दत्ता जाधव
उशिराने सक्रिय झालेला मोसमी पाऊस, अपेक्षित वेळेत पाऊस न पडणे किंवा कमी पडणे, असमान पाऊसमान याचा परिणाम देशभरातील खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रावर दिसून येत आहे. परिणामी पुढील वर्षभर अन्नधान्यांतील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
भाताच्या लागवडीला सर्वाधिक फटका?
जुलै महिन्याच्या अखेपर्यंत बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये तांदळाची लागवड सरासरीच्या १० ते १२ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. या सहा राज्यांमध्ये मिळून या वर्षी भाताची लागवड आतापर्यंत ३८ लाख हेक्टरने कमी झाली आहे. २०२१ मध्ये देशातील भाताच्या लागवडीखालील क्षेत्र होते २६७.०५ लाख हेक्टर. यंदा त्यात कपात होऊन हे क्षेत्र २३१.५९ लाख हेक्टरवर आले आहे. त्यामुळे या वर्षी तांदळाचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. तांदळाचे उत्पादन सरासरी नऊ ते दहा टक्क्यांनी घटेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पश्चिम बंगाल तांदूळ उत्पादनातील आघाडीवरील राज्य आहे. यंदा पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित पाऊस आणि वेळेत पाऊस झाला नाही. बंगालमधील २३ पैकी १५ जिल्ह्यांत कमी पाऊस झाला आहे. याचा परिणाम एकूण उत्पादनावर होणार आहे. मागील वर्षी १२९० लाख टन तांदूळ उत्पादन झाले होते. त्यात यंदा १० लाख टनांची घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आणखी कोणत्या पिकाच्या क्षेत्रात घट झाली?
डाळी, तूर, उडीद, मका, शेंगदाणा, तिळाच्या लागवड क्षेत्रातही घट झाली आहे. मागील वर्षी डाळींचे क्षेत्र ११९.४३ लाख हेक्टर होते. त्यात यंदा घट होऊन ते ११६.४५ लाख हेक्टरवर आले आहे. तुरीच्या क्षेत्रातही घट झाली आहे. मागील वर्षी ४४.४३ लाख हेक्टर होते, यंदा ते क्षेत्र ३९.८० लाख हेक्टरवर आले आहे. उडदाचे क्षेत्र मागील वर्षी ३३.८७ लाख हेक्टर होते, यंदा उडदाचे क्षेत्र ३१.८३ लाख हेक्टरवर आले आहे. मक्याच्या क्षेत्रातही घट झाली आहे. ७६.३४ लाख हेक्टरवरून हे क्षेत्र ७५.७५ टक्क्यांवर आले आहे. शेंगदाण्याच्या क्षेत्रातही घट झाली आहे. मागील वर्षी शेंगदाण्याचे क्षेत्र ४४.३९ लाख हेक्टर होते, यंदा ते ४१.०९ लाख हेक्टरवर आले आहे. विशेषकरून गुजरात राज्यात शेंगदाण्याचे क्षेत्र अधिक असते आणि नेमकी तेथील क्षेत्रातच मोठी घट झाली आहे. तिळाचे क्षेत्र मागील वर्षी ११.२१ लाख हेक्टर होते, ते यंदा ११.०९ लाख हेक्टरवर आले आहे.
कोणत्या पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली?
मूग, बाजरी, ज्वारीच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. मुगाचे क्षेत्र मागील वर्षी ३०.२३ लाख हेक्टर होते, त्यात वाढ होऊन यंदाचे क्षेत्र ३०.९९ लाख हेक्टर इतके झाले आहे. बाजरीचे क्षेत्र ५६.६८ वरून ६५.१७ लाख हेक्टरवर आले आहे. ज्वारीच्या क्षेत्रात किरकोळ वाढ झाली आहे. १२.६२ वरून १२.६५ लाख हेक्टरवर गेले आहे. पाऊस उशिराने आल्यामुळे कडधान्य पिकांच्या पेरणीवर मर्यादा आल्या होत्या. कडधान्य पिकांची पेरणी जूनअखेर न झाल्यास चांगले उत्पादन मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कडधान्यांची पेरणी करणे टाळतात. त्याचा परिणाम इतर कडधान्यांच्या पेरणीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. अपवाद म्हणून मुगाच्या क्षेत्रात किरकोळ वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
कापसाचा पेरा देशात वाढला, पण राज्यात?
यंदा कापसाला चांगला दर होता. विदर्भात कापूस १२ हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेला होता. सात हजार ते साडेनऊ हजार रुपयांच्या घरात दर टिकून होता. यंदा कापसाच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि उत्पादन प्रति एकरी चार क्विंटलच्याही आत आल्यामुळे विदर्भ, मराठवाडय़ासह देशभरात कापसाची लागवड कमी झाली आहे. मात्र देशभराचा विचार करता, मागील वर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्र ११३.५१ लाख हेक्टर होते ते यंदा काहीसे वाढून १२१.१३ लाख हेक्टरवर आले आहे. कापूस लागवडीखालील क्षेत्रात देश पातळीवर वाढ झाल्याचे दिसत असले, तरी महाराष्ट्रात मात्र लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. ही घट कापूस आणि कापड उद्योगापुढील अडचणी अधिक वाढवू शकते.
सोयाबीनच्या पेऱ्यातील वाढ दिलासादायक?
मागील वर्षी सोयाबीनचे क्षेत्र ११५.१० लाख हेक्टर होते. त्यात वाढ होऊन ११७.५१ लाख हेक्टर क्षेत्र झाले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत सुमारे अडीच लाख हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षभर सोयाबीनला हमीभावापेक्षा चांगला बाजारभाव मिळत राहिला. खाद्यतेलाची टंचाई, पोल्ट्री उद्योगातून सोया-पेंडीची मोठी मागणी असल्यामुळे सोयाबीनला वर्षभर मागणी कायम राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कापूस आणि कडधान्य पिके टाळून सोयाबीनच्या पेरणीवर जास्त भर दिल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षांत सोयाबीनचा हमीभाव ३९५० इतका होता, पण बाजारात सोयाबीनचे दर १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले होते. वर्षभरात सोयाबीनचा सरासरी दर साडेसात हजार रुपयांच्या घरात होता. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीला प्राधान्य दिलेले दिसून येते. सोयाबीनच्या पेऱ्यातील वाढ खाद्यतेल आणि पोल्ट्री उद्योगासाठी दिलासादायक ठरणार आहे. dattatray.jadhav@expressindia.com