शैलजा तिवले

राज्यात मागील दोन महिन्यांपासून रुग्णसंख्येचा आलेख वेगाने वर नेणारी तिसरी लाट आता बहुतांश भागांमध्ये ओसरली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नगर, नाशिक, औरंगाबाद आणि ठाणे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये तर ही लाट पूर्णपणे ओसरली आहे. केंद्रानेही अतिरिक्त निर्बंध शिथिल करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता सगळे निर्बंध पूर्णतः कधी दूर होणार याची प्रतीक्षा आहे.

तिसरी लाट केव्हा सुरू झाली?

राज्यात १५ डिसेंबरच्या सुमारास ८०० ते ९०० रुग्ण दरदिवशी नव्याने आढळत होते. मात्र २१ डिसेंबरपासून दैनंदिन रुग्णसंख्या वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आणि करोनाची तिसरी लाट सुरू झाली. परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या रूपाने राज्यात प्रवेश केला. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढत होती की २१ ते २५ डिसेंबर या काळात ती ८०० वरून थेट दुपटीने वाढून १६०० वर गेली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा दैनंदिन रुग्णसंख्या दुपटीचा काळ तर दोन दिवसांवर आला. तिसऱ्या लाटेने ४ जानेवारीच्या मध्यापर्यत उच्चांक गाठला. १५ जानेवारीला राज्यात एका दिवशी ४६ हजार ७२३ रुग्ण नव्याने आढळले. तिसऱ्या लाटेतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या होती. परिणामी उपचाराधीन रुग्णांची संख्याही सुमारे तीन लाखांपेक्षाही जास्त झाली होती.

लाट ओसरायला केव्हा सुरूवात झाली?

पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत तिसरी लाट ज्या वेगाने वाढली. त्याच वेगाने ती ओसरली. जानेवारीच्या मध्यानंतर वर गेलेला रुग्णसंख्येचा आलेख चाचण्या कमी अधिक होत असल्यामुळे वर-खाली होत होता. परंतु जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या कमी होऊन ती सुमारे २५ ते २७ हजार झाली. फेब्रुवारीपासून दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण घसरून ते दीड लाखांपेक्षाही कमी झाले. त्यामुळे रुग्णसंख्येच्या आलेखातही वेगाने घट दिसू लागली. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात लाट ओसरण्यास सुरुवात झाली. दैनंदिन रुग्णसंख्या सुमारे ९ हजारांवरून थेट तीन हजारांपर्यत कमी झाली आहे. मागील आठवड्याभरात हे प्रमाण तीन हजारांपेक्षाही कमी झाले.

मग लाट संपली का असे म्हणावे का?

काही तज्ज्ञांच्या मते राज्यातील तिसरी लाट संपली आहे. मात्र काही तज्ज्ञांनी याला विरोध केला आहे. राज्यात दरदिवशी सुमारे अडीच हजार रुग्ण नव्याने आढळत आहेत आणि ४० जणांचा मृत्यू होत आहे, अशा स्थितीत लाट संपली असे म्हणता येणार नाही. परंतु लाटेचा जोर ओसरत चालला आहे, असे निश्चितच म्हणता येईल.

निर्बंध आणि मुखपट्टीमुक्ती

गेल्या दोन वर्षाचा काळ मुखपट्टी आणि आणि इतर बंधनांमध्ये अडकलेल्या नागरिकांची आता घुसमट होत असल्यामुळे यापासून मुक्ती कधी मिळणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. करोनाची लाट ओसरत असली तरी राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्यानेच शिथिल केले जातील. परंतु गर्दी वाढणार नाही या दृष्टीने काही निर्बंध अजून काही काळ असतील. अर्थचक्रावर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. परंतु मुखपट्टी मुक्तीसाठी मात्र अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे. विषाणूचा नवे उत्परिवर्तन होऊ नये आणि पुढील लाटा येऊ नयेत या दृष्टीने मुखपट्टी साधारण जून महिन्यापर्यत तरी अनिर्वाय असल्याचेही करोना कृती दलाने स्पष्ट केले आहे.

Story img Loader