राखी चव्हाण
माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि या हवामान बदलांमुळे मानवी आयुष्यालाच धोके निर्माण होत आहेत. याविषयी वेळीच पावले उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. भयानक दुष्काळाचा सामना करावा लागेल, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी-प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढले असून, परिणामी तापमानातही वाढ झाली आहे.
हवामान बदल म्हणजे काय?
ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातला बदल म्हणजेच हवामान बदल. माणसाद्वारे घर, कारखाने आणि वाहतुकीसाठी केल्या जाणाऱ्या तेल, गॅस आणि कोळशाच्या वापरामुळे हवामानात झपाट्याने बदल होत आहेत. जैवइंधन ज्यावेळी जाळले जाते, त्यावेळी त्यातून हरित गृह वायूचे उत्सर्जन होते. यात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण अधिक आहे. या वायूंमुळे सूर्याकडून आलेली उष्णता भूतलावर अडकून राहते आणि त्यामुळे पृथ्वीवरचे तापमान वाढते.
हवामान बदलांमुळे निसर्ग चक्रात कोणते बदल होतील ?
जगभरातील तापमान एकोणविसाव्या शतकाच्या तुलनेत १.२ सेल्सिअसने वाढले आहे. वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे. हवामान बदलाचे विपरित परिणाम टाळायचे असतील तर जगाच्या तापमान वाढिला थांबवावे लागेल असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. वेळीच पावले उचलली नाहीत तर या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढण्याची भीती आहे. कोणतीच पावले उचलली नाहीत तर पृथ्वीचे तापमान चार अंश सेल्सियसने वाढेल आणि परिणामी विनाशकारी उष्णतेची लाट येईल, समुद्राची पातळी वाढल्याने लाखो लोकांची घरे पाण्याखाली जातील आणि पृथ्वी ग्रहाचे आणि यावरच्या जैवसृष्टीचे भरून न येणारे नुकसान होईल.
हवामान बदलाचे परिणाम काय?
हवामानात होणाऱ्या टोकाच्या बदलांचे परिणाम सध्या पहायला मिळत आहेत. यामुळे अनेक आयुष्ये आणि अनेकांची रोजीरोटी धोक्यात आली आहे. हवामान बदलामुले आपली जीवनशैली बदलू शकते. सुपीक जमिनीचे रेताड जमिनीत रूपांतर होईल. पाण्याच्या कमतरतेचा परिणाम पिकांच्या उपजावूपणावर होईल. समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे काही भागांत प्रचंड उष्णता वाढेल आणि ते ठिकाण निवास करण्यास योग्य राहणार नाहीत. हवामानात टोकाचे बदल जाणवतील. उष्णतेची लाट, मुसळधार पाऊस, वादळ हे सर्व वारंवार होईल, त्याचे प्रमाणही वाढत जाऊन मानवी जीवनासाठी ते धोकादायक ठरेल.
वातावरणावर हवामान बदलाचे परिणाम
ध्रुवावरील बर्फ आणि हिमनद्या वेगानं वितळत आहेत. त्यामुळे समुद्राची पातळी वाढत असलेल्या सखल किनारी भागांमध्ये पुराचा धोका वाढला आहे. सायबेरिया सारख्या ठिकाणी कायमस्वरूपी बर्फ (पर्माफ्रॉस्ट) असलेली ठिकाणे वितळतील. वातावरणात सोडला जाणारा मिथेन हा आणखी एक हरितगृह वायूदेखील हवामान बदलाची तीव्रता अधिक वाढवत आहे. जंगलात आगी लागण्याच्या, वणवे पेटण्याच्या घटनांसाठी अनुकुल हवामान अधिक प्रमाणात तयार होईल.
जगभरातली सरकारे काय करत आहे?
हवामान बदलाचे आव्हान सगळ्यांनी एकत्र येऊन हाताळता येईल, यावर जगभरातल्या देशांचे एकमत झाले आहे. पॅरिसमध्ये २०१५ मध्ये झालेल्या महत्त्वाच्या कराराद्वारे जागतिक तापमानवाढ १.५ सेल्शियसपर्यंत रोखण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे २०५० पर्यंत हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी करून ते शून्यावर आणण्याचे लक्ष्य विविध देशांनी ठेवले आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वायू उत्सर्जनाच्या प्रमाणात ते वायू शोषले जातील असा समतोल राखला जाईल, अशा उपाययोजना केल्या जातील. या माध्यमातून तापमानात झपाट्याने होणारी वाढ थांबवून, हवामान बदलाचे गंभीर दुष्परिणाम टाळता येऊ शकतील.
हवामान बदलांबद्दल आपण काय करू शकतो?
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा सायकलचा वापर वाढवून जैवइंधन असणाऱ्या वाहनांचा वापर कमी करणे. घरांना उष्णतेपासून बचावासाठी विशिष्ट गोष्टीचा थर देणे. विमानांचा वापर कमीत कमी करणे. मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करणे हे उपाय सामान्य माणसाच्या हाती आहेत