बिश्नोई टोळीच्या लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याने रविवारी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याने, बिश्नोई टोळीचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या बंबिहा टोळीने सर्वाचे लक्ष वेधले आहे. बंबिहा टोळीशी घनिष्ठ संबंध असलेल्या आणखी एका टोळीने फेसबुक पोस्टद्वारे सूड उगवण्याची धमकी दिली आहे. बंबिहा टोळी चालवणारा दविंदर सिंग बंबिहा २०१६ मध्ये चकमकीत मारला गेला होता. इंडियन एक्स्प्रेसने बंबिहा टोळीच्या कारवाईचा खुलासा केला आहे.
खेळाच्या मैदानापासून गुन्हेगारीच्या जगापर्यंत
मोगा जिल्ह्यातील बंबिहा गावात जन्मलेल्या दविंदर बंबिहा यांचे खरे नाव दविंदर सिंग सिद्धू होते. गुन्हेगारीच्या जगात येण्यापूर्वी तो लोकप्रिय कबड्डीपटू होता. शेतकरी कुटुंबातील दविंदर अभ्यासातही हुशार होता. २०१० मध्ये, तो महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना, त्याचे नाव एका खुनाच्या प्रकरणात आले होते. गावात दोन गटात झालेल्या हाणामारीत हा खून झाला होता. खून प्रकरणात त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले, जिथे तो अनेक गुंडांच्या संपर्कात आला आणि नंतर तो शार्प शूटर बनला.
“मला चुकीचे समजू नका…”, सिद्धू मुसेवाला यांची शेवटची पोस्ट चर्चेत
दविंदर बंबिहाने वयाच्या २१ व्या वर्षी तुरुंगातून पळ काढला आणि स्वतःची टोळी तयार केली. सुमारे अर्धा डझन खून प्रकरणात त्याचे नाव होते. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, चेन स्नॅचिंग आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दविंदरची भीती २०१२ ते २०१६ पर्यंत कायम होती आणि मृत्यूपर्यंत तो राज्यातील मोस्ट वाँटेड गुंडांपैकी एक होता. दविंदर सोशल मीडियावर त्याच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती असे. त्याने पंजाब पोलिसांना अनेकदा आव्हानही दिले होते. ९ सप्टेंबर २०१६ रोजी भटिंडा जिल्ह्यातील रामपुराजवळील गिल कलान येथे झालेल्या चकमकीत पंजाब पोलिसांनी २६ वर्षीय दविंदर बंबिहाला ठार केले.
बंबिहा गेला पण टोळी अजूनही सक्रिय
२०१६ मध्ये बंबिहा ठार झाल्यानंतर पोलिसांना वाटले की, आता ही टोळी नेस्तनाबूत झाली आहे. मात्र बंबिहा याचे अर्धा डझनहून अधिक सहकारी आणि मित्र होते ज्यांनी त्याची टोळी सक्रिय ठेवली होती. या टोळीशी संबंधित काही आरोपी विदेशात आहेत तर काही पंजाबच्या तुरुंगात आहेत. बंबिहाप्रमाणेच ते सोशल मीडियावर वेळोवेळी आपल्या गुन्ह्यांची माहिती देत असतात. याशिवाय बंबिहा गँग हरियाणातील कौशल चौधरी गँगच्या अगदी जवळची मानली जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील टोळ्या अनेक वेळा हरियाणातील टोळ्यांच्या मदतीने गुन्हे करतात.
बंबिहा गॅंग कोण चालवत आहे?
बंबिहा गॅंग चालवणाऱ्यांमध्ये लकी गौरव पटियाल हा प्रमुख असून, तो आधी तुरुंगात गेला होता आणि नंतर अर्मेनियाला पळून गेला होता. तर दुसरा सुखप्रीत सिंग बुडा हा मोगा जिल्ह्यातील कुसा गावचा रहिवासी असून तो अजूनही संगरूर तुरुंगात आहे. काही महिन्यांपूर्वी जालंधरमध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल अंबिया यांची हत्याही बंबिहा टोळीनेच घडवून आणली होती.
Sidhu Moosewala Top Songs : ‘या’ ५ सुपरहिट गाण्यांमुळे सिद्धू मूसेवाला यांचं बदललं नशिब
दरम्यान, पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की बिश्नोई आणि बंबिहा टोळ्यांमध्ये शत्रुत्व आहे. ते एकमेकांच्या सदस्यांना तसेच त्यांच्याशी संबंधित लोकांना मारतात. गायक देखील संगीत व्यवसायात वर्चस्वाच्या लढाईत गुंतलेले आहेत. संगीत व्यवसायाशी संबंधित अकाली नेता विकी मिद्दुखेरा यांची गेल्या वर्षी मोहालीमध्ये हत्या झाली होती, तेव्हा मूसवालाचे व्यवस्थापक शगुनप्रीतचे नाव चौकशीत समोर आले होते. बिश्नोई टोळीने मिद्दुखेरा यांच्या हत्येमध्ये मूसेवालाचा हात असल्याचा आरोप केला होता. बिश्नोई टोळीच्या सदस्यांनी मूसेवाला यांची हत्या केली माहिती समोर आली आहे. आता बिश्नोई टोळीची कट्टर प्रतिस्पर्धी असलेली बंबिहा गँग आणि बंबिहा टोळीशी जवळचा संबंध असलेला गौंडर बंधूंचा गट (मृत गँगस्टर विकी गौंडरचा समर्थक) यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी मूसवाला यांना मारायला नको होते. मूसेवाला यांच्याशी त्यांचा कोणताही संबंध नाही, पण त्यांचे नाव त्यांच्यासोबत जोडले गेले होते. त्याच्या हत्येचा बदला घेणार आहोत.
“पंजाबी असल्याची लाज वाटते…” सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर मीका सिंगचं वक्तव्य चर्चेत
बंबिहा गँगने फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिले?
बंबिहा गँगच्या कथित सोशल मीडिया पोस्टमध्ये, सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूमागे गायक मनकिरत औलख असल्याचा दावा केला जात आहे, ज्यामध्ये मनकिरतने सर्व गायकांकडून पैसे उकळल्याचे म्हटले आहे. बंबिहा गँगच्या कथित फेसबुक पोस्टमध्ये गायक मनकिरत औलख हा बिश्नोई गँगला मूसवाला यांच्या सुरक्षा कवचाची माहिती देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्याच वेळी, दिल्ली एनसीआरच्या नीरज बवाना टोळीने, एका कथित फेसबुक पोस्टमध्ये, मुसेवालाच्या हत्येचा निषेध केला आणि त्याला (सिद्धू मुसेवाला) त्यांचा भाऊ म्हटले. या हल्ल्याला दोन दिवसांत प्रत्युत्तर देऊ, अशी उघड धमकी त्यांनी दिली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये टिल्लू ताज पुरिया गँग, कौशल गुडगाव गँग आणि दविंदर बंबिहा गँगचीही नावे आहेत.