मागील महिन्यात म्हणजेच ३ जून रोजी एका दिव्यांग मुलाला हवाई प्रवास नाकारल्यानंतर इंडिगो या विमान वाहतूक कंपनीवर देशभरातून टीका करण्यात आली. या घटनेची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दखल घेत इंडिगो या कंपनीला पाच लाखांचा दंड ठोठावला. या घटनेनंतर आता DGCA दिव्यांग प्रवाशांच्या वाहतुकीसाठी नियमांत बदल केला आहे. या नव्या नियमानुसार डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय हवाई वाहतूक कंपन्यांना कोणत्याही दिव्यांग प्रवाशाला प्रवास नाकारता येणार नाही.
डीजीसीएचे नवीन नियम काय आहेत?
दिव्यांग प्रवाशांना हवाई प्रवास सुखकर व्हावा यासाठी डीसीसीएने आपल्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. डॉक्टरांकडून अभिप्राय घेतल्यानंतर विमान वाहतूक कंपनीला एखाद्या दिव्यांग प्रवाशाला प्रवास नाकारायचा असेल तर प्रवाशाला तसे लिखित स्वरुपात कळवावे लागेल. तसेच यामध्ये प्रवास नाकारण्याचे कारण नमूद करावे लागेल.
तसेच कोणतीही हवाई वाहतूक कंपनी दिव्यांग प्रवाशांना प्रवास नाकारू शकत नाही. उड्डाणानंतर एखाद्या प्रवाशाची प्रकृती खालावू शकते, असे विमान वाहतूक कंपनीला वाटत असेल तर प्रवाशाची प्रकृती डॉक्टरांकडून तपासून घेणे बंधनकारक असेल. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच विमान वाहतूक कंपनीला योग्य तो निर्णय घेता येईल, असे नव्या नियमांत नमूद केलेले आहे.
जुना नियम काय होता?
यापूर्वी हवाई वाहतूक कंपन्यांना दिव्यांग व्यक्तीला प्रवास नाकारण्याचे अधिकार होते. अपंगत्वामुळे एखादा प्रवासी हवाई प्रवास करण्यास अनुकूल नाही असे वाटले, तर त्या प्रवाशाला प्रवास नाकारण्याचा अधिकार एअरलाईन्सला होता. प्रवास नाकारल्यानंतर हवाई वाहतूक कंपन्यांना त्याचे कारण लिखित स्वरुपात द्यावे लागत होते.
नियमांत सुधारणा करण्याचा निर्णय का घेतला?
तीन जून रोजी रांची येथील विमानतळावर एका दिव्यांग मुलाला इंडिगो या हवाई वाहतूक कंपनीने प्रवास नाकारला होता. प्रवासादरम्यान धोका असल्याचे कारण देत हा प्रवास नाकारण्यात आला होता. या घटनेनंतर इंडिगोला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. या कारवाईनंतर इंडिगो कंपनीने आगामी काळात दिव्यांग प्रवाशांसाठी हवाई प्रवास कसा सुखकर होईल, याचा आम्ही अभ्यास करू असे आश्वासन दिले होते. या घटनेनंतर डीजीसीएने हवाई वाहतूक नियमांत वरील बदल केला आहे.