गेल्या काही महिन्यांपासून लष्करातून निवृत्त झालेल्या सैनिकांना पेन्शन मिळण्यात अडचणी येत आहेत. यावेळी लष्करातील काही निवडक सैनिकांना एप्रिल महिन्याची पेन्शन मिळालेली नाही. वाढता वाद पाहता संरक्षण मंत्रालयाने बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व माजी सैनिकांच्या खात्यात या महिन्याची पेन्शन हस्तांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. ५८,००० हून अधिकांना एप्रिल महिन्यात त्यांचे निवृत्तीवेतन मिळाले नाही. सोशल मीडियावर अनेक जनरल्ससह अनेकांनी तक्रार केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. अशी परिस्थिती का निर्माण झाली आणि भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणते उपाय शोधले जात आहेत?
निवृत्त सैनिकांना एप्रिलमध्ये पेन्शन का मिळाली नाही?
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की ५८,२७५ ‘स्पर्श’ या पोर्टलवर ओळखपत्र अपलोड न करणाऱ्या माजी सैनिकांचे पेन्शन बंद करण्यात आले होते. यासाठी शेवटची तारीख ३१ मार्च होती. ही प्रमाणपत्रे, नोव्हेंबर २०२१ पर्यंत अपलोड करणे अपेक्षित होते. परंतु कोविड-१९ मुळे तारीख वाढवण्यात आली होती. मात्र त्यानंतरही जे प्रमाणपत्र सादर करु शकले नाहीत त्यांना पेन्शन देण्यात आले नाही. बुधवारी, मंत्रालयाने संरक्षण लेखा विभागाला तात्काळ पैसे वितरित करण्याचे निर्देश दिले जेणेकरून ते त्याच संध्याकाळी (४ मे) त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. यासोबतच ज्या माजी सैनिकांनी संरक्षण लेखा विभागाच्या पोर्टलवर आपले ओळखपत्र अद्याप अपलोड केलेले नाही, त्यांना ते २५ मे पर्यंत करण्याची सवलत देण्यात आली आहे.
स्पर्श म्हणजे काय?
स्पर्श म्हणजे सिस्टम फॉर पेन्शन अॅडमिनिस्ट्रेशन (रक्षा). ही पेन्शन वितरणाची एक नवीन पद्धत आहे जी संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण खाते विभागाच्या आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत, पेन्शन थेट पेन्शनधारकाच्या बँक खात्यात जमा केली जाते आणि मध्यस्थ आणि कमिशन एजंट म्हणून बँकेची भूमिका काढून टाकण्यात आली आहे. यामुळे सरकारची मोठी आर्थिक बचत होते.
गेल्या वर्षी म्हणजे जुलै २०२१ मध्ये, संरक्षण मंत्रालयाने माजी सैनिकांच्या पेन्शनसाठी ‘स्पर्श’ नावाचे पोर्टल सुरू केले होते. या पोर्टलद्वारे सर्व माजी सैनिकांना त्यांचे पेन्शन सहज मिळू शकते. परंतु सर्व निवृत्त सैनिकांना नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोर्टलवर त्यांची ओळखपत्रे अपलोड करायचे होते.
कोविडमुळे ही तारीख मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली. पेन्शनमध्ये पारदर्शकता आणि डिजिटलायझेशन आणण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यापर्यंत म्हणजेच १ एप्रिल २०२२ पर्यंत, स्पर्श पोर्टलद्वारे सुमारे १,६०० कोटींच्या पेन्शनचे वाटप करण्यात आले आहे.
स्पर्शबद्दल निवृत्त सैनिकांच्या तक्रारी काय आहेत?
पेन्शन वितरणाच्या या नव्या पद्धतीबाबत निवृत्त सैनिकांच्या असंख्य तक्रारी असून, त्यातून अचूक माहिती मिळत नसल्याच्या अनेकांचे म्हणणे आहे. त्यावर कागदपत्रे अपलोड करता येत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की कागदपत्रे सादर करण्याचे वेळ खूप उशिरा कळाली, ज्यामुळे त्यांचे पेन्शन थांबले.
तसेच स्पर्श प्लॅटफॉर्मवर चुकीचे पगार/पेन्शन तपशील अपलोड केल्याबद्दल तक्रारी आहेत आणि माहितीमध्ये फरक का आहे याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. एका निवृत्त जनरलने दावा केला आहे की त्याने सप्टेंबर २०२१ पासून त्याची मासिक पेन्शन स्लिप पाहिली नाही.
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना या नव्या ऑनलाइन पद्धतीत स्थलांतरित होण्यात एवढ्या अडचणी येत असतील, तर जवान आणि जेसीओ, जे तांत्रिकदृष्ट्या जाणकार नसतील त्यांची काय अवस्था असेल, याकडे निवृत्त सैनिकांनी लक्ष वेधले आहे. जे दुर्गम भागात राहतात आणि इंटरनेट वापरु शकत नाही त्यांना हे कसे हाताळता येईल याबद्दल देखील चिंता व्यक्त केली आहे.
स्पर्शबद्दल संरक्षण मंत्रालयाचे काय म्हणणे आहे?
मंत्रालयाने असे नमूद केले आहे की स्पर्श पुरेसे योग्य काम करत आहे आणि ते २१ मार्च २०२२ पर्यंत जुन्या प्रणालीतून स्थलांतरित झालेल्या ४.४७ लाख निवृत्तीवेतनधारकांसह पाच लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना पेन्शनचे यशस्वीपणे वितरण करत आहे.
यासाठी एक वेबसाइट आहे जी स्पर्शशी संबंधित प्रश्न हाताळते आणि एक हेल्पलाइन क्रमांक देखील आहे ज्यावर कामाच्या वेळेत संपर्क साधला जाऊ शकतो.