Cyclone Sitrang : ऐन दिवाळीत देशात आणखी एक चक्रीवादळ धडकण्याच्या तयारीत आहे. बंगालच्या उपसगारात हे चक्रीवादळ दाखल झाल्यास देशातील अनेक राज्यांमधील हवामानावर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. भारताच्या हवामान विभागाच्या (IMD) म्हणण्यानुसार बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ बनत आहे, जे रविवारी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की, रविवारी रात्रीपर्यंत पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीवर चक्रीवादाळाची तीव्रता आणखी होण्याची शक्यता आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीवर चक्रीवादळ धडकू शकते. या वादळास‘सीतरंग’ असे संबोधण्यात आले आहे, जे नाव थायलंडने दिलं आहे. या चक्रीवादळाचा परिणाम बंगालापसून ते ओदिशापर्यंत पाहायला मिळू शकतो.
चक्रीवादाळाच्या वेळी वाऱ्याचा वेग किती असणार? –
हवामान विभाग उत्तर अंदमान समुद्रावर तयार होत असलेल्या हवामान प्रणालीवर लक्ष ठेवून आहे. जो शनिवारपर्यंत ५० किमी प्रतितासद वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या दाबाखाली केंद्रित होण्याची शक्यता आहे. बुधवारी हवामान प्रणाली चक्राकार प्रवाही होती आणि आता ती दक्षिण-पूर्व आणि याच्याशी लागून असलेल्या पूर्व-बंगालच्या खाडीच्यावर एक कमी दाबाचा पट्टा बनवण्याची शक्यता आहे. असे मानले जात आहे की चक्रीवादळाच्यावेळी हवेचा वेग ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास राहू शकतो.
बंगालच्या खाडीवर निर्माण होणारे या वर्षातील दुसरे वादळ –
जर चक्रीवादळ आले तर हे या वर्षात बंगालच्या खाडीवर निर्माण होणारे दुसरे चक्रीवादळ असेल. या अगोदर मे महिन्याच्या सुरुवातीस आसनी नावाचे वादळ आले होते. तर ओदिशामध्ये २०२१ मध्ये कमीत कमी तीन मोठी वादळं आली होती. ज्यामध्ये यास, गुलाब आणि जवाद यांचा समावेश आहे.
हवामान विभागाने मच्छिमारांनी सल्ला दिला आहे की, २२ ऑक्टोबरपासून पश्चिम-मध्य आणि लगतच्या बंगालच्या उपसागरात जाऊ नये आणि २३ ऑक्टोबरपासून ओदिशाच्या किनारपट्टीपासून दूर रहावे.
चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका किती? –
सध्या महाराष्ट्राला परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला आहे. ऐन दिवाळी बंगालच्या उपसागरात धडकणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही कमी-अधिक प्रमाणात धोका आहे. ‘सीतरंग’ चक्रीवादळाचा परिणाम म्हणून २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी पूर्व महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या परिसरात पावसाची शक्यता आहे.