करुन घेतली जाणार नसल्याचं स्पष्ट करत ७५ लाख चाचण्यांची दखल घेतलीय.
नक्की वाचा >> समजून घ्या : Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते?
लसीकरणातही कमालीची घट
रविवारी लसीकरणाच्या संख्येमध्येही मोठी घट पहायला मिळाली. रविवारी १४ लाख ६४ हजार जणांना लसींचे डोस देण्यात आले. मागील आठवड्यात दिवसाला सरकारी ३० लाखांच्या आसपास डोस दिले जात असल्याने रविवारची ही संख्या खूपच कमी आहे. करोना प्रतिबंधक लसीकरणाची संख्या रविवारी कमी झाली असली तरी तीन आठवड्यांपूर्वी दिवसाला देण्यात येणाऱ्या लसींच्या संख्येपेक्षा ही संख्या दुप्पट आहे ही समाधानकारक बाब असल्याचं म्हणता येईल.
नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?
(हा लेख ७ जून २०२१ च्या आकडेवारीवर आधारित आहे याची नोंद घ्यावी.)