-सुशांत मोरे
मुंबई ते पुणे असा रोजचा प्रवास करणाऱ्यांना दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीनबाबत विशेष जिव्हाळा आहे. डेक्कन क्वीनला १ जून रोजी ९२ वर्ष पूर्ण झाली. उच्च श्रेणीची अशी नोंद असलेल्या या पहिल्या गाडीला दख्खनची राणी अशीही स्वतंत्र ओळख आहे. या ‘दख्खनच्या राणी”ला आता मध्य रल्वेने नवा साज दिला आहे. येत्या २२ जूनपासून नव्या रूपात ती प्रवाशांच्या सेवेत येईल.
डेक्कन क्वीनला प्रवाशांची पसंती का? –
डेक्कन क्वीन ही ब्रिटिश साम्राज्याच्या काळात सुरू झाली. ग्रेट इंडियन पेनिन्सुलार रेल्वे कंपनीने पहिली आरामदायी सेवा म्हणून १ जून १९३० रोजी डेक्कन क्वीनला सेवेत आणले. सध्या सीएसएमटीपासून धावत असलेल्या या गाडीचा पहिला प्रवास मात्र कल्याण ते पुणे असा झाला. सुरुवातीला सात डब्यांसह ही गाडी धावू लागली. दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान दळणवळण सक्षम करणाऱ्या या गाडीने अनेकांना दिलासा दिला. पूर्वी डेक्कन क्वीन फक्त शनिवार, रविवारीच धावत असे. गाडीतून नोकरदार वर्गाबरोबरच मुंबईत येणारे घोड्याच्या शर्यतीचे शौकीन प्रवास करत असत. आलिशान, आरामदायी प्रवासामुळे डेक्कन क्वीन प्रवाशांच्या पसंतीस उतरली. या गाडीत फक्त प्रथम आणि द्वितीय श्रेणीचेच डबे होते. १ जानेवारी १९४९ ला प्रथम श्रेणी रद्द करण्यात करण्यात आली. त्यानंतर द्वितीय श्रेणीची प्रथम श्रेणी म्हणून नंतर पुनर्रचना करण्यात आली, ती जून १९५५ पर्यंत होती. कालांतराने म्हणजे १९५५ मध्ये तिसऱ्या श्रेणीचा डबा जोडला गेला. या डब्याचे नंतर पुन्हा १९७४ पासून द्वितीय श्रेणीच्या डब्यात रूपांतर झाले. या गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे सात डब्यांवरुन ती १२ डब्यांची करण्यात आली. कालांतराने त्यात वाढ करून ते १७ डब्यांपर्यंत वाढवण्यात आले. या गाडीचा विस्तार होतानाच त्याच्या थांब्यातही बदल होत गेले. मुंबईच्या दिशेने जाताना दादर आणि पुण्याच्या दिशेने जाताना शिवाजीनगर असे दोन थांबे सुरुवातीला अनेक वर्षे नव्हते. नंतर या गाडीचा विस्तार करतानाच थांब्यातही बदल होत गेले.
डायनिंग कारची जोड –
डेक्कन क्वीनला महिलांसाठी राखीव डबे, पासधारकांसाठी डबे, जनरल डबे, वातानुकूलित डब्यांबरोबरच डायनिंग कारही (उपहारगृह) आहे. महाराजा एक्स्प्रेस, डेक्कन ओडीसी आणि पॅलेस ऑन व्हील्स यासारख्या महागड्या गाड्यांमध्ये असलेल्या अनोख्या डायनिंग कारचा डेक्कन क्वीनमध्ये समावेश केलेला आहे. त्यामुळे या गाडीला महत्त्वही प्राप्त झाले आहे. टेबल, मऊ गाद्यांच्या खुर्च्या अशी आसनव्यवस्था असलेल्या या डायनिंग कारमध्ये ३२ प्रवासी बसू शकतात. त्यामुळे मुंबई ते पुणे मार्गावरील निसर्ग न्याहाळत विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. डायनिंग कारला आयएसओ प्रमाणपत्रही मिळाले आहे, शिवाय लिम्का बुक ऑप वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे. ही डायनिंग कारही नव्या रूपात येणार आहे.
विस्टाडोम डब्यामुळे आकर्षण… –
या गाडीला १५ ऑगस्ट २०२१ ला पहिला विस्टाडोम डबा जोडला गेला. मध्य रेल्वेने त्याआधी मुंबई ते पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेसलाही हा डबा जोडला होता. त्यानंतर डेक्कन क्वीनची भर पडली. या विस्टाडोम डब्याची ४० प्रवासी क्षमता, काचेचे छत व रुंद खिडक्या, एलईडी दिवे, उत्तम आसनव्यवस्था, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, एलईडी स्क्रीन, अपंगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे अशा अनेक सुविधाही आहेत. डायनिंग कार आणि त्याचबरोबरच आकर्षक विस्टाडोममुळे डेक्कन क्वीनला एक नवी ओळख मिळू लागली आहे. पुणे ते मुंबई प्रवासात ऑक्टोबर २०२१ ते मे २०२२ पर्यंत विस्टाडोमला ९९ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला असून १ कोटी ६३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
पुन्हा एकदा रुपडे पालटणार –
१ जून १९३० ला सुरू झालेली डेक्कन क्वीन येत्या २२ जूनपासून नवीन रूपात दाखल होईल. सध्याच्या डेक्कन क्वीनचे डबे सफेद, लाल पट्ट्या तसेच सोनेरी रंगासह निळ्या रंगाचे आहेत. नव्या रूपात दाखल झालेल्या डेक्कन क्वीनची रंगसंगती बदलण्यात आली असून, ते हिरवे आणि लाल रंगात दिसतील. डेक्कन क्वीनचा पारंपरिक गडद निळा रंग जुन्याजाणत्या प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा होता. त्यामुळे काही वर्तुळांतून नवीन रंगसंगतीविषयी नाराजीही उमटू लागलेली दिसते. परंतु तशी ती प्रत्येक बदलत्या रंगसंगतीविषयी मागेही दिसून आली होतीच. नवीन गाडीत आसनव्यवस्था, अंतर्गंत सजावटीतही बदल करण्यात आले आहेत. नव्या डेक्कन क्वीनचे डबे हे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित लिंक-हॉफमॅन बुश (एलएचबी) प्रकारातील असून वजनाने हलके पण मजबूत आहेत. तर जुन्या डब्यांच्या तुलनेत या डब्यात अधिक जागा आहे. त्यामुळे प्रवाशांना सहजपणे वावरता येणे शक्य होणार आहे. अग्निशमन उपकरणांनी डबे सुसज्ज आहेत. विनाईल पेंटींग म्हणजे वॉटर प्रुफ आणि यूव्ही प्रिंटींग स्टीकरप्रमाणे या एलएचबी डब्यांना बाहेरून सजविण्यात आले आहे. नवे रूप घेताना तिची खासीयत असलेल्या डायनिंग कारलाही नवीन साज देण्यात आला आहे. डायनिंग कारमध्ये बदल करून ती रुंद करण्यात आली आहे. त्यातही अग्निशमन यंत्रणाही उपलब्ध आहे. या डब्यात एकाच वेळी ४० प्रवासी बसून खानपान सेवेचा आस्वाद घेतील, अशा प्रकारे रचना आहे.